Edge of the Knife: केवळ 20 लोक बोलू शकणाऱ्या भाषेत सिनेमाची निर्मिती

    • Author, रोजी ब्लंट,
    • Role, बीबीसी न्यूज

समुद्र किनारा. एका ओळीनं उभी असलेली सुरुची झाडं आणि तिथल्या वाळूत समुद्रातून वाहून आलेला मुलाचा मृतदेह. आई धावत येऊन त्या निष्प्राण कलेवराला छातीशी कवटाळते आणि रडू लागते.

इकडे आदित्सी नावाचा माणूस जवळच्या जंगलाच्या दिशेने जोरजोरात ओरडत पळू लागतो. खवळलेल्या समुद्रामुळे बोट उलटल्यावर त्या मुलाला आदित्सीनं किनाऱ्यावर आणलेलं असतं. आपणच त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहोत असं त्याला वाटायला लागतं.

ही कथा आहे कॅनेडियन फॅमिली ट्रॅजिडी फिल्म 'एज ऑफ द नाईफ' किंवा 'स्गावाऊ कुऊना' चित्रपटातील. कुटुंबव्यवस्था, प्रेम, विश्वासघात, व्यक्तीला गमावणं अशा सर्व भावनिक मुद्द्यांवर हा सिनेमा आधारित आहे.

या सिनेमाचं सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण म्हणजे त्याची हैदा भाषा. द फर्स्ट पिपल्स कल्चर कौन्सीलच्या माहितीनुसार जगात ही भाषा बोलणारे केवळ 20 लोकच शिल्लक राहिले आहेत. ती भाषा अत्यंत वेगाने नामशेष होत चालली आहे.

हेलेन हाइग ब्राऊन आणि ग्वाई एडनशॉ यांनी हा सिनेमा तयार केला असून. एडनशॉ स्वतः हैदा समुदायातील असून त्याने चित्रपटाचं दिग्दर्शित केला आहे. 'एज ऑफ द नाईफ'मधून आम्ही कथा सांगत असलो तरी हैदा भाषा शिकण्याचा तो एक मार्गही ठरू शकतो', असं एडनशॉ म्हणतो.

डीएन ब्राऊन म्हणजे ग्वाई एडनशॉच्या आजीनेही या चित्रपटामध्ये काम केलं आहे. हैदा बोलणाऱ्या मोजक्या लोकांपैकी त्या एक आहेत.

या चित्रपटामुळं आमच्या मुलांना हैदा भाषा शिकण्यास मदत होईल असं त्यांचं मत आहे.

हैदा ग्वाई नावाच्या बेटांच्या समूहावर हैदा जमाती राहतात. कॅनडाच्या पश्चिमेस सुमारे 100 किमी अंतरावर ही बेटं आहेत. एज ऑफ द नाईफमधील कार्यकाळ 19 व्या शतकातील दाखवण्यात आला आहे.

सिनेमात दोन हैदा जमाती हिवाळ्यामध्ये खायला उपयोगी पडावे यासाठी अन्न तयार करायला एकत्र येतात. यातील हैदा लोक छातीवर गोंदलेले, अंगात स्प्रूस झाडांपासून तयार केलेले झगे घातलेले दाखवले आहेत.

सिनेमात एका कुटुंबाचं चित्रण करण्यात आलं आहे. हैदा ग्वाई द्वीपसमूहावर इंग्रजांनी 1853 साली वसाहत तयार केली. त्याला क्वीन शार्लोट बेटे असं नाव देण्यात आलं.

युरोपियन वसाहतवाद्यांनी हैदा लोकांमध्ये देवीसारख्या रोगांचे जंतू असलेल्या ब्लँकेटस आणि रूमाल वाटून त्यांच्यामध्ये रोगराई पसरवली असं मानलं जातं. यामुळे त्यांची संख्या 10,000 वरून 588 वर आली.

या अत्यंत क्रूरपणे राज्यं खालसा करण्याच्या पद्धतीची चिन्हं सिनेमात दिसून येतात. आदित्सीचं जंगलात पळून गेल्यावर बेभान होणं आणि आदिम माणसासारखं स्वतःला हरवून जगण्यापर्यंतचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे.

डीएन ब्राऊन आजी म्हणतात, शाळेत जर 'हैदा भाषा' बोलली तर नरकात जाल असं आमच्या पालकांना सांगण्यात आलं होतं. ही भाषा बोलण्यास शाळेत बंदी होती.

"आमच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि 100 टक्के त्यांच्यात मिसळले जाण्यासाठी त्यांनी हा मार्ग वापरला होता."

ग्वाई म्हणतो बहुतांश हैदांना आपली भाषा बोलता येत नसल्याची खंत वाटते.

हैदा - थोडक्यात माहिती

हैदा ही भाषा हैदा ग्वाई बेटांवर बोलली जाते. ब्रिटिश कोलंबियामधील हैदा बेटांवर ती बोलली जाते. शेवटच्या हिमयुगात म्हणजे सुमारे 11 हजार वर्षांपूर्वी माणसं राहायला लागली असं म्हटलं जातं.

हैदाच्या तीन बोलीभाषाही आहेत. या बोली कॅनडातील स्कीदेगेट आणि मॅसेटमध्ये बोलल्या जातात आणि अमेरिकेच्या अलास्कामध्ये ह्यादाबर्गमध्ये बोलल्या जातात. हैदा भाषा इतर जगापासून अत्यंत एकटी पडलेली आहे, सध्याच्या इतर कोणत्याही भाषांशी तिचा संबंध उरलेला नाही.

काही हैदा शब्दप्रयोग

Siingway laa - तुमचा दिवस चांगला जावो.

Gass ingu dang giidang? - कसे आहात?

Asanga dang hll King Gas sang - पुन्हा भेटू

Gasanguu siingaay Giieang - तिथलं वातावरण कसं आहे?

Gina waa dluxan gud ad kwaagid - सर्व काही इतर गोष्टींवर अवलंबून असते. (एक लोकप्रिय हैदा म्हण)

युनेस्कोच्या माहितीनुसार कॅनडामध्ये अशा 70 मूळनिवासी भाषा आहेत. द फर्स्ट पिपल्स कल्चरल कौन्सिलच्या माहितीनुसार यातील निम्म्या भाषा ब्रिटिश कोलंबियात बोलल्या जातात. ब्रिटिश कोलंबियामध्ये 1 लाख 72 हजार 520 मूळनिवासी आहेत. मात्र त्यांच्यापैकी 3 टक्के लोकच त्यांच्या मूळ भाषा सफाईदारपणे बोलू शकतात.

हा कल सर्व जगात दिसून येतो. नॅशनल जिओग्रफिक सोसायटी आणि द लिविंग टंग्स इन्स्टिट्यूट फॉर एन्डेंर्जड लँग्वेजेसचा अहवाल जगात दर दोन आठवड्यांना एक भाषा मृत होते असे सांगतो.

2019 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय मूळभाषा दिन म्हणून जाहीर केले असून त्या जपण्यासाठी कॅनडाने निधीमध्ये 50 लाख डॉलर्सवरून 11 कोटी 80 लाख डॉलर्स इतकी वाढ केली आहे.

या भाषा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे विनिपेगचे खासदार रॉबर्ट फाल्कन औलेट यांना वाटतं.

ते मूळनिवासी जमात क्री आणि इंग्लिश अशा मिश्र वंशाचे आहेत. 2017 साली संसदेत मूळनिवासी भाषेत बोलणारे ते पहिलेच राजकारणी ठरले. 'आपली भाषा बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. ज्यांची भाषा हीच त्यांचा इतिहास आणि संस्कृती आहे, त्याला विशेष मूल्य आहे. मूळनिवासी लोकांना आपण कॅनडावासी नसल्यासारखं वाटतं हे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. त्यांच्या मनात भयंकर राग आहे', असं रॉबर्ट सांगतात.

रॉबर्ट यांनी क्री भाषेत केलेल्या भाषणामुळे संसदेत मूळनिवासी भाषणांचं भाषांतर होण्याची सोय होण्याचा मार्ग सुकर झाला. मार्च महिन्यामध्य़े एपीटीएन टेलिव्हिजन नेटवर्कने पहिल्यांदाच हॉकीचा सामना क्री भाषेतून प्रसारित केला.

रॉबर्ट फाल्कन यांच्यामते सिनेमा असो वा संसद किंवा खेळ, या प्रत्येक माध्यमातून मूळनिवासी लोकांना तुम्ही महत्त्वाचे आहात हे सांगण्याची संधी मिळते.

एरिका रयान-गाग्न ही एज ऑफ द नाइफची सूत्रधार होती. तसेच ती सेटवरची भाषाशिक्षिकाही होती. ती हैदा जमातीची आहे आणि केवळ या सिनेमाच्या निमित्ताने ती ही भाषा शिकली.

हैदा भाषा पहिल्यांदाच सिनेमात ऐकल्यावर कदाचित नेहमीच्या प्रवाही इंग्रजीच्या तुलनेत समजायला आणि ऐकायला कठीण वाटू शकते. पण एरिका म्हणते "ती सगळी केवळ शिकण्याची प्रक्रिया नव्हती तर आपल्या अंतरंगातील भाषा बाहेर काढण्याची होती. हैदा उच्चार करण्यात मला कोणताच अडथळा येत नव्हता. ती भाषा माझ्या अंतरंगात आधीपासूनच होती."

या फिल्ममध्ये हैदाभाषी नसलेले 22 लोक काम करत होते. त्यांच्यासाठी हैदा जमातीच्या ज्येष्ठ सदस्यांकडून प्रशिक्षण देण्यात आले.

एरिका सांगते, "आम्ही सर्व कलाकार आणि हैदी भाषकांना दोन आठवड्यांसाठी एकत्र आणलं होतं. तेथे कलाकार ही भाषा कशी बोलायचे त्यातील शब्द कसे लक्षात ठेवायचे हे शिकले. तसेच भाषेला आणि आमच्या पूर्वजांना कसा न्याय द्यायचा हे शिकले."

हैदासारख्या अनेक भाषा केवळ एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे मौखिकपद्धतीने प्रसारित होतात पण लिहून ठेवण्याची पद्धत नसल्यामुळे अशा भाषा मृत होतात. पण हैदामध्य़े लिखित साहित्य उपलब्ध आहे, त्यामुळे नव्याने शिकणाऱ्यांना ते उपयोगी पडू शकते.

चित्रपटाची पटकथा लिहिताना लेखकांनी ती आधी इंग्लिशमध्ये लिहिली आणि नंतर हैदा भाषिक ज्येष्ठांनी त्याचा अनुवाद केला. हे ज्येष्ठ लोक म्हणजे आमच्या हृद्याची स्पंदनं आणि आमचा कणाच होते असं एरिका सांगते.

आता 265 लोक हैदा शिकत आहेत. आता पहिल्यांदाच ती शाळेत शिकवली जात आहे. भाषा शिकण्यासाठी नव्या पीढीला असा सिनेमाचा फायदा होईल.

डिएन ब्राऊन सांगतात, "आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा लोकांना यामध्ये रुची निर्माण करता आली. तरूणांना यामध्ये भरपूर रस आहे. तिचा नातू ग्वाई हैदामध्ये बोलू लागल्यावर मला अभिमान वाटला असंही त्या सांगतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)