You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेगन मार्कलच्या दुखावलेल्या बाबांची कहाणी
"प्रिन्स हॅरीशी लग्न झाल्यानंतर माझ्या मुलीने माझ्यासोबत कोणताही संवाद साधला नाही. मी मात्र तिला नियमितपणे रोज एक मेसेज पाठवतो," या शब्दांत 'डचेस ऑफ ससेक्स' अर्थात मेगन मार्कल यांचे वडील थॉमस मार्कल यांनी आपली व्यथा मांडली.
"मेगनसाठी मी जणूकाही नसल्यातच जमा आहे," अशी भावना ITVच्या गुड मॉर्निंग ब्रिटन या कार्यक्रमात बोलताना थॉमस मार्कल यांनी व्यक्त केली. मार्कल यांना शाही लग्नाचे निमंत्रण होते, मात्र हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागल्यामुळे ते लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत.
मार्कल म्हणाले, "तू माझी मुलगी आहेस आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू कशी आहेस, हे मला जाणून घ्यायचंय. आपल्यामध्ये जे काही मतभेद आहेत, ते आपण दूर करु शकतो,'' असा विश्वासही मार्कल यांनी व्यक्त केला.
पत्रकारांना दिलेल्या 'त्या' छायाचित्रांमुळे वाद
मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी यांच्या लग्नाच्या ऐन धामधुमीत थॉमस मार्कल हे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. नवीन सुटाची मापे घेताना किंवा लग्नाच्या तयारीच्या फोटोंसाठी पत्रकारांना सामोरे जाऊन त्यांनी वाद ओढवून घेतला होता. सॅन दिएगोमधून बोलताना त्यांनी या गोष्टीचाही उल्लेख केला. "त्या घटनेसाठी मी शंभर वेळा माफी माफी मागितली आहे. मला आयुष्यातून हद्दपारच करुन टाकावं इतपत ही गोष्ट मला मोठी वाटत नाही," असेही मार्कल म्हणाले.
मेगन मार्कल आई होणार असल्याची घोषणा ऑक्टोबरमध्ये करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदाच थॉमस मार्कल यांनी आपल्या मुलीसोबत बिघडलेल्या नातेसंबंधावर भाष्य केलं आहे. "गेल्या अनेक आठवड्यांपासून मी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. तिला रोज एक मेसेज पाठवतोय पण कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये," असं मार्कल यांनी मुलाखतीमध्ये म्हटलंय. मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्यावर माध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे परिणाम झाला असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. ही खूप दुर्दैवी बाब असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
मार्कल म्हणाले, "कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं तेच मला वर्षभरापूर्वी सांगायचे. आता मात्र तेच माझ्याबद्दलच्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहेत. मी जे बोलत नाहीये, तेदेखील बोलत असल्याचा समज त्यांनी करून घेतलाय."
येणाऱ्या नातवाला भेटण्याची उत्सुकता
74 वर्षीय थॉमस मार्कल अजूनपर्यंत आपल्या जावयाला, प्रिन्स हॅरीला भेटलेले नाहीत. येणाऱ्या नातवंडाला तरी किमान आपल्याला भेटता येईल, अशी आशा मार्कल यांना आहे. मेगन स्वतःला चांगली आई म्हणून सिद्ध करेल. मुलाच्या जन्मानंतर कदाचित गोष्टी बदलतील आणि आमचा संवाद पुन्हा सुरू होईल, असेही मार्कल यांनी म्हटले.
आपली मुलगी अतिशय खंबीर असल्याचं या मुलाखतीदरम्यान मार्कल यांनी सांगितलं. मार्कल यांनी म्हटलं, की "तिचं व्यक्तिमत्त्व काहीसं स्वामित्व गाजवणारं आहे, पण ती उद्दाम किंवा उद्धट नाहीये."
या मुलाखतीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास केन्सिंग्टन पॅलेसकडून नकार देण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)