वर्ल्ड कप 2019 : भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचाच खेळ

पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

अंपायर्सनी वेळोवेळी खेळपट्टीची पाहणी केली मात्र मध्ये मध्ये पडणाऱ्या पावसामुळे खेळपट्टी निसरडी झाली होती. खेळपट्टी आणि बाकीचा भाग ओलसर असल्यामुळे अंपायर्सनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

सामना रद्द होऊनही न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत 7 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ तीन सामन्यात 5 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

"खेळपट्टी निसरडी आणि ओली असल्याने खेळ रद्द करण्याचा निर्णय योग्यच होता. दोन्ही संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळे एक गुण विभागून मिळणं रास्त आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना आहे. त्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. या लढतीची नेहमी चर्चा होते. मात्र मैदानात उतरल्यानंतर नंतर सगळं शांत असतं.

बाहेरून बघताना वातावरण खूपच आक्रमक वाटू शकतं, मात्र ठरवलेल्या योजनांची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. भारत-पाकिस्तान लढत हा कोणत्याही स्पर्धेतला मोठा सामना असतो. या सामन्याचा भाग होता येणं हा सन्मान आहे. या सामन्यात सर्वोत्तम खेळ होतो. शिखरच्या हाताच्या बोटाला प्लॅस्टर घालण्यात आलं आहे. त्याच्या दुखापतीचा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात शिखर फिट होईल अशी आशा आहे. त्याच्या पुनरागमनाची आम्हाला आस आहे", अशा शब्दांत कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)