You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या आहेत ब्रिटिश शाही विवाहाला जाणाऱ्या भारतीय महिला
- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सुहानी जलोटा भारताच्या आर्थिक राजधानीत राहणाऱ्या एका सामान्य मुलीसारख्या दिसतात. त्यांचे हास्य मोहक आहे आणि डोळ्यात एक तेज आहे. पण वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी असं काही कमावलं आहे जे त्यांच्या वयाच्या कुणी क्वचितच कमावण्याचं स्वप्न पाहिलं असेल.
तीन वर्षांपूर्वी सुहानी आणि मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या काही महिलांनी मैना महिला फाऊंडेशनची स्थापना केली. मैना महिला फाऊंडेशन महिलांमध्ये मासिक पाळीसंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करते.
सुहानी यांच्या कामानं हजारो महिलांना सशक्त केलं आहे. गेल्या महिन्यात त्यांना यूकेमध्ये होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याचं निमंत्रण आलं आहे.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी एकूण 7 चॅरिटी संस्थांना त्यांच्या लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. त्यात मैना महिला फाऊंडेशनचा समावेश आहे.
लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांनी कोणत्याही भेटवस्तू न आणता या संस्थांना डोनेशन द्यावं, असं आवाहन जोडप्यानं केलं आहे.
संस्थेत उत्साहाचं वातावरण
"विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या चॅरिटी संस्थांची या जोडप्यानं निवड केली आहे. यात सामाजिक बदलांसाठी खेळाचा वापर, महिलांचं सक्षमीकरण, संवर्धन, पर्यावरण, बेघर, एचआव्ही आणि आर्म्ड फोर्ससंदर्भात काम करणाऱ्या संस्था आहेत. यापैकी बहुतेक चॅरिटी संस्थांचा आकार खूपच लहान आहे. या संस्थांच्या कामावर प्रकाश टाकण्यासाठी जोडपं उत्सुक आहे," असं केंझिंग्टन पॅलसनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
मैना महिला फाऊंडेशन ही या यादीतली एकमेव परदेशी संस्था आहे. इतर 6 चॅरिटी संस्था यूकेमधल्याच आहेत.
सुहानी यांच्यासोबत त्यांच्या संस्थेतल्या काही सहकारी या शाही विवाह सोहळ्यासाठी यूकेला जाणार आहेत.
"आम्ही याबाबत खूपच उत्सुक आहोत. हा सन्मान मिळाल्यानं आम्हाला छान वाटतंय. आमच्या निवडीबद्दल शाही कुटुंबाकडून आम्हाला फोन आला होता. मेगन यांनीही फोन केला होता. असं काही होईल, असं आम्हाला वाटत नव्हतं," असं त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितलं आहे.
प्रतिकूल परिस्थितीत जनजागृती
मुंबईतल्या गोवंडीमधल्या झोपडपट्टीच्या भागात मैना महिला फाऊंडेशनचं कार्यालय आहे. कार्यालयाकडे जाणारा रस्ता कचऱ्यानं व्यापलेला आहे आणि दोन्ही बाजूला गटारं आहेत. या भागात गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे आणि साक्षरतेचा दरही कमी आहे.
अशा विपरीत परिस्थितीत सुहानी आणि इतरांनी या गटातल्या महिलांना एकत्र आणण्याचं काम सुरूच ठेवलं. त्यांनी या परिसरातल्या महिलांना सॅनिटरी पॅड बनवण्याचं प्रशिक्षण आणि रोजगार दिला. त्या आता दिवसाला 1000 पॅड तयार करतात.
मैना पॅड पहिल्यांदा जुलै 2015मध्ये तयार झाले आणि मे 2016पर्यंत मुंबईच्या झोपडपट्टीतल्या 1500 महिलांपर्यंत पोहोचले होते.
"मासिक पाळीच्या काळातल्या स्वच्छतेबद्दल त्यांनी आपसांत तसंच खुलेपणानं बोलावं अशी आमची इच्छा आहे. हे सगळं त्यांचा स्वत:बद्दल असलेला दृष्टिकोन आणि आत्मविश्वास यांच्याशी निगडीत आहे. म्हणून आम्ही अशा ठिकाणी युनिट काढायचं ठरवलं जिथं त्या पॅड बनवतील, पाळीबद्दल बोलतील, त्यांच्या नवऱ्याला, भावाला आणि मुलांना जाऊन सांगतील की आम्ही उदरनिर्वाहासाठी सॅनिटरी पॅड्स बनवतो," असं सुहानी सांगतात.
संस्थेचं नाव मैना या पक्षावरून ठेवण्यात आलं आहे. मैना या शब्दाचा अर्थ बोलका असा होतो. या पक्षासारखंच स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेबद्दल बोलावं असं त्यांना वाटतं.
मैना फाऊंडेशनला मिळणारी मदत ही बहुतांशी मोठ्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी फंडातून येते. आता त्यांना प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे आता त्यांना आणखी मदत मिळण्याची सुहानी यांना आशा आहे.
भारतात मासिक पाळीबद्दल उघडपणे बोललं जात नाही. काही कुटुंबांमध्ये पाळी असलेल्या स्त्रियांना अपवित्र मानलं जातं. त्यांना घरच्या कामात भाग घेऊ दिला जात नाही. मासिक पाळीशी निगडीत चर्चांमध्ये पुरुष सहभाग सुद्धा घेत नाहीत.
"जेव्हा एखादी स्त्री सॅनिटरी नॅपकिन घ्यायला जाते आणि दुकानदार जर पुरुष असेल तर तो पॅड पेपरमध्ये गुंडाळून एका काळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून देतो. त्यामुळे एखादी लाजिरवाणी वस्तू नेत असल्याची भावना स्त्रीच्या मनात उत्पन्न होते." सुहानी सांगतात.
या संदर्भात आरोग्याच्या देखील अनेक समस्या आहेत. गरीब महिला पाळीच्या काळात कापड वापरतात. ते जर नीट धुतलं गेलं नाही तर त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
त्यामुळे मैना फाऊंडेशनच्या स्वयंसेविका प्रत्येक दारात जाऊन हे नॅपकिन विकतात. त्याचवेळी मासिक पाळीच्या काळातल्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्याचं काम करतात.
अर्चना आंब्रे फाऊंडेशनच्या अगदी स्थापनेपासून काम करतात. त्यासुद्धा सुहानी यांच्याबरोबर शाही लग्नाला जाणार आहेत. मेगन मार्कलनं जेव्हा मागच्या वर्षी मॅन्युफॅक्चरिंग युनिटला भेट दिली तेव्हा अर्चना आणि मेगन यांची भेट झाली होती.
"मला लग्नाला जायला मिळतंय यावर माझा विश्वास बसत नाहीये. विमानात बसण्याचं माझं स्वप्न होतं आणि आता ते पूर्ण होतंय," त्या उत्साहाने सांगत होत्या.
मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्यासाठी त्या एक भेटवस्तू देखील घेऊन जात आहेत. मैना पक्षाचं एक कट आऊट त्यांनी तयार केलंय. त्यावर फाऊंडेशनच्या स्टाफने संदेश लिहिले आहेत. ही भेट शाही परिवाराच्या नक्की आठवणीत राहील अशी त्यांना अपेक्षा आहे.
लग्नाला निमंत्रित इतर संस्था
CHIVA (Children's HIV Association) : यूके आणि आयर्लंड मध्ये एचआयव्ही बाधित 1,000 लोकांसाठी काम करणारी ही संस्था आहे.
Crisis : बेघर माणसांचं पुनर्वसन करण्यासाठी ही संस्था मदत करते.
Scotty's Little Soldiers : ब्रिटिश लष्करी जवानांच्या अनाथ मुलांसाठी ही संस्था काम करते.
StreetGames : आरोग्यदायी जीवनशैलीसाठी खेळांचा प्रचार करण्याचं काम ही संस्था करते.
Surfers Against Sewage : वन्यजीव, समुद्रीजीव आणि सागरी किनाऱ्यांच्या संवर्धनाचं काम ही संस्था करते.
The Wilderness Foundation UK : या संस्थेत शहरातल्या वाममार्गाला लागण्याची शक्यता असलेल्या युवकांना रोजगाराचं प्रशिक्षण दिलं जातं.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)