129 भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत अटक : सरकारनेच सुरू केलं होतं बोगस विद्यापीठ

अमेरिकेतील बोगस विद्यापीठात प्रवेश घेतल्याने विद्यार्थ्यांच्या झालेल्या अटक प्रकरणात भारताने मुत्सद्दी विरोध नोंदवला आहे. पण या बोगस विद्यापीठाची स्थापना अमेरिकेतील सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनीच केली होती. पैशांच्या बदल्यात अवैध प्रवासाच्या रॅकेटचा छडा लावण्यासाठी काही अंडरकव्हर एजंटनी हा बनाव रचला होता.
ज्या विद्यार्थ्यांनी हा या विद्यापीठात प्रवेश घेतला होता, त्यांना हे कृत्य अवैध आहे, याची कल्पना होती, असा दावा अमेरिकेने केला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ फॉर्मिंटन असं या बोगस विद्यापीठाचं नाव आहे. मिशिगन विद्यापीठात हे विद्यापीठ असल्याचं जाहिरातीत म्हटलं आहे.
तर भारतीय अधिकाऱ्यांनी भारतातील विद्यार्थी या फसवणुकीला बळी पडले असण्याची शक्यता आहे, अशी भूमिका घेतील आहे.
शनिवारी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीत अमेरिकेच्या दूतावासात या प्रकरणी निषेध नोंदवला आणि विद्यार्थ्यांना कायदेशीर पातळीवर मदत द्यावी, अशी मागणी केली.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे की, "भारतीय विद्यार्थ्यांना योग्य वागणूक मिळावी. तसेच भारतीय अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क करून द्यावा जेणे करून त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल."
असे फसले भारतीय विद्यार्थी
2015पासून हे बोगस विद्यापीठ सुरू आहे. अमेरिकेतील माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार हे विद्यापीठ अशा परदेशी लोकांसाठी होतं जे विद्यार्थी व्हिसावर अमेरिकेत राहू इच्छित होते.
या विद्यापीठीची वेबसाईट होती, यावर ग्रंथालय आणि क्लासरूमचे फोटो आहेत. काही फोटोंत विद्यार्थी कँपसमध्ये बोलत असल्याचेही फोटो आहेत.
प्रवेशाच्या जाहिरातीमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी वार्षिक फी 8,500 डॉलर तर पदवीसाठी वार्षिक फी 11 हजार डॉलर असल्याचं म्हटलं होतं.

या विद्यापीठाचं बनावट फेसबुक पेजही आहे. मिशिगनमधील डेट्रॉईटमधील एका बिझनेस पार्कमध्ये हे विद्यापीठ आहे. मागील आठवड्यात न्यायालयात जी कागदपत्र सादर करण्यात आली त्यातून हे विद्यापीठ चालवणारे लोक अमेरिकेतील Immigration and Customs Enforcement Agencyचे अंडरकव्हर एजंट होते.
आरोप कुणावर?
मिशिगनमधील जिल्हा न्यायालयात या संदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यात म्हटलं आहे की विद्यापीठ बोगस आहे आणि हा सर्व बनाव आहे, हे विद्यार्थ्यांना माहिती होतं. विद्यापीठाचा वापर पैशांच्या बदल्यात अमेरिकेत राहाण्यासाठी केला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात 130 विद्यार्थ्यांना अटक झाली असून त्यातील 129 भारतीय आहेत. हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 'मदत' करणाऱ्या 8 जणांनाही अटक झाली आहे. हे सर्व आरोप व्हिसा संदर्भातील फसवणुकीशी संबंधित आहेत.
भारताचं म्हणणं काय?
भारताचं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. भारताने या प्रकरणात अमेरिकेकडे संपूर्ण माहिती मागितली आहे.
अमेरिकेतील इमिग्रेशनमध्ये काम करणाऱ्या वकिलांचंही असं म्हणणं आहे की सरकारच्या जाळ्यात बऱ्याच वेळा निर्दोष लोकही अडकतात.

अॅटलांटामधील इमिग्रेशनचे वकील रवी मन्नान यांनी डेट्रॉईट फ्री प्रेसला सांगितलं आहे की, "अशा स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक आश्वासनं दिली जातात, त्यात अनेक लोक फसतात."
वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने यासंदर्भात हेल्पलाईनही उपलब्ध करून दिली आहे.
बेकायदेशीर प्रवाशांवर कारवाई
अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने बेकायदेशीररीत्या अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी विविध मार्ग अवलंबले आहेत. 2016मध्ये उत्तर न्यूजर्सीमध्ये बोगस विद्यापीठ सुरू करण्यात आलं होतं. यात 21 जणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुतेक लोक चीन आणि भारतीय होते. डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बेकायदेशीर प्रवासाला चाप लावण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत.गेल्या वर्षी 2 मोठ्या कारवाया करून 300 जणांना अटक करण्यात आली होती.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








