You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इथियोपिया अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
इथियोपियातील अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स शोधण्यात सोमवारी यश आलं आहे. रविवारी झालेल्या अपघातामध्ये 157 ठार झाले होते, यात 149 प्रवाशी आणि 8 कर्मचारी यांचा समावेश होता.
हा अपघात स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी 8.44 वाजता झाला. मृतांत 32 केनियन, 18 कॅनडेयिन, 8 अमेरिकन, 4 भारतीय आणि 6 ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे.
इथोपियन एअरलाइन्सचं बोइंग 737 Max 8 हे विमान इथियोपियाची राजधानी आदिस अबाबाहून केनियाची राजधानी नैरोबीकडं जात होतं. त्यावेळी राजधानीपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिशोफ्टू या शहरानजीक हे विमान कोसळलं.
अपघात झालेलं इथियोपिया बोइंग 737 विमान हे अगदी नवीन होतं. विमान कंपनीनं ते विमान 4 महिन्यांपूर्वीच घेतलं होतं.
हवाई वाहतूक तज्ज्ञ अलेक्स माकेराश यांच्या मते विमानानं उड्डाण घेतल्यावर 6 मिनिटानंतर रडारवरून गायब झालं.
इथियोपियन एअरलाइन्सचे विमान कोसळल्यावर सर्व प्रश्नांचा रोख अमेरिकन विमान निर्मिती कंपनी बोइंगकडे वळला आहे. गेल्या पाच महिन्यांमधील विमान अपघाताची ही दुसरी घटना आहे.
कसा झाला अपघात?
इथियोपियन एअरलाइन्सने याबाबत सांगितलं, स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.44 मिनिटांनी हे विमान कोसळले. अदिस अबाबा इथून सुटल्यावर केवळ 6 मिनिटांनी विमान कोसळले. राजधानीपासून आग्नेयेस 60 किमी अंतरावरील बिशोफ्तू गावाजवळ या विमानाला अपघात झाला. तसेच वैमानिकाने काही अडचणी कळवल्या होत्या आणि अदिस अबाबाला माघारी येण्याची परवानगी मागितली होती असंही या विमान कंपनीने सांगितलं आहे.
विमान अपघाताच्या कारणांचा विचार आता सुरू झाला आहे. याबाबत विमान कंपनीचे CEO तेवोल्ड गेब्रामरियम यांनी माध्यमांशी बोलता सांगितलं, "अशा स्थितीत कोणतीच शक्यता आम्ही नाकारू शकत नाही."
इथे दृश्यता ही चांगली होती, असं सांगण्यात येत असून पण विमानाची व्हर्टिकल स्पीड अस्थिर होता, असं एअर ट्रॅफिक मॉनिटरने सांगितलं. वरिष्ठ कॅप्टन यारेद गेटाचेव असं वैमानिकाचं नाव होतं. त्यांना विमान उडवण्याचा 8,000 तासांचा अनुभव होता, असं विमान कंपनीने स्पष्ट केलं आहे.
काय माहिती उपलब्ध आहे?
हा अपघात कसा घडला, याची माहिती उपलब्ध नाही. पण वैमानिकाने काही समस्या उद्भवल्याची माहिती दिली होती आणि राजधानीकडे परतावं लागेल, असं म्हटलं होतं. इथियोपियन एअरलाईन्सचे सीईओ टेवोल्ड जेब्रेमारियम यांनी सांगितलं की, "या क्षणी आपण कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. आंतरराष्ट्रीय नियमांनाचा विचार करता तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही."
Flightradar24ने दिलेल्या माहितीनुसार या विमानाची व्हिजिब्लिटी योग्य होती, पण व्हर्टिकल स्पीड अस्थिर होती.
या विमानाचे वैमानिक वरिष्ठ कॅप्टन यारेड गेटास्चिव कुशल वैमानिक होते, असं सांगण्यात आलं.
इथियोपिया, बोईंगचे तज्ज्ञ, यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड अपघाताबद्दल तपास करेल.
बोइंगवर प्रश्नचिन्ह
737 Max-8 हे विमान इतर विमानांच्या तुलनेत नवे आहे. 2017 मध्ये या विमानांनी व्यावसायीक उड्डाणांना सुरूवात केली. इथियोपियन एअरलाइन्सने आपल्या ताफ्यात 30 विमानांची वाढ केली होती. त्यामध्ये 6 विमाने 737 Max-8 प्रकारची होती. कोसळलेले विमान याच 6 विमानांमधील होते. 4 फेब्रुवारी रोजी या विमानाच्या देखरेखीची सर्व तपासणी झाली होती असं ट्वीट या विमानकंपनीनं केलं आहे.
या अपघातामुळं तीव्र दुःख झाल्याचं बोइंग कंपनीनं म्हटलं असून तांत्रिक मदतीसाठी एक टीम पाठवत असल्याचं स्पष्ट केलं.
या विमानाची लांबी 39.52 मीटर होती तर पंखांचा विस्तार 35.9 मीटर होता. या विमानाची आसनक्षमता 210 इतकी होती. यात LEAP-1B इंजिन वापरण्यात येतं.
दरम्यान चीन, इंडोनेशिया यांनी या मॉडेलच्या विमानांचं उड्डाण थांबवलं आहे. तर उत्तर अमेरिकेतील विमान कंपन्यांनी या तपासावर लक्ष असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)