You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मॉन्सँटोने कॅन्सरग्रस्ताला 20 अब्ज रुपये नुकसान भरपाई द्यावी - कोर्टाचा आदेश
रसायन क्षेत्रातील दिग्गज असलेल्या मॉन्सँटो कंपनीला एका व्यक्तीला नुकसान भरपाई म्हणून तब्बल 28.9 कोटी डॉलर, म्हणजे जवळजवळ 1,997 कोटी किंवा जवळजवळ 20 अब्ज रुपये द्यावे लागणार आहेत. मॉन्सँटो एका ग्लायफोसेटयुक्त तृणनाशकामुळे आपल्याला कॅन्सर झाल्याचा दावा त्या व्यक्तीने केला होता.
मॉन्सँटो कंपनीची Round Up आणि RangerPro ही तृणनाशकं धोकादायक होती, हे माहिती असूनही कंपनीने या धोक्याबद्दल ग्राहकांना सावध केलं नाही, असं कॅलिफोर्नियामधील ज्युरींच्या निदर्शनास आलं.
ग्लायफॉसेट मुळे कँसर झाल्याचा दावा करणारा हा पहिलाच खटला आहे.
मॉन्सँटो मात्र या आरोपांचा इन्कार केला असून या निर्णयाला ते आव्हान देणार आहेत. "ज्युरी चुकलेत," असं कंपनीचे स्कॉट पॅट्रिज यांनी सॅन फ्रॅन्सिस्कोच्या न्यायालयाबाहेर सांगितलं.
याच मॉन्सँटो कंपनीची BT कॉटन बियाणं गेल्या वर्षी शेतकऱ्यांना अतिविषारी कीटकनाशक वापर करावा लागला होता. त्यामुळे तेव्हा कीटकनाशकांच्या वापरामुळे झालेल्या 30हून अधिक शेतकऱ्यांच्या मृत्यूला बीटी कॉटन जबाबदार असल्याचं बोललं जात होतं.
आता त्याच मॉन्सँटो कंपनीविरोधात अमेरिकेत ड्वेन जॉन्सन यांनी दाखल केला होता. या तृणनाशकांमुळे प्रभावित झालेल्या 5,000 लोकांपैकी एक आहेत.
बीबीसी प्रतिनिधींच्या मते या निकालामुळे आणखी अशीच काही प्रकरणं मार्गी लागण्याची शक्यता आहे. मॉन्सँटो कंपनीला नुकतंच Bayer AG या जर्मन कंपनीने विकत घेतलं आहे.
याचिकाकर्ता जॉन्सन यांना 2014 मध्ये non-Hodgkin's lymphoma आजार असल्याचं निदान झालं. जॉन्सन नियमितपणे RangerProचा कॅलिफोर्निया बेनिसिया येथे नियमित वापर करत असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं.
कंपनीच्या उत्पादनामुळे जॉन्सन यांना दुर्धर आजार झाला, हे माहिती असूनही कंपनी त्यांच्याबरोबर द्वेषपूर्वक वागली, असं ज्युरी म्हणाले.
अखेर आठ आठवडे चाललेल्या खटल्याचा निकाल देताना ज्युरींनी कंपनीला नुकसानभरपाई म्हणून 25 कोटी डॉलर द्यायला सांगितल. काही इतर खर्चासह हा आकडा 28.9 कोटी डॉलरवर आला.
"जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने असता तेव्हा तुम्ही जिंकताच. यासंदर्भातल्या पुढील खटल्यांसाठी हा निकाल म्हणजे बाणाचं भेदक टोक आहे," असं जॉन्सनच्या वकिलांनी सांगितलं.
या निर्णयानंतर कंपनीनं एक निवेदन जारी केलं. "आम्हाला जॉन्सन आणि त्यांच्या कुटुंबाविषयी सहानुभूती आहे. मात्र आम्ही आमच्या उत्पादनाचं समर्थन करतो. गेल्या 40 वर्षांपासून या उत्पादनाचा सुरक्षितपणे वापर होतोय."
"अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्था, अनेक राष्ट्रीय आरोग्य संस्थानं तसंच जगभरातल्या नियामक संस्थांनी आधीच असा निर्वाळा दिलाय की ग्लायफोसेटने कॅन्सर होत नाही. जवळजवळ 800 वेगवेगळ्या चाचण्यांमधूनही ते स्पष्ट झालं आहे. म्हणून या निर्णयामुळे हे वास्तव बदलणार नाही की ग्लायफोसेटमुळे जॉनसन यांना कॅन्सर झाला नाही," असंही पुढे सांगण्यात आलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)