You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इसवी 536 : थंडी, रोगराई आणि ज्वालामुखींचा उद्रेक - मानवी इतिहासातील काळं पर्व
ज्वालामुखींचा उद्रेक झाला होता. ज्वालामुखींच्या राखेने उत्तर गोलार्ध व्यापला होता. पृथ्वीवर जणू धुकं पसरलं होतं. जगाचं तापमान 1.5 ते 2.5 डिग्रीने कमी झालं होतं आणि त्या पाठोपाठ रोमन साम्राज्यात प्लेगची साथही आली. तर चीनमध्ये हिमवृष्टी होऊन पीकं नष्ट झाली होती.
हे वर्ष होतं इसवी सन 536.
मानवी इतिहासातील सर्वांत भयंकर वर्ष म्हणून या वर्षाच वर्णन केलं जातं.
जगाच्या कालखंडातील भीषण वर्ष म्हणण्यापेक्षा खूप भीषण टप्पा म्हणजे हे वर्ष होय, असं हॉवर्ड मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ मायकेल मॅककॉर्मिक यांनी सांगितलं.
युरोप, पूर्व आखात आणि आशिया खंडाच्या काही भागांमध्ये गूढ स्वरूपाचं धुकं पसरलं होतं. आणि थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 18 महिने राहिलं होतं, असं त्यांनी 'सायन्स' या जर्नलमध्ये लिहिलं आहे.
इसवी सन 536मध्ये तापमान 1.5 ते 2.5 सेल्सिअसने घसरलं होतं. यामुळे गेल्या 2300 वर्षांतला सगळ्यात कडाक्याचा हिवाळा निर्माण झाला होता. चीनमध्ये हिमवृष्टी झाली होती. पीकं नष्ट झाली. माणसांची उपासमार झाली.
आयरिश क्रोनिकलने केलेल्या नोंदीनुसार इसवी सन 536 ते 539 या कालखंडात अन्नधान्याची टंचाई झाल्याची नोंद केली आहे.
इसवी सन 541मध्ये इजिप्तमधल्या पेलूसियमच्या रोमन प्रदेशात प्लेगनं थैमान घातलं होतं.
रोमन साम्राज्यातील एक तृतीयांश जनता या प्लेगची शिकार ठरली. या प्लेगच्या थैमान साम्राज्य लयाला जायला सुरुवात झाली, असं मॅककॉर्मिक सांगतात.
पण नक्की कशाने हा विनाश ओढवला?
काळं पर्व
सहाव्या शतकाच्या मध्यंतराचा कालखंड हे मानवी इतिहासातलं सगळ्यात भयंकर ठरल्याने त्याला डार्क एज अर्थात काळं पर्व म्हटलं जातं. मात्र त्या गूढ ढगांचं कोडं अद्याप उलगडलेलं नाही.
हॉवर्ड विद्यापीठातील संशोधक इनोव्हेटिव्ह सायन्स ऑफ द ह्यूमन पास्ट या उपक्रमाअंतर्गत काम करत आहेत. त्यांनी स्विस हिमनगाचं चिकित्सक विश्लेषण केलं.
536मधील वसंत ऋतूतील बर्फात ज्वालामुखीच्या राखेतील काचेचे 2 सूक्ष्म तुकडे मिळाले आहेत. यातून आईसलँड किंवा उत्तर अमेरिकेत ज्वालामूखीचा उद्रेक होऊन पूर्ण उत्तर गोलारार्धात त्याची राख पसरली होती, असं दिसून येतं. ज्वालामुखीचं हे धुकं नंतर युरोप आणि आशियातही पसरलं. त्याबरोबरीनं थंडीची लाटही आली. त्यानंतर 540 आणि 547ला पुन्हा 2 ज्वालामुखी उद्रेक झाले.
ज्वालामुखीचं उद्रेक आणि त्यानंतर आलेल्या प्लेगमुळे युरोपमध्ये आर्थिक संकट आलं, ते पुढं 640पर्यंत सुरू राहिलं.
या कालखंडातील बर्फाचा अभ्यास केला, तर मध्ययुगात अर्थचक्र रुळावर आल्याचं दिसून येतं. या अर्थव्यवस्थेत चांदीचा समावेश झाल्याचं दिसतं.
रोमन इतिहासाच्या अभ्यासक कायली हार्पर म्हणतात, "नैसर्गिक संकटं आणि मानवी प्रदूषण याचे अवशेष बर्फात गोठलेले आहेत. ते त्या-त्या काळाबद्दल नवीन महिती देतात. रोमन साम्राज्य का आणि कसं लयास गेलं आणि मध्ययुगीन कालखंडातील अर्थव्यवस्थेला सुरुवातीची गती कशी मिळाली ही माहितीही यातून मिळेत."
पाश्चात्य इतिहासातील सर्वांत काळ्याकुट्ट कालखंडावर यातून प्रकाश पडतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)