ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणं

अॅडलेड कसोटी जिंकत भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात झोकात केली. सुरुवातीला पर्थच्या नव्याकोऱ्या स्टेडियमवर अवघड खेळपट्टीवर भारतीय संघाने चांगला खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने या कसोटीमध्ये भारताला 146 धावांनी हरवलं.

भारताच्या या कसोटीतील पराभवाची 5 कारणं अशी.

1. स्पिनर न खेळवण्याचा निर्णय अंगलट

पर्थच्या नव्या कोऱ्या स्टेडिमयवर होणारी ही पहिलीच कसोटी होती. खेळपट्टीवर गवत राखण्यात आल्याने वेगवान गोलंदाजांना सर्वाधिक मदत मिळेल असा होरा तज्ज्ञांनी वर्तवला होता. भारतीय संघव्यवस्थापनाने अॅडलेड कसोटीनंतर संघात दोन बदल केले. रोहित शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन दुखापतग्रस्त झाल्याने हनुमा विहारी आणि उमेश यादवला संधी मिळाली. भारतीय संघाने इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि उमेश यादव अशा चार गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र असं करताना संघाने विशेषज्ञ फिरकीपटूला संघात न घेण्याचा निर्णय घेतला.

अश्विन फिट नसल्याने रवींद्र जडेजा किंवा कुलदीप यादवला संधी मिळेल अशी शक्यता होती. मात्र भारतीय संघाने चार गोलंदाजांसह खेळण्याचा धोका पत्करला. उमेश यादवला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियॉनने विकेट्स मिळवताना धावाही रोखत ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे विशेषज्ञ फिरकीपटू संघात नसल्याचा फटका भारतीय संघाला बसला. कामचलाऊ गोलंदाज हनुमा विहारीने आपल्यापरीने प्रयत्न केला मात्र तेवढं भारतीय संघासाठी पुरेसं नव्हतं.

2. दोन्ही सलामीवीरांचं अपयश

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत युवा पृथ्वी शॉ याने दिमाखदार पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धही तो ठसा उमटवेल अशी आशा होती. मात्र कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी आयोजित सराव सामन्यात पृथ्वीच्या पायाला दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने तो संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. पृथ्वी खेळू शकणार नसल्याने लोकेश राहुलला अंतिम अकरात स्थान मिळालं. अॅडलेड कसोटीतील अपयशानंतर पर्थ कसोटीत मुरली विजय आणि लोकेश राहुल यांच्याकडून दमदार सलामीची अपेक्षा होती. मात्र या दोघांनी दोन्ही डावांत निराशा केली.

मुरली विजयला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही तर लोकेश राहुल दोन धावा करून माघारी परतला. दुसऱ्या डावात लोकेश शून्यावरच तंबूत परतला. मुरली विजयने दोन तासांहून अधिक काळ नांगर टाकला मात्र तो केवळ 20 धावा करू शकला. सलामीवीरांकडून ठोस योगदान न मिळाल्याने मधल्या फळीतील खेळाडूंवरचा दबाव वाढला.

3. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियावरची पकड सैल

ऑस्ट्रेलियाच्या 326 धावांसमोर खेळताना भारतीय संघाचा पहिला डाव 283 धावांतच आटोपला होता. त्याचवेळी खेळपट्टी फलंदाजीसाठी अवघड होत जाणार आहे हे स्पष्ट झालं होतं. 4 बाद 120 स्थितीतून टीम पेन आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढलं. मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजीचं प्रदर्शन करताना 6 विकेट्स मिळवल्या मात्र तरीही ऑस्ट्रेलियाने 243 धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या तळाच्या चार फलंदाजांनी 37 धावा जोडल्या. भारतीय संघासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात त्यांनी यश मिळवलं. शमीला दुसऱ्या बाजूने आवश्यक साथ न मिळाल्याने भारताची सामन्यावरची पकड सैल झाली.

4. फिरकीचं कोडं

भारतीय संघाने 2018मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात कसोटी विजय साकारला आहे. फिरकी आक्रमण ही भारताची ताकद आहे. मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या फिरकी आक्रमणाचं कोडं भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. इंग्लंड दौऱ्यात आदिल रशीद आणि मोईन अली यांनी भारतीय फलंदाजांना सतावलं होतं.

ऑस्ट्रेलियात नॅथन लियॉनने भारताच्या डावाला खिंडार पाडले. खेळपट्टीवर गवत असल्याने वेगवान गोलंदाजांना साहाय्य मिळेल अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात लियॉनने आपल्या कौशल्याच्या बळावर सामन्यात 8 विकेट्स पटकावत सामन्याचं पारडं पलटवलं. दुसऱ्या डावात लियॉनने विराट कोहलीचा अडसर दूर केला आणि ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर झाला.

5. पाठलागाचं वावडं

यंदाच्या वर्षात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा हा सहावा पराभव आहे. केपटाऊन कसोटी 208 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 135 धावांतच आटोपला. चौथ्या डावात फलंदाजी करताना खराब होत जाणाऱ्या खेळपट्टीचा सामना करावा लागतो. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या आक्रमणाची धार वाढते. अशा परिस्थितीत भारतीय संघ ढेपाळत चालल्याचं चित्र आहे. सेंच्युरियन कसोटीत 287 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 151 धावांतच गडगडला.

बर्मिंगहॅम इथे 194 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 162 धावाच करू शकला. साऊदॅम्पटनला 245 धावांसमोर भारतीय संघाने 184 धावांतच समर्पण केलं. ओव्हल कसोटीत भारतीय संघासमोर 464 धावांचं खंडप्राय आव्हान होतं. भारतीय संघाने 345 धावांची मजल मारत चांगली टक्कर दिली. या पराभवातून बोध न घेतल्याने पर्थ कसोटीत 287 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 140 धावांतच आटोपला. पाचव्या आणि अंतिम दिवशी भारतीय संघाने 28 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स गमावल्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)