You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेरुसलेम इस्राईलची राजधानी : ट्रंप यांच्या घोषणेनंतर परस्परविरोधी प्रतिक्रियांना उधाण
मध्य-पूर्व आशियातील अरब-इस्राईल वादाच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेने निर्णायक भूमिका घेत वादग्रस्त जेरुसलेम ही इस्राईलची राजधानी असल्याची घोषणा केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या या भूमिकेचं इस्राईलने स्वागत केलं असलं, तरी पॅलेस्टिनी नेत्यांसह जगभरातील अनेकांनी टीका केली आहे.
ट्रंप यांनी अमेरिकेचा इस्राईलमधला दूतावास तेल अवीवहून जेरुसलेमला हलवण्याच्या निर्णयालाही मंजुरी दिली आहे.
"ही भूमिका अमेरिकेने खरं तर कधीच घ्यायला हवी होती. इस्राईल-पॅलेस्टाइन वादात आतापर्यंत सगळ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. पण त्यामुळे शांतता प्रक्रियेत काडीचाही फरक पडलेला नाही. आता अमेरिकेच्या या भूमिकेमुळे शांतता प्रक्रियेला चालना मिळेल", असा विश्वासही ट्रंप यांनी व्यक्त केला.'ट्रंप यांनी अशा प्रकारची घोषणा केली, तर त्याचे परिणाम भयानक असतील', असा इशारा पॅलेस्टिनी नेते महमूद अब्बासी यांनी दिला होता.
ट्रंप काय म्हणाले?
आपल्या ऐतिहासिक भाषणात ट्रंप यांनी आतापर्यंतच्या शांतता प्रक्रियेवर ताशेरे ओढले.
"या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आतापर्यंत केलेले सगळे उपाय अयशस्वी ठरले आहेत. हेच धोरण पुन्हा वापरण्यात काही अर्थ नाही," ट्रंप म्हणाले.
"आजच्या माझ्या घोषणेमुळे इस्राईल-पॅलेस्टाइन वादाकडे एका नव्या दृष्टीकोनातून बघता येईल," असं त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं.
"जेरुसलेमला इस्राईलच्या राजधानीचा दर्जा देण्यात दिरंगाई करण्याच्या धोरणामुळे शांतता प्रक्रियेत काहीच साधलेलं नाही," असं सांगत जेरुसलेम इस्राईलची राजधानी असल्याची घोषणा त्यांनी केली.
घोषणा महागात पडेल!
ट्रंप यांची घोषणा 'मृत्युला आमंत्रण' देणारी आहे, अशी खरमरीत टीका पॅलेस्टिनी पक्षांनी केली.
ट्रंप यांनी मंगळवारी काही अरब राष्ट्रांच्या प्रमुखांना आपल्या या घोषणेबद्दल पूर्वकल्पना देण्यासाठी फोन केला होता.
त्या वेळी सौदी अरेबियाचे राजे सलमान, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फत्ताह अल-सिसी आणि पॅलेस्टिनी नेते मुहम्मद अब्बास यांनी ट्रंप यांना स्पष्ट इशारा दिला होता.
ट्रंप यांनी अशी घोषणा केल्यास अरब राष्ट्रंच नाही, तर जगभरातील मुस्लिमांचा भडका उडेल आणि अमेरिकेला ते महागात पडेल, असा इशाराच अरब राष्ट्रांनी दिला होता.
अमेरिकेने बुधवारी याबाबतची अधिकृत घोषणा केल्यानंतरही पॅलेस्टिनी पक्षाने अमेरिकेच्या या भूमिकेबद्दल कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली.
गाझा पट्टीच्या दक्षिण भागात पॅलेस्टाइन समर्थकांनी ट्रंप आणि इस्राईलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांच्या प्रतिमांचं दहन करत अमेरिकेच्या भूमिकेविरोधात निषेध व्यक्त केला.
इस्राईलची बाजू घेणाऱ्या एका उदारमतवादी गटाचे प्रमुख जे स्ट्रीट यांनीही ट्रंप यांच्या भूमिकेवर आसूड ओढला आहे.
त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'जेरूसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा ट्रंप यांचा निर्णय धोकादायक आणि अत्यंत घिसाडघाई करून घेतला आहे.'
कोफी अन्नान यांचाही शेलका आहेर
नेल्सन मंडेला यांनी स्थापन केलेल्या माजी राष्ट्रप्रमुखांच्या 'द एल्डर्स' या ग्रुपनेही ट्रंप यांच्यावर टीका केली आहे. 'अमेरिकेचा हा निर्णय मध्य-पूर्व आशियातील शांतता प्रक्रियेला सुरूंग लावू शकतो', असं त्यांनी म्हटलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव कोफी अन्नान यांनी लिहिलंय, "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निर्णयामुळे मला अतीव दु:ख झालं आहे. प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या शांतता प्रक्रियेची दिशा त्यांनी एका झटक्यात बदलून टाकली आहे. जेरुसलेमबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने घेतलेल्या भूमिकेपासून त्यांनी फारकत घेतली आहे."
अरब देशांबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणतात, "मी आशा करतो की, पॅलेस्टिनी आणि अरब राष्ट्रं आता संयम बाळगतील. तसंच अमेरिकेशी मैत्रिपूर्ण संबंध असलेले देश आपल्या प्रभावाचा वापर करून वॉशिंग्टनच्या धोरणांमध्ये बदल होण्यासाठी शक्य होईल तेवढं सगळं करतील."
तसंच त्यांनी या प्रश्नाशी संबंधित सगळ्याच गटांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. "आता या वादाचा भडका उडेल अशा कोणत्याही गोष्टींपासून सगळ्यांनाच चार हात लांब राहावं लागणार आहे," ते म्हणाले.
'जेरुसलेम आमचंच'!
इस्राईलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू यांनी 'एक ऐतिहासिक निर्णय' या शब्दांत अमेरिकेच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इस्राईलच्या इतिहासात हा मोठा दिवस असल्याचं ते म्हणाले.
"इस्राईलच्या स्थापनेपासूनच म्हणजेच 70 वर्षांपासून जेरुसलेम इस्राईलची राजधानी आहे. तब्बल तीन हजार वर्षांपासून आमच्या आशा, आमची स्वप्नं आणि आमच्या प्रार्थना यांचं जेरूसलेम हे केंद्रस्थान आहे. तेव्हापासूनच जेरूसलेम ही आमची राजधानी आहे," या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
"ही जागा आमच्यासाठी पवित्र आहे. इथेच आमचं पवित्र धर्मस्थळ आहे, याच जागी आमच्या राजांनी राज्य केलं, आमच्या प्रेषितांनी इथूनच धर्माचा संदेश दिला," नेतान्याहू म्हणाले.
"जगाच्या कानाकोपऱ्यात ज्यू लोकांवर अनन्वित अत्याचार झाले. हताश झालेले ज्यू लोक याच पवित्र शहराच्या आसऱ्याला आले. इथल्या पवित्र दगडांना स्पर्श करण्यासाठी, इथल्या रिकाम्या रस्त्यांवरून फिरण्यासाठी! त्यामुळेच या ऐतिहासिक क्षणी या शहराबद्दल बोलताना मला गहिवरून आलं आहे," नेतान्याहू यांनी भावूक होऊन सांगितलं.
आणखी काय म्हणाले ट्रंप?
आपल्या भाषणात ट्रंप यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. ते म्हणाले, "दोन दशकांपासून इस्राईल-पॅलेस्टाइन वादावर चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. पण शांतता प्रस्थापित करण्याच्या तसूभरही जवळ आपण पोहोचलेलो नाही. आता पुन्हा तीच धोरणं राबवून ही शांतता प्रक्रिया चालू ठेवणं आणि त्यातून काहीतरी ठोस हाती लागेल, असं मानणं हा मूर्खपणा ठरेल."
"या निर्णयानंतर आम्ही शांतता प्रक्रियेशी फारकत घेतली, असं अजिबातच नाही," अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
ते म्हणाले, "इस्राईल आणि पॅलेस्टाइन या दोघांनाही मान्य होईल, असा काहीतरी तोडगा काढायला हवा. हा तोडगा काय असेल, याबाबत आम्ही काहीच भाष्य करत नाही. पण शांतता प्रक्रिया चालूच राहील."
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)