You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांचा पुन्हा आणीबाणी जाहीर करण्याचा इशारा
मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी मिळवण्यासाठी आणीबाणी जाहीर करू, असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
अमेकरिकेत सध्या सरकार ठप्प झाले असताना ट्रंप यांनी मेक्सिको सीमेला भेट दिली आणि त्यांनी आपल्याला "राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचा मला पूर्ण हक्क आहे," असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मेक्सिको या भिंतीला अप्रत्यक्षरीत्या निधी देईल, असे आपल्या जुन्या प्रचाराशी विसंगत विधानही त्यांनी केले.
गेले 20 दिवस अमेरिकेत सरकार अंशतः ठप्प असून त्यामुळे 8 लाख कामगारांना वेतन मिळालेले नाही.
"अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामधील भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलरचा समावेश केला नाही तर सरकार पूर्ववत होण्याच्या आणि निधीच्या विधेयकावर स्वाक्षरी करणार नाही," असा पवित्रा ट्रंप यांनी घेतला आहे.
हाऊस ऑफ रिप्रेंझेटिटिव्हमध्ये बहुमत असणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षानेनी भिंतीसाठीच्या निधीला रोखून धरला आहे. रिपब्लिकन सदस्य ट्रंप यांच्या पाठीशी उभे राहिले असले तरी काही सदस्यांनी सरकार पूर्ववत सुरू होण्याच्या बाजूने मत व्यक्त केले आहे.
काँग्रेसला टाळून ट्रंप या भिंतीसाठी पैसे कसे मिळवू शकतात?
टेक्सासमधील रिओ ग्रँड व्हॅलीमधील मॅकअँलन येथे ट्रंप यांनी भेट दिली.
जर काँग्रेसने या भिंतीसाठी निधी मंजूर केला नाही तर 'त्यांना टाळण्यासाठी कदाचित नव्हे नक्कीच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू,' असा इशारा ट्रंप यांनी दिला.
राष्ट्राध्यक्ष राष्ट्रीय आणीबाणी आणि युद्धाच्यावेळेस केवळ लष्करासंदर्भातील बांधकामाचे आदेश देऊ शकतात. घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते.
काँग्रेसने इतर कारणांसाठी तरतूद केलेल्या निधीतून पैसा येणे गरजेचे आहे, त्याला काही रिपब्लिकन्स विरोध करू शकतात.
रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम म्हणतात, 'ट्रंप यांनी ही भिंत बांधण्यासाठी आणीबाणीत मिळणाऱ्या अधिकारांचा वापर करण्याची वेळ आली आहे'.
तर डेमोक्रॅटिक सिनेटर जो मॅन्चिन यांच्या मते राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय चूक ठरू शकतो, अडथळा संपविण्यासाठी त्यांच्याकडे एकमेव पर्याय आहे.
काही तज्ज्ञांच्या मते, "असा निर्णय घेण्यामुळे प्रशासन पुन्हा कार्यरत होऊ शकेल आणि निवडणुकीच्या प्रचारात आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केला होता असे सांगण्याची संधी ट्रंप यांना मिळेल."
'प्युएर्टो रिकोसह इतर आपत्ती क्षेत्रामधील बांधकामांसाठी प्रकल्पांचा निधी भिंतीसाठी वळवावा," असे ट्रंप यांना सुचवण्यात आल्याचे वृत्त अमेरिकेतील माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.
भिंतीबाबत ट्रंप यांनी आपली भूमिका कशी मांडली?
मॅकअँलन स्टेशन येथे ट्रंप यांनी त्यांची भूमिका मांडली. तेव्हा तेथे सीमेवर गस्त घालताना सापडलेली शस्त्रे व रोख रक्कम प्रदर्शित करण्यात आली होती.
त्यांच्याबरोबर सीमेवर गस्त घालणारे अधिकारी तसेच बेकायदेशीर स्तलांतरितांद्वारे मारल्या गेलेल्या लोकांचे नातेवाईकही होते.
तेथे ट्रंप म्हणाले, "जर आपण भिंत बांधली नाही तर हा प्रश्न सुटणार नाही. स्थलांतरितांच्या समस्येमुळे अनेक भीषण प्रश्न निर्माण झाले, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. ही भिंत बांधणे म्हणजे मध्ययुगीन कल्पना आहे असे काहींना वाटते पण काही ठराविक उपायच करावे लागतात."
भिंतीच्या निधीबाबत ट्रंप यांनी भूमिका बदलली?
मेक्सिको सीमेवर भिंत बांधली जाईल आणि त्यासाठी 'मेक्सिकोलाही पैसे द्यायला भाग पाडू,' असे ट्रंप यांनी निवडणूक प्रचारात आश्वासन दिले होते. मात्र 'मेक्सिकोला कधीही एकरकमी पैसे द्यायला सांगू असे कधीच म्हटले नसल्याचे,' त्यांनी गुरुवारच्या भाषणात सांगितले.
मेक्सिको या भिंतीसाठी पैसे देईल, असे जेव्हा मी म्हणालो तेव्हा मेक्सिको एखादा चेक लिहून देईल असे आपण कधीच म्हणालो नसल्याचं त्यांनी गुरुवारी सांगितले. 2016 सालच्या प्रचारसभेत मात्र त्यांनी मेक्सिकोला या भिंतीसाठी 5 ते 10 अब्ज डॉलर्स एकरकमी द्यायला भाग पाडू, असे ते म्हणाले होते.
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यामध्ये झालेल्या नव्या व्यापार करारानुसार मेक्सिको प्रत्यक्ष निधी देण्याऐवजी इतर अनेक अप्रत्यक्ष मार्गांनी अनेकदा पैसे देईल असे ट्रंप यांनी सांगितले. अर्थतज्ज्ञ आणि टीकाकारांनी या करारामुळे मिळणारा निधी अमेरिकेच्या वित्तकोषात जाण्याऐवजी खासगी उद्योगांकडे जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
शटडाऊनचे पुढे काय होईल?
एखाद्या निधीला ठराविक वेळेत अमेरिकन काँग्रेसने मान्यता न दिल्यास किंवा राष्ट्राध्यक्षांनी त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यास अंशतः शटडाऊन म्हणजे प्रशासन अंशतः ठप्प होते.
हे शटडाऊन 22 डिसेंबर रोजी सुरू झाले असून त्यामुळे सरकार 25 टक्के ठप्प झाले आहे. त्यामुळे 8 लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला असून त्यातील साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना विनावेतन सुटीवर पाठविण्यात आले आहे किंवा तात्पुरते वेतन थांबवण्यात आले आहे.
ट्रंप यांनी डेमोक्रॅटिक नेत्यांबरोबरची बैठक सोडल्यानंतर शटडाऊनवरील चर्चा निष्फळ ठरली.
मेक्सिको भिंतीचा निधी विधेयकात समाविष्ट करण्याबाबत डेमोक्रॅटिक नेते नॅन्सी पेलोसी आणि चक शुमर यांनी किंचितही नमतं घेण्यास नकार दिल्यानंतर ही बैठक म्हणजे वेळ वाया गेल्यासारखे आहे, असे मत ट्रंप यांनी व्यक्त केले.
शटडाऊन सुरू झाल्यापासूनचा पगाराचा पहिला दिवस आज शुक्रवारी येत आहे. कित्येक कर्मचारी या दिवशी पगाराविनाच राहातील. अनेक कर्मचाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी गुरुवारी शटडाऊनविरोधात व्हाईटहाऊससमोर निदर्शने केली.
या आठवड्याअखेर अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे शटडाऊन ठरले आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)