You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जॉन्सन अँड जॉन्सनची पावडर सुरक्षित आहे का?
औषधनिर्माण क्षेत्रातील नामवंत अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या टाल्कम पावडरमध्ये गेली अनेक वर्षे अॅसबेस्टॉस वापरले जात असल्याचं कंपनीला माहिती होतं, असे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने प्रसिद्ध दिले आहे. या वृत्तानंतर कंपनीचे समभाग 10 टक्क्यांनी घसरले. तर कंपनीने आपली उत्पादनं सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या कंपनीच्या टाल्क उत्पादनांमुळे कॅन्सर होतो, असे दावे न्यायालयात सुरू असतानाच ही नवी माहिती समोर आली आहे. आपल्या उत्पादनांमध्ये अॅसबेस्टॉसचे प्रमाण आहे, याची कंपनीला किमान 1971 पासून कल्पना होती, असं रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे.
"जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर सुरक्षित आणि अॅसबेस्टॉस नसलेली आहे," असे कंपनीचे वकील पीटर बिक्स यांनी स्पष्ट केले आहे.
रॉयटर्सचा लेख 'एकांगी, खोटा आणि प्रक्षोभक असल्याचा दावा करत हा हास्यास्पद कट असल्याचे' त्यांनी म्हटलं आहे.
"टाल्कमध्ये काहीही असले तरी टाल्क असलेल्या बेबी पावडरमुळे कॅन्सर होत नाही असे वैज्ञानिकांत एकमत आहे," असे बिक्स यांनी रॉयटरला पाठवलेल्या इमेलमध्ये म्हटले आहे. "हे सत्य पुरेसे आहे आणि ते सत्य नसेल तरीही जॉन्सन अँड जॉन्सनच्या कॉस्मेटिक टाल्कमध्ये सूक्ष्म प्रमाणातही असबेस्टॉस नाही," असं ते म्हणाले.
अंतर्गत चाचण्या
जॉन्सन अँड जॉन्सनने कोर्टामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांची रॉयटर्सने छाननी केली आहे. 1971पासून 2000 पर्यंत कंपनीने केलेल्या अंतर्गत चाचण्यांमध्ये काही वेळेस कच्च्या टाल्कमध्ये आणि उत्पादनांमध्ये अल्प प्रमाणात अॅसबेस्टॉस सापडल्याचे कागदपत्रांतून दिसून आलं, असं रॉयटर्सनं म्हटलं आहे.
कंपनीने केलेल्या चाचण्यामध्ये बहुतांश वेळा असबेस्टॉस सापडले नाही. नियामकांकडून केलेल्या चाचण्यांची माहिती कंपनीने सादर केलेली नाही, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
"रॉयटर्सची माहिती ही कंपनी उत्पादनांशी संबंधित नसल्याचे," बिक्स यांनी म्हटले आहे. काही कागदपत्रे औद्योगिक टाल्क उत्पादनांची आहेत, असे कंपनीने कोर्टात म्हटले आहे.
या वृत्तानंतर कंपनीचे समभाग 10 टक्क्यांनी घसरले आहे.
टाल्क उत्पादनांमुळे ओव्हेरियन कॅन्सर (अंडाशयाचा कॅन्सर) झालेल्या 22 महिलांना 4.7 अब्ज डॉलर्सची (3.6 अब्ज पौंड) भरपाई देण्याचे आदेश जॉन्सन अँड जॉन्स देण्यात आले होते. एखाद्या कंपनीला झालेला हा सर्वांत मोठा दंड असून कंपनी या विरोधात अपील करत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)