निसर्गाशी केलेली जवळीक अशी उठली या शिल्पकाराच्या जीवावर

गेन्सर

फोटो स्रोत, Gillian Gensen / BBC

फोटो कॅप्शन, गेन्सर टोरोंटोमध्य राहतात आणि त्या 1991पासून शिल्पकला करत आहेत.

काही शिल्पकारांना त्यांचं शिल्प म्हणजे जीव की प्राण असतं. पण शिल्पकार गिलियन गेन्सर यांच्यावर त्यांनी तयार केलेलं शिल्प जिवावर बेतलं आहे.

तब्बल 15 वर्षं अहोरात्र खपून गेन्सर यांनी समुद्रातल्या शिंपल्यांचा चुरा करून अॅडमचं शिल्प तयार केलं. अब्राहम धर्मानुसार अॅडम हा देवानं बनवलेला पहिला मानव मानला जातो.

त्यादरम्यानच त्यांना मेंदुच्या Degenerative Autoimmune Disease या विकाराचा सामना करावा लागला. पण हा आजार त्यांना त्यांच्या पेशामुळे झाला हे जेव्हा कळलं तेव्हा फारच उशीर झाला होता.

गेन्सर या टोरोंटोमध्य राहतात आणि त्या 1991पासून शिल्पकला करत आहेत. त्या शिल्प बनवण्यासाठी शिंपले, प्रवाळ, सुकलेली पानं आणि कायदेशीर मार्गाने मिळलेली प्राण्याची हाडं यांचा वापर करतात. 1998मध्ये त्यांनी लिलिथ यांचं शिल्प बनवलं. ज्यू लोकांच्या लोककथेप्रमाणे लिलिथ ही शिंपल्यातल्या अंड्यापासून बनलेली पहिली महिला होती.

अॅडम यांचं शिल्प निळ्या मझल शिंपल्याच्या घटकांपासून बनवण्याची ही त्यांची स्वत:ची कल्पना होती. कॅनाडाच्या अटलांटिक किनाऱ्याला त्यांनी भेट दिली. तिथून त्यांनी खूप सारे शंख आणि शंपले त्या टोरोंटाला घेऊन गेल्या.

गेन्सर यांचं शिल्प हे पुर्णत: नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं आहे.
फोटो कॅप्शन, गेन्सर यांचं शिल्प हे पूर्णत: नैसर्गिक घटकांपासून बनवलेलं आहे.

"अॅडमच्या शरिराचा आकार बनवण्यासाठी मी दररोज जवळजवळ 12 तास शिंपल्याचा चुरा करून तो चाळून घ्यायचे." टोरोंटा लाइफ या नियतकालिकात त्यांनी ही माहिती दिली आहे. "त्या चुऱ्यामुळे मला अॅडमच्या बरगड्या चांगल्याप्रकारे बनवता आल्या," असं त्या सांगतात.

शिंपल्यातलं विष कधी निदर्शनास आलं?

अॅडमच्या शिल्पावर काही महिने काम केल्यावर गेन्सर यांची तब्येत खालावली. "मी सारखं चिडू लागली. माझं डोकं सतत दुखू लागलं, उलट्या होऊ लागल्या. कधी कधी दिवसातून अनेक वेळा उलट्या व्हायच्या," असं त्या लिहितात.

"मूत्रविकार तज्ज्ञ, सांधेदुखीतज्ज्ञ, अंतस्रावतज्ज्ञ यांच्याकडे माझ्या न संपणाऱ्या फेऱ्या होऊ लागल्या. पण काहीच निदान होत नव्हतं. तुम्ही कुठल्या विषारी पदार्थाच्या संपर्कात आला होता का? असं ते मला विचारायचे. पण मी फक्त नैसर्गिक घटकांचा वापर करते असं सांगायचे."

अॅडम

फोटो स्रोत, Gillian Genser

फोटो कॅप्शन, मृत्यूच्याआधी गेन्सर यांना अॅडमचं शिल्प तयार करायचं होतं.

शिंपल्यांचा चुरा करत असताना काही वेळानंनतर गेन्सर यांना एका जागेवरून हलताही यायचं नाही. त्यांचे स्नायू दुखू लागायचे. मनगटात वेदना व्हायच्या.

मृत्यूच्याआधी गेन्सर यांना अॅडमचं शिल्प तयार करायचं होतं. आणि ते त्यांनी करून दाखवलं.

"आता मला खूप अशक्तपणा वाटत आहे. माझं शरीर साथ देत नाहीये. माझ्या मृत्युच्याआधी हे शिल्प व्हावं एवढीच माझी इच्छा होती," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

तीव्र स्मृतीभ्रंश

"शिल्प पूर्ण व्हायच्याआधीच मला तीव्र प्रकारचा स्मृतीभ्रंभ जाणवू लागला. मला विचार करता येत नव्हता. माझा गोंधळ उडायचा. शिल्पाचे भाग कसे असावेत याविषयी मला विचार करता येत नव्हता. मागची बाजू पुढे लावायचे."

"मला राग यायचा. अस्वस्थ वाटायचं, आत्महत्या करायची इच्छा व्हायची. माझा मानसिक तणाव एवढा वाढला की, मी रस्त्यावर येरझाऱ्या घालायचे, मोठ्यानं बडबड करायचे."

"मी मनोविकारतज्ज्ञाची भेट घतेली. पण त्यांनाही याविषयी काही समजलं नाही. मी सगळा प्रयत्न केला. अगदी antidepressants, antipsychotics आणि गुंगीची औषधं घेतली, पण काहीही फायदा झाला नाही.

एकेदिवशी त्यांना हाडात आणि शिंपल्यात विषारी घटक आढळले. हे घटक वातावरणातून एकवटले होते. त्याचवेळी त्यांना रोगाचा उलगडा झाला.

शिंपले
फोटो कॅप्शन, वातावरणातले विषारी घटक शंख आणि शिंपल्यात एकटवले जातात.

विषारी शंख शिंपले

2015 पासून गेन्सर यांच्या शरिरात जड धातुंमुळे हळुहळू विष पसरत होतं.

"माझ्या शरीरात मोठ्या प्रमाणात आर्सेनिकचे घटक आढळले. नंतर ते लीड असल्याचं दिसून आलं," असं गेन्सर सागंतात. अॅडमच्या शिल्पासाठी दररोज हजारो शंख आणि शिंपल्यांचा केलेला चुरा याला कारणीभूत होतं.

शंख आणि शिंपल्यातले काही घटक हे पाण्यातले विषारी घटक आकर्षित करतात.

गेन्सर जेव्हा शिंपल्याचा चुरा करायच्या तेव्हा ते विषारी कण हवेत पसरायचे. गेन्सर यांचं शरीर त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या शरीरात हे विषारी घटक परसरले.

त्या आपल्या कलाकृतींद्वारे निसर्गाशी मानवाचं किचकट नातं दाखवण्याचं काम करत होत्या, तेही अगदी नैसर्गिक वस्तूंचा वापर करून. पण त्याच कलेतून त्यांची जीवनरेखा खुंटत होती. याला नशिबाने केलेली क्रूर थट्टाच म्हणावी लागेल.

"माझं शरीर हे आपण पृथ्वीत कसं विष पेरतोय याचाच संदेश देत आहे," असं त्यांनी टोरोंटा लाइफमध्ये लिहिलं आहे.

शिल्पकला
फोटो कॅप्शन, शिल्पकला चालू ठेवण्यासाठी गेन्सर यांना आता सतत काळजी घ्यावी लागते.

'माझा सुंदर मृत्यू'

2015मध्ये अॅडमचं शिल्प तयार झालं. ते अपूर्ण राहिलं असतं तर त्यांच्या जिवनाला काहीच अर्थ राहिला नसता, असं गेन्सर सांगतात.

गेन्सर यांना सध्या मेंदुचा तीव्र विकार आहे, खूप कमी ऐकू येतं, कायमस्वरुपी मानसिक तणाव झाला आहे.

त्यांना अल्झायमर पार्किन्सन होण्याची दाट शक्यता आहे. शिल्पकला चालू ठेवण्यासाठी गेन्सर यांना आता सतत काळजी घ्यावी लागते.

"मला याचा पश्चाताप होत नाही. कोणत्याही प्रकारचं दु:ख वाटून न घेता पुढं जायचं असतं," असं त्यानी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"मला समाधानही वाटतं. कारण तो (अॅडम) भव्य दिसतो. त्यातूनच मला स्फूर्ती मिळते. मी याला माझा सुंदर मृत्यू मानते. "

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)