World Cup 2019: Ind vs Aus - टीम इंडिया ऑस्ट्रेलियाची सद्दी मोडणार का?

आरोन फिंच वि. विराट कोहली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आरोन फिंच वि. विराट कोहली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय आणि त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्ह्जवरून उद्भवलेला वाद बाजूला सारत टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरं जात आहे.

या लढतीपूर्वी भारतीय संघाने पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला नमवलं आहे तर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला हरवलं आहे.

कुणाची बॅटिंग मजबूत?

डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, स्टिव्हन स्मिथ या तिघांची भारताविरुद्धची कामगिरी नेहमीच चांगली होते. बॉल टँपरिंग प्रकरणातील सहभागामुळे वॉर्नर-स्मिथ जोडीवर वर्षभराची बंदी घालण्यात आली होती.

बंदीची शिक्षा पूर्ण झाल्यावर वॉर्नरने IPL स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडली. वॉर्नरचा फॉर्म टीम इंडियासाठी अडचणीचा ठरू शकतो.

भारत, ऑस्ट्रेलिया, वर्ल्ड कप2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतो.

स्टिव्हन स्मिथला रोखणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. कर्णधार म्हणून मोठी खेळी करण्यासाठी फिंच उत्सुक आहे. उस्मान ख्वाजाच्या जागी शॉन मार्शला संधी मिळू शकते.

सातत्य ही ग्लेन मॅक्सवेलसाठी नेहमीची चिंतेचा विषय असतो. मात्र मॅक्सवेलला सूर गवसल्यास भारतासाठी धोक्याचं ठरू शकतं. अॅलेक्स कारे, नॅथन कोल्टिअर नील आणि पॅट कमिन्स फलंदाजी करू शकतात.

तर भारताकडून रोहित शर्माने सलामीच्या लढतीतच शतक झळकावून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. शिखर धवनची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी चांगली राहिली आहे. धवन-रोहितच्या जोडीकडून दमदार सलामीची अपेक्षा आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कॅप्टन कोहली झटपट बाद झाला होता. मात्र ऑस्ट्रेलियासारख्या अव्वल संघाविरुद्ध कोहलीचं पिचवर थांबणं महत्त्वाचं आहे. लोकेश राहुल आणि केदार जाधव यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया खडतर आव्हान असेल.

त्याशिवाय महेंद्रसिंग धोनीचा अनुभव टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध हार्दिक पंड्या या सामन्यात काय करतो हे बघणं उत्सुकतेचं आहे.

भारत, ऑस्ट्रेलिया, वर्ल्ड कप2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टीव्हन स्मिथ आणि आरोन फिंच सराव करताना

बॉलिंगची ताकद निर्णायक

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत सुरुवात विकेट्स घेत केली. मात्र कागिसो रबाडा, ख्रिस मॉरिस आणि अँडिले फेलुक्वायो या तळाच्या फलंदाजांना बाद करण्यात भारतीय बॉलर्सना अपयश आलं.

जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. ऑस्ट्रेलियाच्या ताकदवान बॅटिंग लाईनअपला रोखायचं असेल तर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ही जोडगोळी महत्त्वाची आहे.

भागीदारी तोडण्यात माहीर हार्दिक पंड्याकडून अपेक्षा आहेत.

भारत, ऑस्ट्रेलिया, वर्ल्ड कप2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युझवेंद्र चहल

मिचेल स्टार्कने वेस्ट इंडिजविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या. भारताला स्टार्कसह पॅट कमिन्ससमोर सावधपणे खेळावं लागेल. नॅथन कोल्टिअर नील, मार्कस स्टोनिअस यांच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याची भारतीय संघाचे डावपेच असू शकतात. झंपाने अनेकदा भारतीय खेळाडूंना त्रास दिला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे कोणत्याही क्षणी पुनरागमन करण्याची क्षमता आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 4 बाद 38 अशी अवस्था झालेल्या ऑस्ट्रेलियाने 288 धावांची मजल मारली. भारतीय संघाला कोणत्याही क्षणी बेसावध राहून चालणार नाही.

हेड टू हेड

वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये 11 सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचं पारडं 8-3 असं जड आहे.

भारतीय संघाने 1983, 1987 आणि 2011 वर्ल्ड कप लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाला नमवलं आहे. 2015 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत दिमाखात वाटचाल केली होती. मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर 95 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती.

एकूण आकडेवारी पाहिली तर या दोन संघांमधील 136 लढतीत ऑस्ट्रेलियाचा संघ 77-49 असा पुढे आहे.

भारत, ऑस्ट्रेलिया, वर्ल्ड कप2019

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विराट कोहली-आरोन फिंच

खेळपट्टी आणि हवामान

ओव्हलच्या मैदानावर धावांचा पाठलाग करणं आव्हानात्मक आहे. त्यामुळे टॉस महत्त्वपूर्ण ठरेल. थोडा पाऊस हजेरी लावू शकतो मात्र निरभ्र वातावरण राहण्याची शक्यता आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

संघ

भारत: विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक आणि विजय शंकर.

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, जेसन बेहनड्रॉफ, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, नॅथन कोल्टिअर नील, नॅथन लियॉन, अडम झंपा, अलेक्स कारे, केन रिचर्डसन, मार्कस स्टोनिअस.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)