You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Balakot : पाकिस्तानमधले प्रत्यक्षदर्शी सांगतात, 'असं वाटलं की भूकंपच आला' : BBC Exclusive
भारतीय वायुसेनेच्या लाढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या सरहद्दीत घासून बालाकोटमधल्या जैश-ए-मोहम्मदच्या एका तळाला लक्ष्य केलं. या परिसरात राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितलं की नेमकं मंगळवारी पहाटे काय घडलं ते.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनानं केलाला हल्ला प्रचंड भीतीदायक होता, ज्यामुळे सगळ्यांचीच झोप उडाली.
बालाकोटच्या जाबा टॉपमध्ये राहणारे मोहम्मद आदिल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "हा हल्ला इतका भयंकर होता, की एका क्षणी असं वाटलं जणू भूकंपच आला आहे.
ते पुढे सांगतात, "पहाटेचे तीन वाजले होते. खूप जोरजोरात आवाज येत होते. असं वाटतं होतं की जणू भूकंप येतोय. आम्ही रात्रभर झोपलो नाही. पाच-दहा मिनिटांनंतर आम्हाला कळलं की इथं स्फोट झाले आहेत."
आदिल यांनी पुढे हे पण सांगितलं की एकाच वेळी 5 हल्ले झाले आणि त्यामध्ये अनेक जण जखमी झाले. त्यानंतर काही वेळातच आवाज बंद झाले.
"सकाळी आम्ही घटनास्थळी जाऊन बघितलं तर तिथं मोठमोठे खड्डे पडले होते. काही घरांचं नुकसान झालं होतं. तसंच एक व्यक्ती जखमी देखील झाली."
भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले सांगतात, या हल्ल्यात विशेषत: जैश-ए-मोहम्मदच्या तळांना लक्ष्य करण्यात आलं तसंच त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना यामुळे काहीच बाधा पोहोचू नये याची विशेष काळजी घेण्यात आली होती.
हा तळ जगलातल्या एका डोंगरावर आहे. जो लोकवस्तीपासून लांब आहे.
बालाकोटमध्ये राहणारे दुसरे प्रत्यक्षदर्शी वाजिद शाह यांनी सांगितलं की त्यांनी धमाक्यांचे आवाज ऐकले.
"असं वाटलं की कोणी तरी रायफलने फायरिंग करत आहे. मी तीनेवेळा हल्ल्याचे आवाज ऐकले, नंतर एकदम शांतता..."असं वाजिद यांनी पुढे सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)