You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पूर्व भारतात सूर्य दोन तास लवकर मावळतो, म्हणून गरीब मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
संपूर्ण भारतासाठी एकच प्रमाण वेळ (time zone) ही ब्रिटीश राजवटीची देणगी आहे. एकाच वेळेवर सगळा देश चालवणं हे एकात्मतेचं प्रतीक होतं. पण संपूर्ण देशासाठी एकच वेळ असणं ही अनेकांच्या मते चुकीची कल्पना आहे.
भारत पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरला आहे. हे अंतर सुमारे 3 हजार किलोमीटर आहे. त्यादरम्यान 30 अंश रेखावृत्त जातात. त्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि गुजरात दरम्यान सरासरी वेळेत दोन तासांचा फरक पडतो.
पूर्व भारतात पश्चिम भारतापेक्षा दोन तास आधी सूर्योदय होतो. सरकाने दोन भारतीय वेळा निश्चित कराव्यात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पूर्व भारतासाठी वेगळी वेळ निश्चित केली तर अधिकचा वेळ उपयोगात आणता येईल. कारण त्याठिकाणी 2 तास आधी सूर्योदय आणि 2 तास लवकर सूर्यास्त होतो.
एकाच भारतीय वेळेचा आरोग्यावर परिणाम
सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आपल्या शरीराच्या घड्याळावरही परिणाम होत असतो. सूर्यास्त होऊ लागला की आपलं शरीर झोप लागणारं हार्मोन म्हणजे मेलॅटोनिन निर्माण करतं. त्यामुळे आपल्याला झोप यायला लागते. कॉर्नेल युनिव्हर्सिटी येथील प्रा. मौलिक जग्नानी यांच्या मते, एका प्रमाण वेळेचा विशेषत: गरीब घरातल्या मुलांच्या झोपेवर वाईट परिणाम होतो. कमी झोप मिळाल्याने त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असतो.
भारतात सगळीकडे एकाच वेळेवर शाळा भरते. पण ज्याठिकाणी सूर्यास्त उशीरा होतो त्याठिकाणी शाळकरी मुलं उशीरा झोपतात, पण शाळेत वेळेवर जाण्यासाठी लवकर उठतात. सूर्यास्त उशीरा झाल्याने मुलांची झोप 30 मिनिटांनी कमी होते, असं प्रा. जग्नानी सांगतात.
भारतीय प्रमाणवेळ सर्वेक्षणाची माहिती आणि भौगोलिकतेनुसार आरोग्यावरचे सर्वेक्षण या दोन्हींचा प्रा. जग्नानी यांनी अभ्यास केला. उशीरा सूर्यास्त होत असलेल्या भागातली मुलं शाळेत कमी वेळ घालवतात आणि त्यांच्यापैकी अनेकजण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत, असं या अभ्यासातून निष्पन्न झालं.
गरीब मुलांच्या घरी आर्थिक ताण जास्त असेल तर त्या काळात त्याचा मुलांच्या झोपवर विपरित परिणाम होतो. "गरीब घरातला आवाजाचा गोंधळ, उन्हाळ्यातील उकाडा, डास, घरातली गर्दी यांमुळे मुलांना झोपण अवघड होतं. गरीब घरात झोपण्यासाठी वेगळी खोली, गादी, उशी या गोष्टींची कमकरता पाहायला मिळते," असं प्रा. जग्नानी सांगतात.
तसंच गरिबीचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. ताण, आजूबाजूची नकारात्मक स्थिती यामुळे निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, असंही ते सांगतात.
पूर्व आणि पश्चिम भागातील वार्षिक सरासरी सूर्यास्ताच्या वेळेचा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असतो. सूर्यास्त एक तास उशीरा होत असेल तर त्या ठिकाणच्या मुलांच्या शिक्षणात 0.8 वर्षांनी घट होते. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत ते चांगली प्रगती करु शकत नाहीत, असं अभ्यासात दिसून आलं आहे.
भारताने दोन प्रमाण वेळा निश्चित केल्या तर देशाच्या GDP मध्ये साधारण 0.2 % चा फायदा होईल. पश्चिम भारतासाठी UTC+5 तर पूर्व भारतासाठी UTC+6 करावी असं सुचवण्यात आलं आहे.
भारतात दोन प्रमाण वेळा असाव्यात यावर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आसाममधल्या चहाचे मळे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी तर अनौपचारिक पातळीवर त्यांचं घड्याळ हे भारतीय वेळेपेक्षा एक तास आधी करून घेतलं आहे.
1980मध्ये वीज वाचवण्यासाठी एका नामांकित उर्जा संशोधन संस्थेनं एक प्रस्ताव मांडला होता. पण प्रस्ताव किचकट असल्याचं कारण देत 2002मध्ये तो फेटाळण्यात आला. दोन प्रमाण वेळांमुळे रेल्वे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचं सांगण्यात आलं.
पण, गेल्यावर्षी राष्ट्रीय भौगोलिक प्रयोगशाळेनंच दोन प्रमाणवेळेचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. यामध्ये बहुतेक राज्यांसाठी एक प्रमाण वेळ तर ठराविक 8 राज्यासांठी दुसरी प्रमाणवेळ सुचवण्यात आली आहे. त्यामध्ये 7 ईशान्य भारतातली राज्ये आहेत. या दोन प्रमाणवेळेत एक तासाचा फरक राहील.
प्रयोगशाळेच्या मते, सूर्यास्त आणि सूर्योदय हे भारतीय प्रमाणवेळेच्या आधीच होत असल्यानं लोकांच्या जीवनमानावर वाईट परिणाम होत आहे.
सूर्योदय लवकर झाला तरी सरकारी ऑफिस, शाळा, कॉलेज उशीरा सुरु होतात. त्यामुळे दिवसाच्या वेळेचा पूर्ण वापर करता येत नाही. हिवाळ्यात तर आणखी बिकट परिस्थिती होते. कारण सूर्य नेहमीपेक्षा अधिक लवकर मावळतो. त्यामुळे दिवसभराचं काम चालू ठेवण्यासाठी लवकर लाईट लावावी लागते.
या सगळ्या घटनेचा अर्थ एकच होतो की, झोपेचा आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, विचित्र प्रमाण वेळेचा लोकांच्या जीवनावर विपरित परिणाम होतो. त्यामध्ये गरीब घरातली मुलं जास्त बळी पडतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)