2 काठ्या मिळवण्यासाठी हजारो जपानी अर्धनग्न पुरुषांची झुंबड

जपानमध्ये एक उत्सव साजरा केला जातो. यामध्ये 10 हजारांवर अर्धनग्न पुरुष दोन काठ्या मिळवण्यासाठी तुटून पडतात. ही काठी ज्या पुरुषाला मिळते त्या पुरुषाला या वर्षाचा सर्वांत भाग्यवान पुरुष समजलं जातं.

या उत्सवाचं नाव सैदाजी यईओ असं आहे.

ओकायामा इथल्या किनरयोजान सैदाजी या बौद्ध मंदिरात हा उत्सव झाला.

या काठ्यांना 'शिंगी' असं म्हटलं जातं.

या उत्सवात सहभागी होण्यापूर्वी हे पुरुष स्नान करून शुचिर्भूत होतात. त्यानंतर हे पुरुष एकत्र जमतात. पुरुषांच्या या गर्दीत ही काठी फेकली जाते आणि ती मिळवण्यासाठी हे पुरुष तुटून पडतात.

या वर्षी या उत्सवाचं 510वे वर्षं होतं. जपानमधील मुरोमाची कालखंडात हा उत्सव सुरू झाला.

हे पुरुष तिथल्या योशी नदीत स्नान करतात. त्यानंतर पारंपरिक पंचा परिधान करून हे पुरुष या उत्सवासाठी सज्ज होतात.

त्यानंतर रात्री 11 वाजता दिवे मालवले जातात. मंदिरातील मुख्य पुजारी एका खिडकीतून दोन काठ्या गर्दीत फेकतात आणि ही काठी मिळवण्यासाठी झुंबड उडते.

हा उत्सव सुबत्ता आणतो, असंही मानलं जातं.

या मंदिरात दिपोत्सवासाठी आणि काठी मिळवण्याची ही झुंबड पाहाण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक जमतात.

हे वाचलं का?