You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्लेअर पोलोसाक: सायन्स टिचर ते पुरुषांच्या क्रिकेट मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय महिला अंपायर
क्रिकेटविश्वात नवं काहीतरी पहिल्यांदा करण्याचा मान बहुतांशवेळा ऑस्ट्रेलियाच्या नावावर असतो. केरी पॅकर लीग असो किंवा पिंक बॉल, ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सतत नवे पायंडे पडत असतं.
रविवारी ऑस्ट्रेलियाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला तो क्लेअर पोलोसाक यांनी. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरिंग करणाऱ्या क्लेअर पहिल्या महिला अंपायर ठरल्या आहेत.
क्लेअर यांनी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन 2 मधल्या नामिबिया आणि ओमान यांच्यातील सामनादरम्यान अंपायरिंग केलं.
दोन वर्षांपूर्वी क्लेअर यांनी ऑस्ट्रेलियातील JLT कपमध्ये पुरुषांच्या सामन्यात अंपायरिंग केलं होतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी आणि एलोइस शेरिडन या महिला अंपायर जोडगोळीने बिग बॅश ट्वेन्टी-20 लीग स्पर्धेच्या सामन्यात एकत्र अंपायरिंग केलं होतं.
"पुरुषांच्या वनडेत अंपायरिंग करण्याचा अनुभव अनोखा होता. महिला अंपायर्सना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. महिला अंपायर्स का असू नयेत? व्यवस्थेतील अडथळे दूर सारत, या कामाविषयी जनजागृती करत वाटचाल करणं आवश्यक आहे," असं क्लेअर यावेळी म्हणाल्या.
"अंपायरिंग हे एकटीचं काम नसून टीमचं आहे. इथपर्यंतच्या वाटचालीसाठी न्यू साऊथ वेल्स क्रिकेट अंपायर्स अँड स्कोअरर्स असोसिएशन, क्रिकेट ऑस्ट्रेलिया, कुटुंबीय, मित्रपरिवार यांची आभारी आहे'', अशा शब्दांत क्लेअर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
क्लेअर यांनी आतापर्यंत महिला क्रिकेटमध्ये 15 सामन्यात अंपायरिंग केलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या महिला वर्ल्ड ट्वेन्टी-20 स्पर्धेतल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतीत क्लेअर अंपायर होत्या.
31 वर्षीय क्लेअर या माध्यमिक शाळेत शास्त्र विषयाच्या शिक्षिका आहेत. गौलबर्न शहरातून सुरू झालेला क्लेअर यांचा प्रवास आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला आहे.
2003 मध्ये क्लेअर यांनी पहिल्यांदा अंपायरिंगची परीक्षा दिली. क्रिकेटविषयीच्या ज्ञानामुळे वडिलांनी क्लेअर यांना प्रोत्साहन दिलं. मात्र त्यावेळी अंपायरिंगच्या परीक्षेत त्यांना यश मिळालं नाही आणि त्यांनी शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला.
शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी अंपायरिंग करायला सुरुवात केली. स्थानिक पातळीवर अंपायरिंगचे टप्पे पार केल्यानंतर क्लेअर न्यू साऊथ वेल्स फिमेल अंपायर एन्गेजमेंट ऑफिसर आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)