You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सिंह पाळणं पडलं महागात; मालकाने गमावला जीव
चेक प्रजासत्ताकच्या मायकेल प्रासेक यांना सिंह पाळणं जीवावर बेतलं आहे. प्रशासनाचा विरोध असतानाही संघर्ष करून प्रासेक यांनी सिंहाला पाळलं होतं. मात्र या सिंहानेच त्यांचा जीव घेतला.
33 वर्षीय प्रासेक यांचा मृतदेह सिंहाच्या पिंजऱ्यात सापडला.
प्रासेक यांनी घराच्या परिसरातच एक सिंह आणि सिंहिणीला पाळलं होतं. 2016 मध्ये ते एका सिंहाला घरी घेऊन आले होते. त्यावेळी सिंहाचं वय 9 वर्षं होतं. प्रजननासाठी प्रासेक यांनी एका सिंहिणीलाही आणलं.
मात्र या आगळ्यावेगळ्या प्राणी प्रेमाला प्रासेक यांच्या शेजाऱ्यांनी तसंच शहरातील लोकांनी आक्षेप घेतला होता. सिंह प्रेम परिसरातल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतं असं त्यांचं म्हणणं होतं.
मात्र हे सगळं माहिती असूनही प्रासेक यांनी सिंह आणि सिंहिणीला जीडीशोफ या त्यांच्या गावातल्या घरात घेऊन आले. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या पिंजऱ्यात या दोघांना प्रासेक यांनी ठेवलं होतं.
स्थानिक प्रशासनानेही प्रासेक यांना सिंह पाळण्याची अनुमती दिली नव्हती. सुरुवातीला त्यांना पिंजरे बनवण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर सिंहांच्या अवैध प्रजननासाठी प्रासेक यांना दंड ठोठावण्यात आला.
चेक प्रजासत्ताकमध्ये वैयक्तिक पातळीवर असे प्राणी पाळण्यासाठी व्यवस्था नाही. प्राण्यांना त्रास होईल असं प्रासेक यांचं वर्तन न आढळल्याने सिंह, सिंहिणीला प्रासेक यांच्या घरातून नेण्यात आलं नाही.
अशाप्रकारे त्यांना सिंह पाळण्यासाठी मंजुरी मिळाली. मागच्या उन्हाळ्याच्या हंगामात प्रासेक सिंहिणीला घेऊन वॉकसाठी बाहेर पडले होते. तेव्हा एक सायकलस्वार सिंहिणीला येऊन धडकला.
हे प्रकरण पोलिसांकडे गेलं. रस्ते अपघात म्हणून याप्रकरणाची नोंद झाली.
मात्र तरीही प्रासेक यांचं सिंहप्रेम कमी झालं नाही. मात्र सिंहानेच प्रासेक यांचा जीव घेतला. काही दिवसांपूर्वी सिंहाच्या पिंजऱ्यात प्रासेक यांचा मृतदेह आढळला. हा पिंजरा आतून बंद असल्याचं स्पष्ट झालं आहे.
घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी सिंह आणि सिंहिणीला मारलं. प्रासेक यांचा मृतदेह पिंजऱ्याबाहेर काढण्यासाठी त्या दोघांना मारणं भाग होतं असं पोलिसांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)