विष्ठा दान : तुमची शी कुणाला तरी बरं करू शकते, माहितीये?

    • Author, मिशेल रॉबर्ट्स
    • Role, हेल्थ एडिटर, बीबीसी न्यूज ऑनलाईन

तुम्ही रोज एका झटक्यात फ्लश करून टाकता ती शी कुणाचे प्राण वाचवू शकते, असं सांगितलं तर? आणि त्यासाठी विष्ठा किंवा शी दान करण्याचीही एक पद्धत आली आहे, असंही सांगितलं तर?

ऐकायला थोडं विचित्र वाटतं. पण हे खरं आहे. थांबा पुढे वाचा. हे प्रकरणच मोठं रंजक आहे.

31 वर्षीय क्लॉडिया कँपनेला ब्रिटनच्या एका विद्यापीठात स्टु़डंट सपोर्ट अॅडमिनिस्ट्रेटर आहे. फावल्या वेळात ती शी दान करते.

ती सांगते, "माझ्या काही मित्रमैत्रिणींना असं वाटतं की हे थोडं विचित्र आहे. मला त्याची काळजी वाटत नाही. हे दान करणं अतिशय सोपं आहे. मी फक्त एका संशोधनात मदत करत आहे. मला काही योगदान दिल्याचा आनंद आहे."

खरं पाहता तिच्या विष्ठेत काही चांगले जंतू आहेत. तिची विष्ठा एखाद्या रुग्णाच्या आतड्यांमध्ये टाकून त्यावर उपचार केले जातील. ज्यामुळे तो रुग्ण बरा होऊ शकतो.

त्यामुळे हे 'शी दान' किती उपयुक्त आहे, याची क्लॉडियाला कल्पना आहे. म्हणूनच ती हे दान करतेय. पण तिची विष्ठा खरंच इतकी खास आहे का?

वैज्ञानिकांचं असं मत आहे की काही लोकांच्या विष्ठेत काही जीवाणू असतात. त्यांच्या मदतीने एखाद्या रुग्णाच्या आतड्ंयाचा रोग बरा होऊ शकतो.

सुपर पू डोनर्स

क्लॉडिया सांगतात की 'विष्ठा दाता' व्हायचं होतं, कारण त्यांनी असं वाचलं होतं की व्हीगन लोकांच्या विष्ठेत चांगले जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया असतात.

मात्र व्हीगन डायट घेणाऱ्या लोकांची विष्ठा चांगल्या दर्जाची असते, असा पुरावा कुठेही उपलब्ध नाही. मात्र दर्जेदार विष्ठा कशामुळे तयार होते, यावर संशोधन अजूनही सुरू आहे.

डॉ. जस्टिन ओसुलीवन ऑक्लंड युनिव्हर्सिटीत मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट म्हणून काम करतात. ते सुपर पू डोनर्स च्या सिद्धांतांवर काम करत आहेत.

सुपर पू म्हणजे काय?

माणसाच्या आतड्यांमध्ये चांगले आणि वाईट, अशा दोन्ही प्रकारचे जीवाणू असतात. हे दोन्ही सुक्ष्म जीव एकमेकांपासून वेगळे असतात.

मात्र वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारे विष्ठेला दुसऱ्यांच्या आतड्यात टाकण्याचं तंत्रज्ञान नवीन आहे. काही दाता आपली विष्ठा दान करून पैसा कमावतात असंही या संशोधनात समोर आलं आहे.

डॉ. जस्टिन ओ'सुलीवन सांगतात, "आम्हाला जर कळलं की हे सगळं कसं होतं तर विष्ठा प्रत्यारोपण आणखी प्रभावीपणे होऊ शकेल. अल्याझायमर्स, मल्टीपल स्क्लेरॉसिस आणि अस्थमा यांसारख्या आजारंच्या जीवाणूंशी निगडीत रोगांमध्ये विष्ठेची चाचणी घेण्यात येते."

जॉन लँडी हे इंग्लंडच्या एका रुग्णालयात पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ आहेत. विष्ठा प्रत्यार्पणाच्या कामात ते मदत करतात.

"एखादी व्यक्ती सुपर पू डोनर कसा होतो, त्याची कारणं काय आहेत हे आम्हाला अद्याप समजलेलं नाही," ते सांगतात.

"विष्ठा देणारा सुदृढ रहावा असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मात्र आम्ही त्यांच्या शरीरात असलेल्या सगळ्याच जीवाणूंचा अभ्यास करत नाही. मला असं वाटतं की अशा पद्धतीचीही चाचणी व्हायला हवी."

पॉटीतील जीवाणू

Frontiers in Cellular and Infection Microbiology या जर्नलमध्ये डॉ. ओ'सुलीवन यांच्या संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीच्या विष्ठेत विशिष्ट पद्धतीचे जीवाणू असणं लाभादायी असू शकतं. असं केल्यामुळे ज्यांच्या शरीरात विष्ठेचं प्रत्यारोपण होतं, त्यांच्याही शरीरात विविध प्रकारचे जीवाणू असू शकतात.

मात्र दाता आणि ज्याच्या शरीरात प्रत्यारोपण होतं, त्याच्या शरीरातलं वातावरण अनुरूप हवं आणि हे केवळ विष्ठेत असलेल्या जीवाणूंवर अवलंबून असतं.

डायरियाच्या अनेक केसेसमध्ये गाळलेल्या विष्ठेचं प्रत्यारोपण केलं आहे. या विष्ठेत काही जीवाणू निघून गेले असले तरी DNA, विषाणू आणि इतर गोष्टी होत्याच.

"हे विषाणू प्रत्यारोपण केलेल्या जीवाणू, आणि त्यांच्या चयापचयावर परिणाम करू शकतात," असं डॉ. ओ'सुलीवन सांगतात.

लंडनमधील इम्पेरियल कॉलेजमधील मायक्रोबायोमच्या तज्ज्ञ डॉ. जुली मॅकडोनाल्ड विष्ठा प्रत्यारोपण प्रभावीपणे व्हावं, यासाठी संशोधन करत आहेत.

सध्या तरी दान केलेल्या विष्ठेचा clostridium difficile या जीवाणू मुळे होणाऱ्या आजारावर उपचार करण्यासाठी वापर केला जात आहे.

प्रतिजैविकांचा प्रमाणाबाहेर वापर केला तर शरीरातील चांगले जीवाणू शरीराच्या बाहेर पडतात. असं झालं तर या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या रोगाचा प्रादुर्भाव होणारे रुग्ण सापडण्याची शक्यता कमी असते.

मॅकडोनाल्ड यांच्या कामातून असं दिसतं की विष्ठेच्या प्रत्यारोपणामुळे काही विशिष्ट गोष्टीच साध्य होतील.

त्या म्हणतात, "प्रत्यारोपण कसं काम करतं, हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही सध्या प्रयोगशाळेत करत आहोत. ते कधी बंद करायला हवं याचीही चाचपणी आम्ही करत आहोत."

रुग्णांना विष्ठेचं इंजेक्शन देण्याऐवजी विष्ठेवर आधारित उपचार पद्धती अंगीकारता येऊ शकतं. ते करताना रुग्णांनाही विचित्र वाटणार नाही. असं झालं तर विष्ठादान भोवती असलेला भ्रमही दूर होईल, अशी आशा त्यांना वाटते.

क्लॉडियाला असं वाटतं की, "लोकांनी याबाबत आपली विचारसरणी बदलावी." विष्ठा दाता बनण्याविषयी विचार करावा.

हे दान करणं अतिशय सोपं आहे आणि सरळही आहे. जर तुम्ही याबाबत विचार करत असाल तर नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा, असंही त्या सांगतात.

"मला रुग्णालयाकडून एक डब्बा मिळतो. मी त्यात विष्ठा एकत्र करते. मग मी जेव्हा कामावर जाते तेव्हा रुग्णालयात तो देऊन जाते. तुम्हाला त्यासाठी जास्त काही कष्ट घ्यावे लागतील," क्लॉडिया सांगतात.

क्लॉडिया आता रक्तदाता होण्याबद्दल विचार करत आहे. ती सांगते. "मी आतापर्यंत असं केलेलं नाही, मात्र मी असं करण्याविषयी विचार करत आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)