हवामान बदल, तापमान वाढ ठरतेय गर्भपातांचंही कारण : बांगलादेशातील चित्र

बांगलादेशाच्या पूर्व किनारपट्टीलगतच्या छोट्या खेड्यांमध्ये संशोधकांच्या एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आली की, तिथं गर्भपातांचं प्रमाण वाढतं आहे. शास्त्रज्ञांनी याचा अधिक अभ्यास केल्यावर लक्षात आलं की याचं एक कारण हवामानात होणारे बदल हेही आहे.

पत्रकार सुसॅन सॅव्हेज यांनी या प्रकरणाच्या मूळाशी जायचं ठरवलं आणि किनारपट्टीवरच्या लोकांशी संवाद साधला. तीस वर्षांच्या अल मुन्नाहरनं सांगितलं की, "मुलग्यांपेक्षा मुलीच चांगल्या. मुलगे ऐकतच नाहीत. ते उद्दामपणं वागतात. मुली विनयशील असतात."

या खेडूत स्त्रीला तीन मुलगे आहेत पण तिला मुलीची आस लागली आहे. एकदा तिला वाटलंही की यावेळी मुलगीच होणार, पण तिचा गर्भपात झाला. त्याच्यासारखंच त्या खेड्यातल्या अनेकजणींनी आपलं बाळ गमावलं आहे.

गर्भपात होणं की सर्वसाधारण गोष्ट नाही. इतर ठिकाणांपेक्षा या भागात हा प्रकार वाढतो आहे हे अभ्यासकांच्या लक्षात येऊ लागलं. त्यामागचं एक कारण होतं हवामान बदल. फाईला पॅरा या मुन्नाहरच्या खेड्यात पोहचणं हीच मुळात एक मोठी कठीण गोष्ट होती. इथलं हवामान कोरडं असलं तरी निमुळती चालण्याजोगी वाट सोडून बाकी सगळा दलदलीचा भाग होता आणि ऐन पावसाळ्यात तर तो अधिकांश समुद्रातच असतो. सगळीकडं चिखलगाळ नि माती नजरेला पडते. काही जेमतेम उभारलेल्या झोपड्या आणि कोंबड्यांच्या शिटण्यामुळं अधूनमधून आणखीच निसरड्या झालेल्या भागावरून चालणं म्हणजे परीक्षाच असते.

अल मुन्नाहर सांगते की, "इथं आता काहीच पिकत नाही. साधारण १९९०पर्यंत इथं भाताची शेतं डोलत होती. तांदळाचं उत्पन्न अगदी खूप फायदेशीर ठरत नसलं तरी पोटापुरतं होत होतं. पाण्याची पातळी वाढून जमीन क्षारयुक्त होऊ लागली, त्यामुळं अनेक गावकऱ्यांना कोळंबी उत्पादन आणि मिठागरं या व्यवसायांकडं वळणं भाग पडलं. आता फार थोडकी भातशेती शिल्लक राहिली आहे."

इंटरनॅशनल सेंटर फॉर डायरिहल डिसिझ रिसर्च बांग्लादेश (ICDDRB) या संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. मंझूर हनिफी यांच्या मते, "हवामान बदलाचा एक जाणवण्याजोगा परिणाम आहे. जमिनीवर होणारा परिणाम दृश्य दिसतो पण मानवी शरीरावर होणारा परिणाम तुलनेनं चटकन दिसत नाही."

गेली तीस वर्षं ICDDRB संस्थेतर्फे चकारिया जिल्ह्यातल्या कॉक्स बझारजवळ अविरतपणे आरोग्य आणि लोकसंख्येची वेळोवेळी पाहणी केली जात आहे. त्यामुळं या ठिकाणी होणारा हा बदल त्यांच्या नजरेतून सुटला नाही आणि त्यांनी तो शोधून काढला.

गेल्या काही वर्षांत बरीच कुटुंबं या सखल भूप्रदेशातून डोंगराळ भागात राहायला गेली आहेत. त्यासाठी त्यांनी वनअधिकाऱ्यांना लाच दिलेली आहे.

काजोल रेखा ही या लोकांपैकीच एक. नवरा आणि दोन मुलांसह तीन वर्षांपूर्वी तिनं डोंगराळ भागात घर बांधलं. ती सांगते की, "त्यासाठी आम्ही २,३०,००० टका एवढी लाच दिली. सतत येणाऱ्या पुरामुळं आमच्या घरात कायमच ओल असायची. पाण्यामुळं मुलांना ताप यायाचा. आता इथं तुलनेनं गोष्टी सोप्या-सरळ आहेत."

हवामानामुळं स्थलांतरित झालेले हे लोकांच्या जीवनाला एक प्रकारची चांगली दिशाच जणू आता मिळाली आहे. त्यांना शेती करता येऊ शकते. वाहतुकीच्या सुविधांचा लाभ घेता येतो आणि नोकरी मिळते व मुलांना शाळेत शिकता येतं. आधीपेक्षा त्यांच्या तब्येती सध्या बऱ्या आहेत.

नेमकच सांगायचं तर इथं गर्भपाताचं प्रमाण कमी आहे. २०१२ ते २०१७ या काळात ICDDRB संस्थेतील अभ्यासकांनी किनारपट्टी आणि डोंगराळ भाग अशा दोन्ही ठिकाणच्या १२,८६७ गरोदर स्त्रियांची नोंद केली. त्यांनी गर्भारपणाच्या काळात त्या स्त्रियांबद्दलची निरीक्षणं नोंदवली. तेव्हा त्यांना आढळलं की, डोंगराळ भागात राहाणाऱ्या गरोदर स्त्रियांपेक्षा किनारपट्टीच्या सखल भूप्रदेशात राहाणाऱ्या (२०किमी परिसर) आणि समुद्रसपाटीपासून ७ मीटर दूर राहाणाऱ्या स्त्रियांचा १.३ वेळा गर्भपात झाला. "हा फरक दिसायला अल्प असला तरीही किनारपट्टीवरच्या स्त्रियांच्या गर्भपाताचं प्रमाण वाढू शकतं," असं डॉ. हनिफी सांगतात.

ICDDRB संस्थेतर्फे या उपक्रमाअंतर्गत चकारियाच्या मतलब या किनारपट्टीहून दूरच्या भागात पाहाणी करण्यात आल्यावरही अभ्यासकांना काही लक्षणीय फरक जाणवला. चकारियामध्ये ११ टक्के गर्भपात झाले होते तर मतलबमध्ये ८ टक्के. शास्त्रज्ञांच्या मते हा फरक स्त्रियांच्या पिण्याच्या पाण्यातल्या मिठाच्या जास्त प्रमाणामुळं होता. त्यालाही हवामानातला बदलच कारणीभूत आहे.

समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतेच आहे. एकीकडे बर्फाचं वितळणं सुरू आहे, दुसरीकडं पृथ्वीचं तापमान झपाट्यानं वाढतंच आहे. या साऱ्याचा परिणाम वातावरणावर, त्याच्या दाबावर होतो आहे. या कारणांपैकी कोणत्याही घटकात अल्पसादेखील बदल झाला तर त्याचे परिणाम समुद्राच्या पाण्याची पातळीवर लगेच दिसतात.

डॉ. हनिफी सांगतात की, "एक मिलिबार हवेचा दाब कमी होतो, तेव्हा समुद्राची पातळी १० मिलिमीटरनी वाढते. हवेचा दाब सतत कमी होत राहिला तर समुद्राच पाणी समथल परिसरात पसरण्याची शक्यता वाढते."

पाण्याची पातळी वाढली की ते खारं पाणी गोड्या पाण्याचा स्त्रोत ठरणाऱ्या नद्या आणि निर्झरांच्या पाण्यात शिरतं आणि अखेरीस ते मातीतही मिसळू लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते जमिनीच्या आतल्या सच्छिद्र स्तरावर असणाऱ्या पाण्याच्या साठ्यातही शिरतं. तिथं ते मिसळल्यावर तिथल्या गोड्या पाण्यालाही ते दूषित करतं. हेच पाणी गावकऱ्यांना ट्यूबवेलनं (बोअर मशीन) पुरवलं जातं.

फिला पॅरामधल्या पंपाद्वारे मिळणारं पाणी नीट निरखून पाहिलं ते लालसर रंगाचं दिसतं. त्यात मीठच असतं. पण गावकरी ते पितात, अंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी हेच पाणी वापरतात.

द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या शिफारशीनुसार लोकांनी दिवसभरात ५ ग्रॅमहून अधिक मीठ खाऊ नये. चकारियासारख्या किनारपट्टीच्या प्रदेशात लोकांच्या पोटात दरदिवशी जवळपास १६ ग्रॅम मीठ अधिक जातं. म्हणजे डोंगराळ भागात राहाणाऱ्यांपेक्षा हे प्रमाण तिप्पट आहे.

इंग्लंडसारख्या देशात राबवण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये गेली काही वर्षं मिठाच्या अतिरिक्त सेवनाचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत. अति मीठ खाल्यानं उच्च रक्तदाबाची भीती वाढते. स्ट्रोक आणि हृदयविकाराची शक्यता बळावते. गरोदर स्त्रियांच्या बाबतीत गर्भपात आणि प्रिक्लेमशिया (गर्भारपणात येणाऱ्या फिट्स) होऊ शकतो.

या बांगलादेशी कुटुंबांना आपण जे पाणी पितोय, त्यामुळं आपल्याला असे काही आजार होऊ शकतात याची सुतराम कल्पना नसते. आणि समजा ती कल्पना दिली गेली तरीही त्यांच्याकडं त्यासाठी फारसा काही पर्याय नि उपायही नसतो.

"मीठ पिकांसाठी हानिकारक आहे," असं पन्नास वर्षांची जनतारा सांगते. तिनं लहानपणापासून गावाच्या पलीकडचं जग पाहिलेलंच नाही. ती किंवा तिच्या कुटुंब फाईला पॅरा गाव सोडणार का, यावर ती हसते. ती म्हणते की, "नाही, अजिबात नाही. माझं उभं आयुष्य इथंच गेलंय आणि गाव सोडून आम्ही जाणार तरी कुठं? आम्ही गरीब आहोत." तिची शेजारीण २३वर्षांची शर्मिन सांगते, "इथलं आयुष्य मोठं कठीण आहे. तिला गाव सोडायला आवडेल."

तिच्या दोन मुलांच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची तिचा चिंता वाटते आहे. इथल्या हलाखीच्या आयुष्याबद्दल बोलतानाही तिला आणखी एक मूल व्हायला हवं असं वाटतं आहे.

आजच्या घडीला शर्मिन काय किंवा अल मुन्नाहर काय, त्यांच्यासारख्या स्त्रियांचे गर्भपात होणं हे एक थोडंसं वरवरचं कारण दिसतं आहे. पण याबद्दल काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत असं डॉ. हनिफी यांना वाटतं. "हवामान बदलाचे परिणाम जसजसे तीव्र होतील, तशा या गोष्टी बिकट होतील," असं ते म्हणतात.

किनारपट्टी लगतची जमीन, सततचे पूर आणि सखल भाग यामुळं बांगलादेशात जागतिक हवामान बदलाचे परिणाम दिसून येऊ लागतात. पण इतर देशांमध्येही अशा प्रकारे समुद्राच्या पाण्याच्या पातळीवर परिणाम होत आहेत. हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर २००५ मध्ये विध्वंसक अशी त्सुनामीची लाट आदळली होती. त्यावेळी किनाऱ्यावरील जमिनीवर पसरलेल्या खाऱ्या पाण्यामुळे गोड्या पाण्याचे स्रोत दूषित झाले होते. अमेरिकेतल्या फ्लोरिडातही समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून तिथंही खाऱ्या पाण्याचे स्त्रोत खारट पाण्यामुळं दूषित झालेले दिसतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे चकारियाच्या आरोग्य आणि लोकसंख्येचा अभ्यास व निरीक्षणं लक्षात घेतली तर तिथल्या लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नांत हवामान बदल हाही एक घटक प्रामुख्यानं दिसतो. डॉ. हनिफी सांगतात की, "हवामान बदल यावर चर्चा करण्यासाठी बक्कळ पैसा खर्च केला जातो. पण त्यातील फार कमी पैसा संशोधनासाठी खर्च होतो. त्यातही लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर संशोधन कमी होतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)