You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुदान उठाव: सुदानमधल्या सत्तापालटाचे प्रत्यक्षदर्शी ठरले ठाणे येथील संतोष जोशी
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"मी याआधी असं काही घडताना कधीच पाहिलेलं नव्हतं. मला लोकांमधला जिवंतपणा, उत्साह दिसला. मी त्यांचं खडतर जगणं पाहिलं होतं, मला ते कधीच इतके खूश दिसले नव्हते." 11 एप्रिलला सुदानची राजधानी खार्टूममधल्या घडामोडींचं वर्णन करताना संतोष जोशी हे सांगतात.
सुदानमध्ये दोन दिवसांत दोन उठाव, अशी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. नाईल नदीच्या काठावर वसलेल्या या आफ्रिकन अरब देशात अजूनही अनिश्चिततेचं वातावरण आहे. तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या मनात काय सुरू आहे, हे आम्ही जाणून घेण्यासाठी आम्ही संतोष जोशी यांच्याशी बातचीत केली.
डिसेंबर २०१८ पासून सुदानमध्ये जनआंदोलन सुरू आहे, ज्याची परिणती 11 एप्रिल रोजी एका लष्करी उठावात झाली. राष्ट्राध्यक्ष ओमार अल बशीर यांची जवळपास तीस वर्षांची सत्ता उलथवून टाकत लष्करानं देशाचा ताबा घेतला. दोन वर्षं सत्तेत राहून मग निवडणुका घेऊ, अशी ग्वाही उठावाचे प्रमुख अवाद इब्न औफ यांनी दिली.
पण जनतेला ते पटलं नाही. बशीर यांच्या तीस वर्षांच्या देशाला वांशिक संघर्ष आणि फाळणीसह आर्थिक संकटांचा सामना करावा लागला होता. त्याला विटलेल्या आंदोलकांनी लोकशाहीची मागणी लावून धरली आणि 24 तासांतच औफ यांनाही पायउतार व्हावं लागलं.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुदानमधले भारतीय तिथे लवकर शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा करत आहेत.
भारताचं मित्रराष्ट्र
सुदानसोबत भारताचे पूर्वीपासूनच अगदी घनिष्ठ ऐतिहासिक, राजनैतिक आणि आर्थिक संबंध आहेत. भारतीय परराष्ट्र खात्याच्या अंदाजानुसार तिथे पंधराशेहून अधिक भारतीय वंशाचे लोक राहतात. अनेक भारतीय कंपन्यांचा सुदानशी व्यापार चालतो अथवा तिथं गुंतवणूक आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिकही नोकरीच्या निमित्तानं या देशाला भेट देतात.
संतोष जोशी त्यापैकीच एक आहेत. मूळचे ठाण्याचे संतोष गेली 10 वर्षं कामानिमित्त विविध आफ्रिकन देशांत वास्तव्यास आहेत. 2016 सालापासून ते सुदानची राजधानी खार्टुममध्ये राहतात. तिथल्या लोकांविषयी, संस्कृतीविषयी ते आपुलकीनं बोलतात.
"सुदानमध्ये आल्यापासून मला चांगले अनुभव आले आहेत. मी 2016 सालच्या नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा इथे आलो, तेव्हा हवामानही चांगलं होतं. सगळं तसं सुरळीत असल्याचं दिसत होतं. सुदानचे लोकही चांगले आहेत, मदतीसाठी तत्पर वाटले. मला इथं घरच्यासारखंच, आरामदायी वाटलं.
"अर्थात इथंही आव्हानं आहेत. मला अरेबिक भाषा येत नाही. पण माझे सहकारी नेहमी मदत करतात. सुदानच्या संस्कृतीविषयी कळल्यावर मीही प्रभावित झालो होतो," संतोष सांगतात.
पण सगळ्यांचंच आयुष्य सुरळीत नव्हतं. "आम्हा परदेशी नागरिकांना इथं सुरक्षिततेचे प्रश्न किंवा अडचणींना फारसं सामोरं जावं लागलं नाही. आमचं आयुष्य फारसं खडतर नव्हतं. पण इथे बाकीच्या लोकांचं तसं नव्हतं. लोकांना सरकारकडून त्रासही होत असल्याचं मला दिसलं."
आंदोलनापूर्वीचं सुदान
सुदानमध्ये ओमार अल बशीर 1989 पासून सत्तेत होते. त्यांच्या दडपशाहीला लोक कंटाळले होते. गेल्या पंधरा वर्षांत तर आर्थिक निर्बंध, दार्फरचा वांशिक संघर्ष अशा संकटांनी सुदानला ग्रासलं होतं.
2011 साली सुदानची फाळणी झाली आणि बहुतांश तेलविहीरी 'दक्षिण सुदान' या नव्या देशाच्या ताब्यात गेल्या. त्यानंतर सुदानची आर्थिक स्थितीही आणखी ढासळली.
लोकांमधल्या असंतोषाचं संतोष जोशी वर्णन करतात. "लोकांच्या मनात खूपच राग होता. खुंटलेला विकास, फसलेली आर्थिक धोरणं, आरोग्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष, भ्रष्टाचार, राजकारण, अडचणी यांना सगळेच वैतागले होते."
2017 साली अमेरिकेनं सुदानवरचे आर्थिक निर्बंध उठवल्यावर लोकांच्या मनात थोडी आशा निर्माण झाली, पण ती फार काळ टिकली नाही.
"अमेरिकेच्या निर्णयानंतर इथलं आर्थिक संकट संपेल आणि विकासाला चालना मिळेल, असं लोकांना वाटलं होतं. पण झालं उलटंच. महागाई वाढतच गेली. लोकांचे पगार मात्र वाढले नाहीत, आणि त्यांना आर्थिक चणचण जाणवू लागली. लोक सरकारविषयी चर्चा करू लागले. अगदी जीवनावश्यक गोष्टींच्या किंमतीही सतत वाढत होत्या."
ब्रेडपासून आंदोलनाची सुरुवात
ब्रेडच्या किंमती वाढल्यानं आंदोलन आणखी पेटलं. संतोष सांगतात, "ब्रेड आणि बीन्स हे सुदानी लोकांचं मुख्य अन्न आहे आणि ब्रेडच्या वाढत्या किंमतींनीच ठिणगी पेटली. सर्वसामान्य लोकांना साधं जेवणही परवडत नव्हतं आणि त्यांच्यातली अस्वस्थता आम्हाला जाणवत होती. मग त्यात भर पडत गेली.
"आधी इंधनाची टंचाई निर्माण झाली आणि त्यानंतर नकदी तुटवडा जाणवू लागला. मी इथे आल्यापासून सुदानी पाऊंड कोसळतो आहे. मी येण्यापूर्वी काही काळ एका अमेरिकन डॉलरची किंमत 9-10 सुदानी पाऊंड एवढी होती. मी आलो तेव्हा ती 18 सुदानी पाऊंडापर्यंत वाढली. पण सध्या एका अमेरिकन डॉलरसाठी 70 सुदानी पाऊंड मोजावे लागतायत."
राजधानी खार्टुममध्ये परिस्थिती थोडी बरी होती, पण बाकीच्या देशात ती हाताबाहेर जाऊ लागली.
"19 डिसेंबरला अतबरा शहरात लोकांनी ब्रेडच्या वाढत्या किमतींविरोधात निदर्शन केलं. तिथून सुरू झालेल्या आंदोलनाचं लोण खार्टुमपर्यंत पोहोचलं. आम्हाला एक मोठी क्रांती घडताना दिसत होती."
या आंदोलनाचं नेतृत्त्व 'SPA' म्हणजे Sudan Professional Activists या गटानं केलं आहे. ज्यात वैद्यकीय, वकील, इंजिनीयर, शिक्षक अशा पेशांमधल्या सुशिक्षित नागरिकांचा समावेश आहे. त्यातील बहुतेकजण तरुण आहेत याकडे संतोष यांनी लक्ष वेधलं.
"तरुणांना त्यांचं भविष्य धोक्यात आल्याचं दिसत होतं. त्यांनी आंदोलनाची सूत्र हाती घेतली आणि निषेध मोर्चे काढायला सुरुवात केली. त्यांनी जेव्हा जेव्हा मोर्चा किंवा आंदोलनाची हाक दिली, लोक मोठ्यासंख्येनं त्यात सहभागी झाले."
6 एप्रिलला हे आंदोलन आणखी तीव्र झालं. "सुदानच्या इतिहासात 6 एप्रिलला महत्त्वाचं स्थान आहे, कारण त्याच दिवशी 1985 साली एका हुकुमशाहाची सत्ता उलथवण्यात आली होती. यावर्षी 6 एप्रिलला जनतेनं सरकारविरुद्ध आंदोलन सुरू केली त्याची परिणती मग उठावात झाली."
महिलांचा लक्षवेधक सहभाग
सुदानमधल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या. आंदोलकांमध्ये जवळपास 70 टक्के महिला होत्या, ज्यांनी जगाचं लक्ष सुदानकडे वेधून घेतलं.
मोर्चात भाग घेणाऱ्या, घोषणा देणाऱ्या महिलांची दृश्यं पाहून जगभरातील अनेकांना आश्चर्य वाटलं. पण सुदानसाठी ही गोष्ट नवी नाही. कारण याआधीही ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठीची लढाई किंवा हुकुमशाहांविरुद्धच्या आंदोलनांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
वास्तविक सुदानमध्येही महिलांना समान हक्कांसाठी लढावं लागतं, पण त्या आपला आवाज उठवतायत ही गोष्ट संतोष यांच्यासह अनेकांना कौतुकास्पद वाटते.
"इतर काही इस्लामिक देशांपेक्षा सुदानमध्ये महिलांसाठी परिस्थिती बरी आहे. इथं महिलांची संख्याही जास्त आहे. महिला इथं ऑफिसमध्ये जाऊन काम करू शकतात आणि समाजात सगळीकडे त्यांचा वावर आहे. सुदानच्या संसदेतही मोठ्या प्रमाणात महिला आहेत. पण स्वातंत्र्य आणि न्यायाची मागणी सगळेच करतायत, महिलांचाही अपवाद नाही."
महिला आणि तरुणांच्या या चळवळीला लवकरच यशही मिळालं. 1 एप्रिलला सुदानमध्ये सत्तांतर झालं.
सत्तांतरानंतर
"मी लोकांच्या डोळ्यांत चैतन्य पाहिलं. ते घोषणा देत होते, गात होते, आनंदात होते. मी या देशातल्या लोकांना इतकं आनंदी झालेलं याआधी पाहिलं नव्हतं," असं संतोष सांगतात.
"मी दोन वर्षांपासून इथल्या लोकांचं कष्टांनी भरलेलं जीवन पाहिलंय. त्यामुळं त्यांचा उत्साह पाहून मलाही आनंद आणि विश्वास वाटला. लष्करानं अधिकृत घोषणा करण्याआधीच लोकांनी जणू उत्सव सुरू केला होता."
पण लष्करानं दोन वर्ष सत्ता ताब्यात घेतल्याचं कळताच वातावरण पुन्हा बदललं. "लोक ठाम आहेत आपल्या मागण्यांवर. त्यांना आणखी एक लष्करी राजवट नको आहे. त्यांनी लोकशाहीची मागणी केली आहे. आपल्या भारतात आहे तशी लोकशाही. त्यांनी आंदोलन थांबवलं नाही."
लोकांच्या दबावापुढे नमतं घेत नवे लष्करशहा अवाद इब्न औफ यांना 24 तासांतच पायउतार व्हावं लागल. सुदानची सूत्रं सध्या लेफ्टनंट जनरल अब्देल फताह अब्देलरेहमान बुऱ्हान यांच्या हाताखालील मिलिट्री काऊन्सिलकडे आहे. पण सुदानमध्ये पुढे काय होणार, हे अजूनही स्पष्ट नाही.
आशा आणि अनिश्चितता
काही काळासाठी सुदानचे विमानतळ आणि सीमारेषा बंद करण्यात आल्या होत्या. संतोष सध्या ऑफिसलाही जात नाहीयेत, कारण सुदानमध्ये बहुतांश व्यावसायिक संस्थांची कार्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. पण संतोष यांना सध्यातरी परिस्थिती फारशी चिंताजनक वाटत नाही.
"आंदोलकांचा भर अहिंसक निदर्शनांवर आहे. तरीही भारतीय दूतावासानं आम्हाला काळजी घेण्याची आणि शक्यतो घरीच थांबण्याची सूचना दिली आहे. आम्ही चौघंजण शहराच्या मुख्य भागातच राहतो. आणि कंपनीनंही आम्हाला पूर्ण मदत केली आहे."
तरीही काही समस्या आहेतच. "सुदानमध्ये अजूनही नगदी तुटवडा कायम आहे. अनेक ठिकाणी एटीएम आणि बँकांमध्येही नोटा नाहीत. आहेत तिथेही लोकांना लांब रांगा लावाव्या लागत आहेत. खात्यातून किती पैसे काढायचे यावर बंधनं असल्यानं, पैसे असूनही उपयोग नाही."
गेल्या तीन महिन्यांत जवळपास 38 जणांना आंदोलनात जीव गमवावा लागला. या सगळ्यातून सावरणं हे सुदानसाठी मोठं आव्हान ठरू शकतं.
संतोष सांगतात, "त्यांना अजून योग्य नेतृत्त्व मिळालेलं नाही. असं नेतृत्त्व जे पुढे घेऊन जाईल. सुदानमध्ये वस्तूंचा तुटवडा जाणवतोय, अर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यांना भ्रष्टाचाराला आळा घालावा लागेल. जो कुणी सत्तेत येईल, तो काही कुठली जादू करणार नाही. त्यांना अगदी शून्यातून देशाची उभारणी करायची आहे. हा कठीण, खडतर प्रवास आहे आणि तो एवढ्यात संपणार नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)