You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली?
असं म्हणतात, प्रेम, एक अशी भावना जी व्यक्त होताच चेहरा खुलतो, बहर येतो. तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची, जागेची, गरज नसते. 365 दिवस हे प्रेमाचेच असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है!
प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलं, असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. पण इतिहास काय हे जाणून घेणंही गरजेचं आहे.
व्हॅलेंटाइन डेचा इतिहास
रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो.
रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. हा राजा प्रेम म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असं मानत होता. त्यामुळे प्रेम करणार्यांचाही त्याला राग यायचा.
संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला. केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं.
तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाइनचा जीव जेलरच्या मुलीवर आला. प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनला फाशी देण्यात आली होती.
फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाइनने प्रेयसीला पत्र लिहिले आणि पत्राचा शेवट 'युअर व्हॅलेंटाइन' असा केला. तेव्हापासूनच 14 फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो, अशी अख्यायिका आहे.
व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरुवात कधीपासून झाली?
सर्वात पहिल्यांदा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची सुरूवात झाली 496मध्ये.
प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती. रोमन फेस्टिवलमधून याची खरी सुरुवात झाली.
रोमनमध्ये मध्य फेब्रुवारीमध्ये ल्युपर्सिया नावाचा सण साजरा केला जातो. म्हणजेच वसंत ऋतुची सुरुवात.
सेलिब्रेशनचा भाग म्हणून, मुलं मुलींच्या नावाची चिठ्ठी एका बॉक्समधून काढतात. त्यानंतर या फेस्टिवलदरम्यान, ते दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात, आणि नंतर त्यांना वाटलं तर ते एकमेकांशी लग्न देखील करू शकतात.
त्यानंतर चर्चने हा फेस्टिवल संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत ख्रिचन धर्मात सामील करून घेण्याचा निर्णय घेतला.
पण कालांतराने, संत व्हॅलेंटाइनच्या नावाने लोकांनी आपल्या प्रिय व्यक्तींजवळ आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली.
मग आता तुम्ही कसली वाट पाहताय? घ्या संत व्हॅलेंटाइनचं नाव आणि करा आपल्या भावना व्यक्त. :)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)