You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आंतरराष्ट्रीय महिला दिन: 14 प्रेरणादायी महिलांची 14 प्रेरणादायी कोट्स
आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त जगभरातल्या विविध देशांमधील कर्तृत्ववानमहिलांचे काही प्रेरणादायी वक्तव्यं गुगलने डूडलच्या माध्यमातून दिली आहेत.या डूडलमध्ये फ्रेंच, तैवानी, बंगाली, इंग्लिश सह अनेक भाषांमधल्या वाक्यांचा समावेश आहे.
या महिलांनी स्थापत्यशास्त्र, क्रीडा, साहित्य, कला अशा विविध क्षेत्रांमध्येफक्त पुरुषांशी बरोबरीच केली नाहीये तर काही ठिकाणी आगेकूचही केली आहे.
महिला आहात म्हणून स्वतःला कमकुवत समजू नका - भारतीय बॉक्सर मेरी कोम
मेरी कोम यांनी भारतासाठी अनेक जागतिक स्पर्धांमध्ये मेडल कमावले आहेत. त्यांना दोन मुलं आहेत.
कुटुंब आणि स्पर्धा यांच्यात संतुलन त्यांनी कसं राखलं हे दाखवणारा, तसंच त्यांच्या कर्तृत्वाची गाथा सांगणारा एक चित्रपटही कही वर्षांपूर्वी आला होता. प्रियंका चोप्राने त्यात मेरी कोमची भूमिका साकारली होती.
लोकांच्या संकुचित कल्पनांमुळे तुमचा संकोच होऊ देऊ नका - अमेरिकेतील अंतराळवीर डॉ. मेई जेमिसन
डॉ. मेई जेमिसन या अमेरिकेतील इंजिनियर, फिजिशियन आणि नासाच्या अंतराळशास्त्रज्ञ आहेत. 'एन्डेवर' या अंतराळयानाच्या मोहिमेत त्या सहभागी झाल्या होत्या.
मला उडायला पंख आहेत, मग पायांची गरजच काय? - फ्रिडा कहलो
फ्रिडा कहलो या मेक्सिकन चित्रकार होत्या. आधुनिक शैलीमध्ये त्यांनी अनेक चित्रे काढली आहेत. 13 जुलै 1954 रोजी त्यांचे निधन झाले.
तुमच्यात एक परमसत्य आहे. त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे स्वतःला मागे रोखू नका - एमा हर्वे
एमा हर्वे या पत्रलेखिका म्हणून प्रसिद्ध होत्या. 1817 साली जर्मनीमध्ये जन्मलेल्या एमा यांनी लिहिलेली पत्रे आणि डायऱ्या प्रसिद्ध आहेत.
त्यांचा 1904मध्ये पॅरिसमध्ये मृत्यू झाला.
जे तुम्ही एकट्याने बघता, ते स्वप्न असंत. जे इतरांबरोबर बघता, ते स्वप्न सत्यात उतरतं - योको ओनो
योको ओनो या जपानी गायिका असून त्यांनी अनेक गीतांचं लेखन केलं आहे. त्याचप्रमाणं त्यांनी शांतता चळवळीत कामही केलं आहे.
आपण खूप अनमोल आहोत, इतके की कुठल्याही नैराश्याने कधीच मनात घर करता कामा नये - NL बेनो झफीन
बेनो झफिन या भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेत 100 टक्के अंधत्व असलेल्या त्या पहिल्याच अधिकारी आहेत.
मी स्वतःपेक्षा जास्त शक्तिशाली आहे - क्लॅरिस लिस्पेक्टर
क्लॅरिस लिस्पेक्टर या ब्राझिलियन कादंबरीकार होत्या. त्यांनी अनेक लघुकथाही लिहिल्या आहेत. 1977 मध्ये त्यांचा रिओ दि जनेरिओमध्ये मृत्यू झाला.
माझा भविष्याच्या कल्पनेत विश्वास आहे - झाहा हादिद
झाहा हादिद या मूळच्या इराकी वंशाच्या स्थापत्यविशारद होत्या. या क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात होते. त्यांचं इंग्लंडमध्ये शिक्षण झालं होतं. 2016 साली वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचा फ्लोरिडामध्ये मृत्यू झाला होता.
एकाने कुणीकडे धैर्य दाखवलं की इतरांनाही बळ मिळतं - मिलिसेंट फॉसेट
मिलिसेंट फॉसेट या ब्रिटिश लेखिका, राजकीय नेत्या होत्या. 19व्या आणि 20व्या शतकातील एक महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 1929 मध्ये लंडनमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
पंख जेव्हा पसरले असतात, तेव्हाच त्यांना अर्थ असतो. अन्यथा ते फक्त पाठीवरचं एक ओझं असतं - मारिया त्स्वेताएवा
मारिया त्स्वेताएवा या रशियन कवियत्री होत्या. 20व्या शतकातील सर्वोत्कृष्ठ रशियन साहित्यात त्यांच्या साहित्याचा समावेश होतो.
जो भूतकाळ होता, त्यापेक्षा आपलं भविष्य नक्कीच अधिक चांगलं असू शकतं - जॉर्ज सँड
जॉर्ज सँड या फ्रेंच लेखिका होत्या. त्या राजकीय क्षेत्रातही कार्यरत होत्या.
ज्या व्यक्तीने कमीत कमी एक स्वप्न पाहिलंय, त्याला जीवनात खंबीर राहण्याचं कारण आहे - सानमाओ
सानमाओ या तैवानी लेखिका होत्या. युरोपातील अनेक पुस्तकं त्यांनी अनुवादित केली तसेच त्यांच्या साहित्याचा अभ्यासही युरोपात केला जातो.
मला महत्त्व आहे. मलाही तेवढंच महत्त्व आहे. 'फक्त जेव्हा...' किंवा 'फक्त तोपर्यंत...' नाही, मला महत्त्व आहेच. बस! - चिमामान्दा न्गोझी अदिची
चिमामान्दा न्गोझी अदिची या नायजेरियन कादंबरीकार आहेत. त्यांनी पर्पल हिबिस्कस, Half of a Yellow Sun या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)