You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान-भारत तणाव: नरेंद्र मोदी-इम्रान खान यांनी 1947 मध्ये जे झालं ते विसरता कामा नये - ब्लॉग
- Author, मोहम्मद हनीफ
- Role, वरिष्ठ पत्रकार, बीबीसी पंजाबीसाठी लाहोरहून
पाकिस्तानचे पंतप्रधान होण्यापूर्वीही इम्रान खान बऱ्यापैकी प्रसिद्ध होते. जगातल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी ते तेव्हा होते आणि आजही सर्वकालीन अष्टपैलू खेळाडूंच्या जागतिक यादीत त्यांचं नाव येतं.
क्रिकेटपटू म्हणून जगभरातल्या चाहत्यांचं प्रेम तर त्यांना मिळायचंच. पण कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असूनही भारतात आणि भारतीयांकडून इम्रान यांना अधिक जिव्हाळा लाभायचा. म्हणजे एवढा की लोक म्हणायचे, इम्रान खान यांनी भारतातून निवडणूक लढवली तरी ते पंतप्रधान होऊ शकतात.
पण इम्रान पाकिस्तानचे होते आणि ते वजीर-ए-आझमही झाले ते पाकिस्तानचेच.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होताच त्यांच्यासमोर काही आव्हानं उभी झाली. पाकिस्तानवर आर्थिक संकटाचे ढगही दाटू लागले, देशावर उपासमारीसारखी परिस्थिती ओढवते की काय, अशी वेळ आली.
देशाला अशा परिस्थितीतून उभारण्यासाठी इम्रान जगभरातून पैशांची जुळवाजुळव करत असतानाच जुनं दुखणं उपटलं... भारताने हवाई 'हल्ला' केला!
आता काही लोकांच्या मते, प्रथम आक्रमण भारताने केलंच नाही. कुण्या एका मौलानाने प्रशिक्षण दिलेल्या मुलांनी सीमेपार जाऊन आक्रमण केलं.
इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारून आता काही महिनेच झाले आहेत. त्यांच्या हातात सध्या किती सत्ता आहे, हे तर ठाऊक नाही पण एक मात्र नक्की की हे मौलाना, हे जिहादी सध्यातरी इम्रान खान यांच्या हाताबाहेरच आहेत.
म्हणून इम्रान खान यांनी आतापर्यंत त्यांच्या हातात होतं तेवढं केलं. तसं खान साहेबांना संसदेत जायला आवडत नाही. पण ते तिथेही गेले आणि जाऊन म्हणाले, की "आम्ही भारताच्या ज्या पायलटला पकडलंय, त्याची सुटका करत आहोत."
देव करो, हा पायलट सुखरूप त्याच्या घरी पोहोचो, जेणेकरून दोन्ही देशातील मीडिया थोडं शांत होईल आणि न्यूजरूमधले हे योद्धे त्यांच्या अतिउत्साही घोड्यांवरून खाली उतरतील.
यावर माझे पाकिस्तानी मित्र म्हणतील, 'मित्रा, नाही नाही. आम्ही तर पत्रकारिता करतो. हे भारतीय मीडियामधले लोक आहेत, जे धर्माच्या नावावर तेढ पसरवत आहेत.'
माध्यमातल्या अशा योद्धांच्या तोंडी कोण लागणार? त्यांना तर विनवण्या करूनच थंड केलं जाऊ शकतं. किंवा त्यांना थोडा इतिहास सांगण्याची आवश्यकता आहे.
फक्त एक लक्षात ठेवायला हवं. वर्ष होतं 1947. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 10 लाख लोकांनी जीव गमावला होता. तेव्हा ना पाकिस्तानकडे F16 विमानं होती, ना भारताकडे मिराज होतं.
ना तेव्हा आताएवढे टँक होते, ना तोफा होत्या. आपण तेव्हा साध्या कुऱ्हाडी, भाले-बाण यांनी 10 लाख लोकांचे प्राण घेतले होते.
आता तर आमच्याकडे शस्त्रं आहेत... आणि ती अशी शस्त्रं आहेत जी, ठरवलं तर, अख्ख्या जगाला बेचिराख करू शकतात.
मग आता एकमेकांना कसली भीती आहे? आता एकमेकांना धमकावून काय अर्थ?
गरज आहे ती अंतर्मुख होऊन स्वत:कडे पाहण्याची. पाकिस्तानात खान साहेबांनी देशातल्या मौलानांना हुडकून काढायला हवं. त्यांना थंड करायला हवं.
तर भारतानेही जम्मू काश्मिरातील लोकांप्रति माणुसकी दाखवायला हवी, काश्मीरमधल्या बांधवांशी बोलून चर्चा करायला हवी.
अशावेळी नामवंत शायर उस्ताद दामन यांच्या काही ओळी आठवतात...
भले मुंह से न कहे पर अंदर से
खोए आप भी हो, खोए हम भी हैं...
लाली आंखो की बताती है
रोए आप भी हो, रोए हम भी हैं...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)