You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जागतिक तापमान वाढ : पुढचं वर्ष असेल अधिक उष्ण
- Author, मॅट मॅग्रा
- Role, पर्यावरण प्रतिनिधी
पोलंडमध्ये तापमान वाढ आणि हवामान बदल यांच्यावरील COP24 ही महत्त्वाची जागतिक परिषद होत आहे. पॅरिस कराराचा पुढचा टप्पा म्हणून या परिषदेकडे पाहिले जात आहे. 14 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत विविध अहवालांचं सादरीकरण होईल. शिवाय पॅरिस कराराची पुढची दिशा ठरेल. जागतिक हवामान संघटनेचा Climate Reportही या परिषदेत सादर होईल. या अहवालातील हे ठळक मुद्दे.
वर्ष 2018 हे आतापर्यंतच चौथ्या क्रमांकाचं उष्ण वर्ष होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक हवामान संघटनेनं (World Meteorological Organization) ही माहिती दिली आहे.
2018मधील पहिल्या दहा महिन्यांचं तापमान 1850 ते 1900मधील तापमानाच्या पातळीपेक्षा 1 डिग्री सेल्सिअसने जास्त आहे.
The State of the Climate Report या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेली 22 वर्षं आतापर्यंतची 20 उष्ण वर्षं ठरली आहेत. यातील पहिल्या क्रमांकाची चार वर्षं 2015 ते 2018 ही आहेत.
असाच ट्रेंड सुरू राहिला तर 2100चं तापमान 3-5 डिग्रीने वाढलेलं असेल, असं या अहवालात म्हटलं आहे.
2018मधील वाढलेल्या 0.98 डिग्री सेल्सियस तापमानाला 5 जागतिक आकडेवारीचा आधार आहे.
2017शी तुलना करता 2018 थोडं थंड होतं. याच कारण म्हणजे La Niña प्रभाव हे आहे. यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान कमी येतं. तर 2019मध्ये सुरुवातीला कमकुवत अशा El Niñoचा प्रभाव असणार आहे, त्यामुळे 2018शी तुलना करता हे 2018 जास्त गरम असणार आहे.
शास्त्रज्ञांचं मत असं आहे की तापमानामुळे होणारी वाढ समुद्राची वाढती पातळी, समुद्राची वाढती आम्लता आणि हिमनद्यांचं विरघळणं याकडे लक्ष वेधते.
WMOचे सरसचिव पेटेरी टलास म्हणाले, "तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी जी उद्दिष्ट ठेवली आहेत ती मार्गावर नाहीत. ग्रीनहाऊस वायूंचं केंद्रीकरण होण्याने उच्चांक गाठला आहे. असाच ट्रेंड राहिला तर या शतकाच्या अखेरीस जगाचं सरासरी तापमान 3-5 डिग्री सेल्सियस इतकं वाढलेलं असेल."
WMOच्या अहवालात म्हटलं आहे की 2009-2018मध्ये सरासरी तापमान वाढ 0.93 डिग्री इतकी होती. औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी 1850 ते 1900च्या या कालावधीतील तापमानाची जी बेसलाईन ठरवण्यात आली आहे, त्याच्याशी ही तुलना करण्यात आली आहे. हीच तुलना गेल्या 5 वर्षांशी केली तर ही वाढ 1.04 डिग्री इतकी आहे.
WMOच्या उपसचिव एलेना मॅनिकनोव्हा म्हणाल्या, "ही फक्त आकडेवारी आहे, असं समजू नका."
"1 डिग्रीच्या काही प्रमाणात जरी तापमान वाढलं तरी त्याचा परिणाम माणसाचं आरोग्य, अन्न आणि पिण्याच पाण्याची उपलब्धता, प्राणी आणि वनस्पतींचं अस्तित्व, समुद्री जीवसृष्टी आणि प्रवाळ या सर्वांवर याचा परिणाम होतो," असं त्या म्हणाल्या.
"आर्थिक उत्पादकता, अन्नसुरक्षा, शहरं आणि पायाभूत सुविधा यांची नैसर्गिक संकटांशी सामना करण्याची क्षमता यावरही परिणाम होतो. याचा परिणाम हिमनद्यांचं वितळणं, पाण्याचा पुरवठा, किनाऱ्यावर राहाणारे लोक आणि बेटांवरील लोक यांच्या भविष्यावरही होतो. वाढत्या तापमानाचा प्रत्येक डिग्री महत्त्वाचा आहे," असं त्या म्हणाल्या.
2018मधील काही महत्त्वाच्या घटनांची नोंद या अहवालात घेण्यात आली आहे. भारतातील केरळ आणि जपानमध्ये आलेल्या महापुरांची दखल यात घेण्यात आली आहे.
युरोपमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जंगलांत आगी पसरण्याच्या घटनाही घडल्याचं यात म्हटलं आहे.
तर जुलै आणि ऑगस्ट आर्क्टिकमधील उच्च तापमानाच्या घटना, अमेरिका, ग्रीस इथंही आगीच्या घटना नोंद या अहवालाने घेतली आहे.
हा अहवाल बनवणाऱ्या संशोधकांच्या मते हवामान बदलाचे परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत. प्रा. टिम ऑसबोर्न म्हणाले, "ग्रीनहाऊस वायूंचे परिणाम आता दिसू लागले आहेत. ते जागतिक पातळीवर आहेत."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)