ज्युलियन असांजः कोण आहेत विकिलीक्सचे संस्थापक? काय आहेत त्यांच्यावर आरोप?

विकिलीक्सचे सह-संस्थापक ज्युलियन असांज यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांप्रकरणी फेरचौकशी होणार आहे. असांज यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या वकिलांच्या मागणीवरूनच स्वीडनच्या न्यायालयाने त्यांच्यावरील आरोपांची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले.

असांज यांनी यापूर्वीच त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

2012 साली त्यांनी लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता. आपल्यावरील आरोपांप्रकरणी स्वीडनकडे प्रत्यार्पण करावं लागू नये, यासाठी त्यांनी इक्वेडोरच्या लंडनस्थित दूतावासात आश्रय घेतला होता.

केवळ स्वीडनच नाही तर असांज यांना ताब्यात घेण्यासाठी अमेरिकाही प्रयत्नशील होती.

2010 साली विकिलीक्सने महत्त्वाची लष्करी आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारासंबंधी कागदपत्रं प्रसिद्ध केल्याप्रकरणी असांज यांच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेकडून दबाव आणला जात होता.

कोण आहेत ज्युलियन असांज?

ज्युलियन असांज यांचा जन्म 1971 साली ऑस्ट्रेलियातील टाउन्सव्हिल इथं झाला. त्यांच्या आई-वडिलांची फिरती नाटकमंडळी होती. त्यांचं बालपण तसं कठीण गेलं.

वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी ज्युलियन असांज वडील बनले आणि नंतर या मुलाच्या कस्टडीच्या कायदेशीर लढाईमध्येदेखील अडकले.

असांज यांनी कॉम्प्युटरमध्ये गती होती आणि 1995 साली हॅकिंगमध्ये दोषी आढळल्यानं त्यांना हजारो ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा दंडही भरावा लागला होता. पुन्हा अशा प्रकारचं कृत्य न करण्याचं मान्य केल्यानं असांजचा तुरूंगवास टळला होता.

मेलबर्न विद्यापीठामध्ये फिजिक्स आणि मॅथ्स शिकायला जाण्यापूर्वी त्यानं इंटरनेटसंबंधी पुस्तक लिहायलाही मदत केली होती.

2006 साली असांज यांनी काही समविचारी लोकांसोबत 'व्हिसल ब्लोइंग' वेबसाइट विकिलीक्सची सुरूवात केली.

विकिलीक्सचं नेमकं झालं काय?

चित्रपट, उद्योगापासून राष्ट्रीय सुरक्षा आणि युद्धापर्यंतच्या सर्व विषयांवरील अनेक देशांतील गोपनीय कागदपत्रं विकिलीक्सनं प्रसिद्ध केली होती.

बगदादमध्ये अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टरनं कशाप्रकारे 18 सामान्य नागरिकांना मारलं याचा एक व्हीडिओ विकिलीक्सनं 2010 साली प्रसिद्ध केला. त्यानंतर ही साइट प्रकाशझोतात आली. त्याचवर्षी विकिलीक्सनं अमेरिकन लष्कराची अनेक गोपनीय कागदपत्रं उघड केली.

अफगाणिस्तान युद्धाच्या वेळेस अमेरिकन लष्कराकडून कशा प्रकारे निरपराध नागरिकही मारले गेले होते, हे या कागदपत्रांमधून स्पष्ट होत होतं.

इराक युद्धाशी संबंधित कागदपत्रांमधून अमेरिकन लष्कराकडून 66 हजार नागरिकही मारले गेल्याचं उघड झालं.

या सर्व प्रकारानंतर अमेरिकन सरकारनं सुरक्षेशी संबंधित गोपनीय कागदपत्र उघड केल्याप्रकरणी असांजवर कारवाईचे संकेत दिले.

स्वीडनमधील आरोप नेमके काय आहेत?

स्वीडननेही 2010 साली असांज विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट काढलं. असांजवर लैंगिक शोषणाचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यांना युकेमध्ये अटक करण्यात आली आणि नंतर जामीनही मंजूर झाला.

त्यानंतर स्टॉकहोमला व्याख्यान द्यायला गेले असताना असांज यांनी एका महिलेवर बलात्कार केला आणि अजून एका महिलेचं लैंगिक शोषण केलं असल्याचा दावाही करण्यात आला.

असांज यांनी आपल्यावरील हे दोन्ही आरोप फेटाळून लावले आणि आपल्याविरोधातील हे आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचं म्हटलं.

इक्वेडोरच्या दूतावासामध्ये आश्रय

स्वीडनमधील चौकशी टाळण्यासाठी असांज यांनी 2012 साली इक्वेडोरच्या लंडनमधील दूतावासात आश्रय घेतला.

गोपनीय कागदपत्रं प्रसिद्ध केल्याच्या आरोपाबद्दल आपल्याला अमेरिकेच्याही ताब्यात देऊन खटला दाखल केला जाईल, अशी भीती असांज यांनी व्यक्त केली होती.

इक्वेडोरच्या दूतावासाची निवड करण्यामागे एक खास कारण होतं. या दक्षिण अमेरिकन देशाचे तत्कालीन अध्यक्ष राफेल कोरिआ हे विकिलीक्सचे पुरस्कर्ते होते.

असांज दूतावासात वास्तव्य करत असताना त्यांना या केसबद्दल औपचारिकत्या सूचित करणं कठीण होत असल्यानं स्वीडननं असांजविरोधातील चौकशी थांबविण्याचा निर्णय 2017 मध्ये घेतला. त्यांच्यावरील अन्य दोन आरोपही 2015 साली काढून टाकण्यात आले होते.

स्वीडननं जरी असांजवरील आरोप काढण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांनी इक्वेडोरमधील दूतावासातील आपला आश्रय कायम ठेवला.

इक्वेडोरनं काढून घेतला राजाश्रय

2017 साली इक्वेडोरमध्ये सत्तापालट झाला. लेनिन मोरेनो यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. त्यानंतर असांज याचे इक्वेडोरसोबतचे संबंध बिघडले.

इक्वेडोरनं असांजचा राजाश्रय काढून घेतला. गैरवर्तन, आंतराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आणि हेरगिरीचे आरोप करत इक्वेडोरनं असांजचा आश्रय काढून घेतला.

त्यानंतर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात असांज यांना लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात अटक केली गेली.

कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, असं म्हणत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी असांज यांच्या अटकेचं स्वागत केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)