You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगभरात कीटकांची संख्या 40 टक्क्यांनी घटणार - गुडन्यूज की धोक्याची घंटा?
- Author, मॅट मॅकग्राथ
- Role, बीबीसी पर्यावरण प्रतिनिधी
आपल्यापैकी अनेकांना कीटकांचा त्रास होतो. कधी ते चावतात तर कधी कानाभोवती गुणगुण करतात. आपण काहींवर हिट वापरतो तर काहींचा नायनाट चपलीने करतो.
पण आता एका सर्वेक्षणानुसार जगभरातील 40 टक्के कीटकांची संख्या "झपाट्याने कमी होत आहे". आणि ही प्रथमदर्शनी चांगली बातमी वाटत असली तर मोठ्या चिंतेची बाब असू शकते.
या सर्वेक्षणानुसार मधमाशा, मुंग्या, भुंगे यांची संख्या मानवप्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा आठ टक्के जास्त वेगाने कमी होत आहे. मात्र माशा आणि झुरळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
तुटलेली साखळी
बदलती कृषी पद्धती, कीटकनाशकं आणि वातावरणातील बदलांमुळे कीटकांची संख्या सर्वसाधारणपणे कमी होताना दिसत आहे.
जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ते मानवासह सर्व प्राण्यांसाठी वेगवेगळ्या कारणांनी फायदेशीर ठरतात. ते पक्ष्यांना, वटवाघळांना आणि सस्तन प्राण्यांना खाद्य पुरवतात, 75 टक्के पिकांचं परागीभवन करतात, मातीची पुर्नभरणी करतात आणि धोकादायक कीटकांची संख्या नियंत्रणात ठेवतात.
गेल्या काही वर्षांत झालेल्या इतर काही स्वतंत्र सर्वेक्षणांमध्ये असं लक्षात आलंय की कीटकांच्या काही विशेष प्रजातींमध्ये, उदाहरणार्थ माश्यांच्या प्रजातींमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, विशेषत: विकसित देशांमध्ये.
"Biological Conservation" या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला हा शोधनिबंध गेल्या 13 वर्षांतल्या 73 सर्वेक्षणांचं अवलोकन करतो.
यात वैज्ञानिकांना लक्षात आलं आहे की पुढच्या काही दशकांमध्ये कीटकांची संख्या 40 टक्क्यांनी कमी होईल. त्यापैकी काही कीटकांच्या प्रजाती आधी "नामशेष" होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
"प्राण्यांचे नैसर्गिक निवारे कमी होत चालले आहेत, हे यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. शेतीतील नवीन पद्धती, शहरीकरण आणि जंगलतोड ही यामागची महत्त्वाची कारणं आहेत," असं या शोधनिबंधाचे मुख्य लेखक आणि सिडनी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. फ्रान्सिस्को सँचेज-बायो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"जगभरात मोठ्या प्रमाणात वाढलेला खतांचा वापर, हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. तसंच अशुद्ध रासायनिक खतं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. तिसरा घटक म्हणजे आक्रमक कीटकं आणि जंतू. आणि वातावरणातील बदल हा चौथा महत्त्वाचा घटक आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात या घटकाचा विशेष प्रभाव जाणवतो."
या सर्वेक्षणात जर्मनीतील कीटकांच्या घटत चाललेल्या प्रमाणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसंच पुएर्तो रिकोमध्ये उष्णकटिबंधीय वनं कमी होण्याचा संबंध जागतिक तापमानवाढीशी जोडण्यात आला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, ही निरीक्षणं गंभीर आहेत.
"हे फक्त माश्या, परागीभवन किंवा आपल्या अन्नाबद्दल नाही. डंग बीटल नावाची भुंग्याची एक प्रजाती इंग्लंडमध्ये आढळते. ही प्रजाती कचऱ्यावर पुर्नप्रकिया करते. तसंच चतूर नावाची प्रजाती नदी आणि डबक्यात आयुष्य सुरू करते." असं बगलाईफ संस्थेटचे माट शार्डलो यांना वाटतं.
"आपल्या ग्रहावरचं वातावरण हे सातत्याने बिघडत आहे आणि हे थांबवण्यासाठी एका जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. कीटकांची संख्या अशा पद्धतीने कमी होणं हा तो पर्याय नक्कीच नाही."
कीटकांची वाढती संख्या
या शोधनिबंधांच्या लेखकांना अन्नसाखळीतील कीटकांच्या संख्येची चिंता वाटते आहे. पक्षी, माशा या प्रजातींचं अन्न या कीटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे मासे आणि अन्य प्रजाती नामशेष होण्याची शक्यता आहे.
काही महत्त्वाच्या प्रजाती मागे पडल्या असल्या तरी काही छोट्या प्रजाती बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत आहेत.
आपण काय करू शकतो?
प्रा. गोलसन यांना वाटतं की माश्या आणि झुरळं या मानवनिर्मित वातावरणात टिकू शकतील. त्यांना कीटकनाशकांचा प्रादुर्भाव होत नाही.
ही स्थिती धोकादायक असली तरी कीटकांना साजेसं वातावरण तयार करणं, कीटकनाशकं वापरणं आणि ऑरगॅनिक पदार्थ वापरणं, असे उपाय करता येतात, असंही ते म्हणाले.
युरोप आणि उत्तर अमेरिकेत कीटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. अफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत अशी घट होताना दिसत नाही. त्यामुळे याबाबतीत जास्त संशोधन होण्याची गरज आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात कीटक कमी झाले तरी त्यांची इतर कीटकांची संख्या वाढेल.
"गतकाळात ज्या प्रजाती नामशेष झाल्या त्यांच्यावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असं लक्षात येतं की त्यांनी वातावरणाशी जुळवून घेतलं नाही. काही प्रजातींना ते योग्य पद्धतीने जमलं," असं प्रा. गोलसन यांनी बीबीसीला सांगितलं.
"त्यामुळे लाखो वर्षं झाली तरी विसाव्या आणि एकविसाव्या शतकात ज्या प्रजाती नामशेष झाल्या तरी त्यांच्या जागी नवीन प्रजाती येतील," असं ते पुढे म्हणाले.
आपल्या मुलांची स्थिती अशी राहणार नाही, याचं मला वाईट वाटतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)