पश्चिम जेरुसलेम ही इस्रायलची राजधानी- ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने पश्चिम जेरुसलेम हीच इस्रायलची राजधानी असेल, अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केली आहे.

त्याचवेळी शांतता प्रक्रिया पार पडेपर्यंत ऑस्ट्रेलियाचा दूतावास तेल अविवमधून हलवणार नाही असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

पूर्व जेरुसलेम या राजधानीसह देशाच्या पॅलिस्टिनच्या आकांक्षाचांही ऑस्ट्रेलिया दखल घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जेरुसलेमची हा इस्रायल आणि पॅलेस्टिन वादातील कायमच कळीचा मुद्दा राहिला आहे.

मे महिन्यात अमेरिकेने त्यांचा दूतावास तेल अविव येथून जेरुसलेमला हलवला होता.

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या मते जेरुसलेमच इस्रायलची राजधानी असेल, असं जाहीर करत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठा बदल केला होता. या निर्णयामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीकेची झोड उठली होती.

हा मुद्दा इतका महत्त्वाचा का?

इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षात जेरुसलेम हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे.

इस्रायलच्या मते जेरुसलेम ही त्यांची एकसंध राजधानी आहे तर पॅलेस्टाईनच्या मते पूर्व जेरुसलेम ही त्यांच्या भविष्यात उदयाला येणाऱ्या देशाची राजधानी असेल. मध्य पूर्व आशियात झालेल्या संघर्षानंतर या शहरावर 1967पासून इस्रायलचा ताबा आहे.

जेरुसलेमवर इस्रालयचा असलेल्या वर्चस्वाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर कधीच स्वीकार झाला नाही. 1993मध्ये इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यात झालेल्या शांतता करारात जेरुसलेमबद्दल कराराच्या नंतरच्या टप्प्याच्या चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असं ठरलं होतं.

1967पासून इस्रायलने अनेक करार केले आहेत. पूर्व जेरुसलेममध्ये जवळपास 20,000 ज्यू लोक राहतात. इस्रायलने केलेल्या कराराला आंतररराष्ट्रीय पातळीवर बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. यावर इस्रायलचे अनेक आक्षेप आहेत.

डिसेंबर 2017मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी अमेरिकेच्या निर्णयाच्या विरोधात मतदान केलं होतं, तसंच हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणीही केली.

मॉरिसन यांनी हा निर्णय तेथील नेते आणि मित्रपक्षांशी चर्चा करून घेतला आहे.

"पश्चिम जेरुसलेम हीच इस्रायलची राजधानी असं ऑस्ट्रेलिया जाहीर करत आहे. हा भाग इस्रायलच्या संसदेचा आणि प्रशासनाचा महत्त्वाचा भाग आहे," असं मॉरिसन यांनी सिडनेत सांगितलं.

"जेव्हा व्यावहारिक पातळीवर शक्य होईल आणि अंतिम निर्णय होईल तेव्हा आम्ही आमचा दूतावास पश्चिम जेरुसलेमला नेऊ," असंही ते पुढे म्हणाले.

जेव्हा या धोरणाबाबत ऑक्टोबरमध्ये चर्चा करण्यात आली तेव्हा इस्रायलने या निर्णयाला पाठिंबा दिला मात्र पॅलेस्टाईनने विरोध केला.

अमेरिकेप्रमाणेच ऑस्ट्रेलियाही आपला दूतावास जेरुसलेमला हलवणार या वृत्ताचं मॉरिसन यांचे पूर्वसुरी माल्कम टर्नबुल यांनी खंडन केलं.

ग्वाटेमाला आणि पॅराग्वे या दोन देशांनीही हा बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पॅराग्वेमध्ये सरकार बदलल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)