खासदार कॅप्टन मश्रफी मुर्तझाचा वर्ल्ड कपला अलविदा

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेशचा कॅप्टन मश्रफी मुर्तझासाठी पाकिस्तानविरुद्धची मॅच शेवटची वर्ल्ड कप लढत. खासदारकी आणि खेळणं अशा दोन्ही आघाड्या हाताळणाऱ्या मुर्तझाचा अलविदा बांगलादेश क्रिकेटमधल्या वर्ल्ड कपमधल्या सळसळत्या पर्वाचा अखेर आहे.
शुक्रवारची सकाळ. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान म्हणजे क्रिकेटची पंढरी. बांगलादेशचा संघनायक मश्रफी बिन मुर्तझासाठी हा क्षण अगदीच भावनिक क्षण. असंख्य दुखापतींनी जर्जर 35वर्षीय मुर्तझाने हा शेवटचा वर्ल्ड कप असेल असं जाहीर केलं होतं. बांगलादेशने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चांगला खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे बांगलादेशला सेमी फायनलचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धची मॅच मुर्तझासाठी वर्ल्ड कपची शेवटची आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एकापेक्षा एक स्पिनर्सची खाण असलेल्या बांगलादेशला मुर्तझाच्या रुपात वेगवान गोलंदाज मिळाला. 2001 मध्ये बांगलादेशात सुरू असलेल्या U17 स्पर्धेत एक तरणाबांड मुलाने छाप सोडली.
प्रतिस्पर्धी फलंदाजांना सळो की पळो करून सोडेल असा खणखणीत वेग त्याच्याकडे होता. फास्ट बॉलर होण्यासाठी साजेशी काटक शरीरयष्टी आणि डोळ्यात अंगार होता. तो मुलगा बॅटिंगही उत्तम करायचा. पल्लेदार षटकार खेचण्यात तो माहीर होता. आशियाई उपखंडातील खेळाडू नैसर्गिकदृष्ट्या फिल्डिंगमध्ये वाकबगार नसतात. पण मुर्तझा इथेही अपवाद होता. बॉलवर झडप घालून थांबवण्यात तसंच अवघड झेल टिपण्यात तो पटाईत होता.

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने उचललेलं एक पाऊल मुर्तझाच्या कारकीर्दीत निर्णायक ठरलं. वेस्ट इंडिजचे माजी महान खेळाडू अँडी रॉबर्ट्स यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. मुर्तझाला रॉबर्ट्स यांच्या रुपात खंबीर सल्लागार मिळाला. कारकीर्दीच्या सुरुवातीलाच कर्तृत्ववान व्यक्तीकडून बाळकडू मिळाल्याने मुर्तझाने गिरवलेली धुळाक्षरं आयुष्यभरासाठी प्रमाण ठरली.
बांगलादेशची राजधानी ढाक्यापासून दूरवरच्या नरेलच्या मुर्तझाला निवडसमितीने झटपट हेरलं. वयोगट स्पर्धांमध्ये नैपुण्य सिद्ध केलेल्या मुर्तझाला बांगलादेश अ संघासाठी निवडण्यात आलं. 23 नोव्हेंबर 2001 रोजी मुर्तझाने झिम्बाब्वेविरुद्ध वनडे पदार्पण केलं. पदार्पणात मुर्तझाने 2 विकेट्स घेतल्या परंतु बांगलादेशचा संघ पराभूत झाला.

फोटो स्रोत, Getty Images
तेव्हापासून मुर्तझा आणि बांगलादेश हे समानार्थी शब्द झाले. मात्र मुर्तझा बांगलादेशसाठी जेवढं खेळला त्याच्यापेक्षा दुप्पट सामने तो खेळू शकला नाही. कारकीर्दीत मुर्तझाच्या पाय, गुडघा आणि घोट्यावर मिळून सात शस्त्रक्रिया झाल्या.
वेगवान गोलंदाजांसाठी दुखापती कारकीर्दीचा अविभाज्य भाग असतात. मात्र मुर्तझासाठी दुखापती कारकीर्दीतील अडथळा ठरल्या. ऐन भरात असताना, मुर्तझाने मैदान सोडल्याचे प्रसंग अनेकदा घडले. मात्र बांगलादेश क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णक्षणांचा मुर्तझा अविभाज्य भाग होता.
2004 मध्ये बांगलादेशने भारताला नमवलं. त्या विजयात मुर्तझाची भूमिका निर्णायक होती. कॅरेबियन बेटांवर झालेल्या 2007 वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने भारताला नमवलं. त्या स्पर्धेत भारताचं आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात आलं. बांगलादेशविरुद्धच्या पराभवानेच भारताच्या पॅकअपचा पाया रचला गेला होता.

फोटो स्रोत, Getty Images
2009मध्ये मुर्तझाकडे बांगलादेश संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. दुखापतींच्या ग्रहणामुळे मुर्तझा सतत संघाच्या आतबाहेर होत राहिला. मात्र कामगिरीच्या बाबतीत मुर्तझा अव्वल राहिला.
क्रिकेटपटू राजकारणात प्रवेश करणं हे काही नवीन नाही. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना खासदार होणारा आणि खेळणारा मुर्तझा पहिलाच क्रिकेटपटू आहे. डिसेंबरमध्ये बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्या. निवडणुकांमध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने दमदार विजय मिळवला.
मुर्तझानं हसीना यांच्या अवामी लीगच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मुर्तझाने नरेल या ठिकाणच्या मतदारसंघातून निवडणूक लढवत होता. मुर्तझा अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून आला. मुर्तझाला निवडणुकीत 2,74, 418 मतं मिळाली. अवामी लीगच्या नेतृत्वातल्या आघाडीला 300पैकी 260 जागांवर विजय मिळवला. विजयासह शेख हसीना चौथ्यांदा पंतप्रधान झाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
हा माझा शेवटचा वर्ल्ड कप असेल असं मुर्तझा म्हणाला होता मात्र क्रिकेटमधून इतक्यात निवृत्ती घेणार नाही असं त्याने स्पष्ट केलं आहे. मात्र मुर्तझाच्या शरीराला दुखापतींनी दिलेला वेढा लक्षात घेता तो कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे हे नक्की.
दुखापतींच्या कल्लोळातही मुर्तझा वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा विश्वासार्ह शिलेदार राहिला. 2003, 2007, 2015 आणि 2019 अशा चार वर्ल्ड कप मोहिमांमध्ये मुर्तझा भक्कमपणे उभा होता. शेवटच्या वर्ल्ड कपमध्ये मुर्तझा लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही.
मुर्तझाची वर्ल्ड कपमधली कामगिरी
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








