इस्राईलचे माजी मंत्री गोवने सेगेव यांची इराणसाठी हेरगिरी केल्याची कबुली

इस्राईलचे माजी कॅबिनेट मंत्री गोवने सेगेव यांना 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. इराणसाठी हेरगिरी करत असल्याची कबुली त्यांनी दिल्याची माहिती इस्राईलच्या कायदामंत्र्यांनी दिली आहे.

सेगेव 1990 साली इस्राईलचे ऊर्जा मंत्री होते. नायजेरियामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असताना इराणने त्यांना हेरगिरीसाठी नियुक्त केल्याचा आरोप आहे.

इस्राईलचे अधिकारी आणि त्यांच्या काही महत्त्वाच्या वेबसाईटचा तपशील लीक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सेगेव यांना मेमध्ये इक्वाटोरियल जिनियामधून ताब्यात घेऊन इस्राईलला नेण्यात आले. त्यांच्यावर महत्त्वाची माहिती लीक करण्याचा आरोप सिद्ध झाला आहे.

63 वर्षीय सेगेव यांना 11 फेब्रुवारीला अधिकृतपणे शिक्षा सुनावण्यात येईल.

यावर इराणकडून अजून कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही.

इराणमध्ये 1979 च्या इस्लामी क्रांतीनंतर धार्मिक कट्टरतावादी गट सत्तेवर आला. तेव्हापासून इराणचे नेते इस्राईलच्या उच्चाटनाची मागणी करत आहेत. मुस्लीम भूमीवर बेकायदा कब्जा केल्यामुळे इस्राईलचं अस्तित्वच चुकीचं असल्याची इराणची भूमिका आहे.

सेगेव यांनी 2005 साली राजनयिक पासपोर्ट वापरून नेदरलँडहून इस्राईलमध्ये चुकीची एक्सपायरी डेट असलेली औषधं तस्करी केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

त्यांचा वैद्यकीय परवानाही रद्द करण्यात आला होता. मात्र 2007 साली तुरुंगातून सुटका झाल्यावर ते नायजेरियात गेले आणि त्यांचा वैद्यकीय परवाना परत देण्यात आला.

सेगेव यांनी नायजेरियात असताना 2012 साली इराणच्या दुतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि दोनवेळा इराणमध्ये जाऊन आल्याची कबुली त्यांनी दिल्याची माहिती शीन बेट या इस्राईलच्या अंतर्गत सुरक्षा संस्थेने दिली आहे.

इस्राईलमधील ऊर्जा क्षेत्र, सुरक्षा वेबसाईट यांची आणि इस्राईलच्या राजकीय आणि सुरक्षा संस्थातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती कोड भाषेत इराणला पुरवण्यासाठीची क्लासीफाईड संपर्क यंत्रणा सेगेव यांना देण्यात आली होती.

सेगेव यांनी हेरगिरीची कबुली दिली असली तरी "इराणच्या अधिकाऱ्यांना मूर्ख बनवून इस्राईलमध्ये परतण्याचा आपला इरादा असल्याचेही" त्यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

सेगेव यांच्या याचनेनंतर त्यांच्या आरोपपत्रातील "युद्ध काळात शत्रुराष्ट्राला मदत" करण्याचा आरोप काढून टाकण्यात आला आहे.

या प्रकरणातील इतर तपशील गुप्त ठेवण्यात आला आहे.

सेगेव यांच्या वकिलांनी स्थानिक येडीओथ रोन्होत या वर्तमान पत्राला प्रतिक्रिया देताना सांगितले, "या प्रकरणी जिल्हा अॅटोर्नींना अधिक तपशील हवे आहेत आणि एकदा ते मिळाले की सेगेव इराणच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होते मात्र त्यांची मदत करण्याचा त्यांचा हेतू नव्हता, हे सिद्ध होईल."

"त्यामुळेच त्यांच्या आरोपपत्रातून देशद्रोहाचा आरोप काढून टाकण्यात आला आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)