स्वत:ची लघवी पिणं हे आरोग्यदायी असतं का?

लघवी

फोटो स्रोत, iStock

    • Author, अशिता नागेश
    • Role, बीबीसी थ्री

स्वतःची लघवी पिण्याचा विचारही फारसं कुणी करू शकत नाही. तसा प्रसंगच ओढावला किंवा अगदी जिवाची बाजी लागली असेल तरच हे पाऊल कोणी उचलेलं. पण जगात अशीही माणसं आहेत जी उत्तम आरोग्यासाठी स्वतःची लघवी पितात.

स्वतःची लघवी प्यायलाने आपल्या आरोग्यविषयक अनेक जुन्या तक्रारी दूर झाल्याचा दावा इंग्लंडच्या 33 वर्षांच्या योग शिक्षिका केली ओकली यांनी केला आहे. लघवी प्यायल्यानं त्यांचा थायरॉईडचा त्रास आणि बऱ्याच काळापासून असलेलं दुखणं बरं झालं.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी प्रेस असोसिएशन या वृत्तसंस्थेला आपण स्वतःची लघवी पित असल्याचं सांगितलं होतं. काही जण याला 'युरीन थेरेपी' म्हणतात. मात्र वैज्ञानिक भाषेत याला युरोफेजिया असं म्हटलं जातं.

केली म्हणतात, "मी ऐकलं होतं की लघवी प्यायल्याने शरिराची रोगप्रतिकारक यंत्रणा सुधारते, आरोग्य उत्तम रहातं आणि कांती सुधारते. मग मी विचार केला, हे करून बघावं."

यानंतर त्यांनी हा उपाय सुरू केला. आता त्या दररोज एक भांडं स्वतःची ताजी लघवी पितात. शिवाय एक सूती कापड लघवीत बुडवून चेहऱ्यावर लावतात. यामुळे त्वचा तजेलदार झाल्याचा त्यांचा दावा आहे.

विशेष म्हणजे केवळ केली या एकमेव व्यक्ती नाहीत ज्यांनी नुकतेच युरोफेजियाचे फायदे सांगितले आहेत.

वजन कमी करते लघवी

गेल्याच आठवड्यात कॅनडाच्या अलबर्टामध्ये राहणाऱ्या 46 वर्षांच्या लीह सैम्पसन यांनी 'द सन'कडे असाच दावा केला. लघवी प्यायलाने वजन कमी होण्यास मदत होतं, असं त्यांचं म्हणणं आहे.

लघवी

फोटो स्रोत, TWITER

त्यांचं वजन 120 किलो होतं. मला काहीही करून वजन कमी करायचं होतं, असं त्या सांगतात. यासाठी लघवी उपयोगी असल्याचं कळल्यावर त्यांना आश्चर्य वाटलं.

त्या सांगतात, "माझ्या मित्राने मला युरीन थेरपीची एक युट्यूब लिंक पाठवली. त्यानंतर मी स्वतःची लघवी प्यायले. मी खूप जास्त मीठ खात असल्याचं माझ्या लगेच लक्षात आलं आणि त्यानंतर जेवणातून मीठ बाद करण्याची शपथच घेतली."

लीह आता लघवी पिण्याव्यतिरिक्त दात घासल्यावर केल्यानंतर लघवीनेच चूळ भरतात आणि आईड्रॉप म्हणूनही त्याचा वापर करतात.

अर्थात, लघवीचा वापर करण्याआधी जरा थांबा आणि विचार करा. कारण डॉक्टर तसा सल्ला देत नाहीत.

पण 39 वर्षांच्या फेथ कँटर यांनी काही दिवसांपूर्वीच असं जाहीर केलं की त्यांनी लघवी पिणं सुरू केलं आहे.

फेथ मूळच्या अबरदीनच्या आहेत. सध्या त्या पोर्तुगालमध्ये राहतात. त्या सांगतात, एकदा डास चावल्याने त्यांना अॅलर्जी झाली आणि त्यांचा डोळा सुजला. त्यानंतर त्यांनी लघवी पिण्याचा प्रयत्न केला.

त्या म्हणतात सुरुवातीला लघवी पिणं खूप किळसवाणं वाटायचं. मात्र तीनच दिवसांत सूज उतरली.

फेथ सांगतात, "त्यानंतर रोज सकाळी मी स्वतःची लघवी प्यायला सुरुवात केली आणि आता मला आधीपेक्षा कमी डास चावतात. आता कुठलाही किडा चावल्यावर मला सूज येत नाही आणि खाजही येत नाही."

जूनमध्ये एका अज्ञात महिलेचा व्हिडियो व्हायरल झाला होता. या व्हिडियोमध्ये ती तिच्या कुत्र्याची लघवी पिताना दिसते.

त्या व्हीडिओत ती म्हणते, "जेव्हा मी कुत्र्याची लघवी प्यायले, त्यावेळी मला खूप तणाव होता, मी उदास होते आणि माझ्या चेहऱ्यावर खूप मुरूम होते."

डॉक्टरांच्या मते लघवी पिणे योग्य नाही

बरेचजणं लघवी पित असले तरी अनेक डॉक्टरांच्या मते हे आरोग्यासाठी चांगलं नाही. एकतर लघवी म्हणजे शरिरातली घाण असते.

डॉ. जुबैर अहमद यांनी बीबीसी थ्रीला सांगितलं, "लघवीमध्ये जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया नसतात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र तुमचं मूत्रपिंड म्हणजे किडन्यांमध्ये काही दोष नसेल, तेव्हाच लघवी जीवाणूरहित असते."

"लघवी शरिरातून बाहेर पडताना त्यात जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. ती प्यायल्याने तुमच्या शरिरात जीवाणू जाऊन तुमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. काही गंभीर आजारही होऊ शकतात."

लघवी

फोटो स्रोत, TWITTER

डॉ. अहमद यांच्या मते संसर्गाची लक्षणं वेगळी केली तरीही युरोफेजियाच्या शारीरिक फायद्याचे कुठलेच पुरावे मिळालेले नाहीत.

ते सांगतात की लघवी करण्याच्या क्रियेत शरिरातली विषद्रव्यं शरिरातून बाहेर फेकली जातात.

"अशी विषद्रव्यं पुन्हा शरिरात टाकून त्याचे काही लाभ होत असतील, याचे कोणतेच पुरावे नाहीत. उलट थोड्या प्रमाणात जरी लघवी घेतली तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात."

डॉ. अॅन्ड्रू थॉर्नबर सावध करत सांगतात की तुम्ही लघवी पिता तेव्हा घातक विषद्रव्यं पुन्हा शरिरात सोडता.

त्यांनी बीबीसी थ्रीला सांगितलं, "लघवीची संपूर्ण प्रक्रिया मूत्रपिंडाद्वारे होते. शरीरातलं रक्त फिल्टर करून खनिजांसह क्षार आणि इतर पदार्थ बाहेर काढले जातात."

ते म्हणतात, "निरोगी व्यक्तीच्या लघवीत 95% पाणी आणि 5% विषद्रव्यं असतात. या द्रव्यांमध्ये पोटॅशिअम आणि नायट्रोजन असतं. शरीरात यांचं प्रमाण जास्त असेल तर मूत्रपिंडांवर त्याचा परिणाम होऊ शकतो."

लघवी

फोटो स्रोत, iStock

शिवाय लघवी पिणं आतड्यांसाठी चांगलं नाही आणि मूत्रपिंडांसाठीही घातक ठरू शकतं.

डॉक्टरच नाही तर पोषण आणि आहारतज्ज्ञदेखील लघवी पिणं शरीरासाठी चांगलं नसल्याचा सल्ला देतात.

न्यूट्रीशनिस्ट केरी फिल्टनेस यांनी बीबीसी थ्रीला सांगितलं की लघवीत 95% पाणी असल्याने ते पिण्यास योग्य असल्याचा समज चुकीचा आहे.

त्या म्हणतात उत्तम आरोग्यासाठी पाणी किंवा हर्बल चहाच घेतला पाहिजे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)