हवामान बदल : दोन्ही ध्रुवांना पुन्हा गोठवून जागतिक तापमान वाढ रोखण्याची शास्त्रज्ञांची योजना

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पल्लव घोष
- Role, सायन्स करस्पाँडंट, बीबीसी न्यूज
हवामान बदलामुळे होत असलेलं पृथ्वीचं नुकसान भरून काढण्यासाठी एक नवीन संशोधन केंद्र उभारण्याची केंब्रिज विद्यापिठाच्या वैज्ञानिकांची योजना आहे. या केंद्रामध्ये हवामान बदल रोखण्यासाठीच्या नव्या उपाययोजनांवर संशोधन करण्यात येईल.
दोन्ही ध्रुवांवरचा बर्फ पुन्हा गोठवणे, वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वायू कमी करणे यासारख्या नव्या पर्यायांवर या केंद्रात अभ्यास करण्यात येईल.
पृथ्वीचं घातक आणि कधीही भरून न निघणारं नुकसान टाळण्यासाठी सध्या जे उपाय योजले जात आहेत ते पुरेसे नाहीत. त्यातूनच हे केंद्र उभारण्याची संकल्पना पुढे आली.
जगातला हा अशाप्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे आणि यामुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा अंदाज आहे.
युके सरकारचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. सर डेव्हिड किंग यांच्या पुढाकारानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
बीबीसीशी बोलताना प्रा. सर डेव्हिड किंग म्हणाले, "आपण पुढच्या दहा वर्षांत जे करू त्यावरून मानवतेच्या पुढच्या दहा हजार वर्षांचं भवितव्य ठरणार आहे. या एकमेव मुद्द्याला पूर्णपणे समर्पित असं एकही मोठं केंद्र जगात कुठेच नाही."
सर डेव्हिड किंग यांनी वर्णन केलेल्या काही उपायांना ढोबळमानाने जैव अभियांत्रिकी (geoengineering) म्हटलं जातं.

फोटो स्रोत, NOAA/SCIENCE PHOTO LIBRARY
The Centre For Climate Repair हे केंद्र डॉ. एमिली शकबर्ग यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कॅम्ब्रिज विद्यापीठातल्या कार्बन न्यूट्रल फ्युचर इनिशिएटिव्ह या प्रकल्पाचा एक भाग आहे.
त्या सांगतात, "हवामानाची समस्या सोडवणे" हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
त्या पुढे म्हणतात, "हे व्हायलाच पाहिजे आणि त्यात अपयशी ठरणं परवडणार नाही."
हा उपक्रम वैज्ञानिक, इंजिनिअर्स आणि सामाजिक शास्त्रज्ञांना एकत्र आणणारा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
"आपल्या काळातलं हे सर्वात मोठं आव्हान आहे आणि सर्व प्रयत्नांनिशी त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे," असंही डॉ. शकबर्ग यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं.
ध्रुवांना पुन्हा गोठवणे

दोन्ही ध्रुवांना पुन्हा गोठवण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे ध्रुवांवरचे ढग "अधिक प्रकाशमान" करणे.
यात समुद्राचं पाणी मानवरहित होडींमधून मोठ्या पाइप्सधून ठराविक उंचीपर्यंत फवारलं जातं. यातून मिठाचे बारीक बारीक कण तयार होऊन ते ढगांमध्ये सोडले जातात. ढग प्रसरण पावतात आणि अधिकाधिक उष्णता परावर्तित करतात. या प्रक्रियेमुळे ढगांच्या खालचा परिसर थंड होतो.
कार्बन डायऑक्साईडचा पुनर्वापर

वातावरण बदल रोखण्यासाठी carbon capture and storage (CCS) म्हणजेच कार्बन गोळा करून त्याची साठवणूक करण्याची पद्धत अस्तित्वात आहे. यातल्याच आणखी एका वेगळ्या पद्धतीवरही संशोधन सुरू आहे.
CCS पद्धतीत कोळसा किंवा गॅसवर चालणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पातून किंवा स्टील प्रकल्पातून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड गोळा करून तो जमिनीखाली साठवून ठेवतात.
या पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत शेफिल्ड विद्यापीठातले प्राध्यापक पीटर स्टायरिंग यांनी शोधून काढली आहे. या पद्धतीला carbon capture and utilisation (CCU) म्हणजेच कार्बन गोळा करून त्याचा वापर करणे म्हणतात. साउथ वेल्समधल्या पोर्ट टॅलबोट इथे असलेल्या टाटा स्टीलच्या प्रकल्पात या नव्या पद्धतीद्वारे कार्बन डायऑक्साईडच्या प्रभावी पुनर्वापरावर प्रायोगिक तत्त्वावर संशोधन सुरू आहे.
कार्बन डायऑक्साईडचा इंधन म्हणून वापर कसा कराल?
प्रा. स्टायरिंग यांच्या मते कंपनीच्या आवारातच प्रकल्प उभारून तिथल्या टाकाऊ उष्णतेचा वापर करून फॅक्ट्रीमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचं इंधनात रुपांतर करण्याची ही योजना आहे.
ते सांगतात, "आपल्याकडे फॅक्ट्रीतच हायड्रोजनचा स्रोत आहे. कार्बन डायऑक्साईडचा स्रोत आहे. उष्णतेचा स्रोत आहे आणि अक्षय्य ऊर्जा निर्मितीचाही स्रोत आहे."
"या सर्वांचा वापर करून आम्ही सिंथेटिक इंधन तयार करणार आहोत."
हरित समुद्र

या संशोधन केंद्रात ज्या नवीन कल्पनांवर संशोधन करण्यात येणार आहे, त्यातलीच एक कल्पना म्हणजे हरित समुद्र. अधिकाधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर हिरवी वनस्पती उगवण्याची ही प्रक्रिया आहे.
या प्रक्रियेत समुद्रात लोहकण सोडले जातात. यामुळे समुद्रातल्या प्लँकटोनची (पाण्यात तरंगणारे सूक्ष्म जीवाणू) झपाट्याने वाढ होते.
यापूर्वी करण्यात आलेल्या प्रयोगात असं आढळलं, की या प्रक्रियेनंतरही पुरेशा प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषला जात नाही आणि त्यामुळे पर्यावरणाला धोकाही निर्माण होऊ शकतो.
मात्र, यॉर्क विद्यापीठातले प्राध्यापक कॅलम रॉबर्ट्स यांच्या मते शक्यतेच्या पलिकडे वाटणाऱ्या पर्यायांवर विचार करायला हवा आणि शक्य झाल्यास त्यावर कृती करायला हवी.
याचं कारण म्हणजे घातक आणि संभाव्यतः अपरिवर्तनीय असा वातावरण बदलही कल्पनेच्या पलीकडचा आहे.
प्रा. रॉबर्ट सांगतात, "माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला लोक मानवनिर्मित उपायांनी प्रवाळ जतन करण्याला भीतीपोटी नकार द्यायचे."
"मात्र, आता ते या पर्यावरणाकडे हताशपणे बघत आहेत आणि आज सर्व पर्याय उपलब्ध आहेत."
जनुकीय सुधारणा करून उष्णता-रोधक प्रवाळ निर्मिती किंवा समुद्रातील आम्ल (acid) कमी करण्यासाठी रसायनांचा वापर यासारखे पर्याय आता उपलब्ध आहेत.
प्रा. रॉबर्ट्स सांगतात, "या क्षणी मला असं वाटतं, की वातावरण बदल सुसह्य करण्यासाठी निसर्गाचीच मदत घेणं अधिक योग्य पर्याय आहे. मात्र, चांगल्या भवितव्याकडे वाटचाल करण्यासाठीचं साधन म्हणून नवीन (अधिक मूलगामी) पर्याय शोधणंही महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं."
अशक्याचा विचार
अशा कल्पनांचे बरेच नकारात्मक परिणामही होऊ शकतात. त्या अव्यवहार्यही ठरू शकतात.
मात्र, केंब्रिज विद्यापीठात समुद्र भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले पीटर वॉडम्स यांच्या मते कार्बन डाय ऑक्साईडचं उत्सर्जन नैसर्गिकरित्या कमी होणं पुरेसं नाही. त्यामुळे नवनव्या कल्पनांच्या नकारात्मक परिणामांवर मात करता येईल का, या अनुषंगाने त्यावर योग्य पद्धतीने विचार व्हायला हवा.
प्रा. वॉडम्स म्हणतात, "आपण कार्बन उत्सर्जन कमी केल्यास जागतिक तापमान वाढीचा दर कमी होईल. मात्र ते पुरेसं नाही. कारण तापमान वाढ आधीच खूप जास्त आहे आणि वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचं प्रमाणही खूप जास्त आहे."
ते पुढे सांगतात, की 'क्लायमेट रिपेअर'मुळे वातावरणातला हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जाईल. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडची वातावरणातली सध्याची पातळी कमी होऊन वातावरण खऱ्या अर्थाने थंड होऊन ग्लोबल वॉर्मिंगपूर्वीची परिस्थिती अस्तित्त्वात येईल."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








