You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानातील ईश्वरनिंदा : आसियांच्या पतीची मदतीसाठी इतर देशांकडे याचना
पाकिस्तानातील ईशनिंदेच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोषमुक्त होऊन सुटका झालेल्या ख्रिश्चन नागरिक आसिया बिबी यांच्या अडचणीत भर पडली आहे. आसिया बिबी यांचे पती यांनी आमच्या दोघांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. जीव वाचवण्यासाठी त्यांनी अमेरिका, कॅनडा तसंच इंग्लंडकडे मदतीची याचना केली आहे.
एका व्हीडिओद्वारे आसिया यांचे पती आशिक मसीह यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. ते म्हणतात, ''इंग्लंडच्या पंतप्रधानांनी आम्हाला मदत करावी अशी त्यांना विनंती करतो''. अशाच स्वरूपाची विनंती त्यांनी अमेरिका आणि कॅनडाकडे केली आहे.
जर्मन प्रसारक डॉयचे वेलेला दिलेल्या मुलाखतीत आम्ही खूप घाबरलेल्या स्थितीत आहोत, असं मसीह यांनी म्हटलं होतं.
आसिया बिबी यांच्याविरुद्ध गेली आठ वर्ष ईशनिंदेचा खटला सुरू होता. मोहम्मद पैगंबरांचा कथित अपमान केल्याप्रकरणी ख्रिश्चनधर्मीय आसिया यांना 2009मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या त्या पाकिस्तानातल्या पहिल्याच ख्रिश्चनधर्मीय महिला होत्या. या निकालाविरुद्ध त्यांनी पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर या निर्णयाविरोधात पाकिस्तानमधील कट्टरपंथी रस्त्यावर उतरले होते.
त्यांना रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने कट्टरवादी आंदोलकांशी वाटाघाटी केल्या. सरकारने आसिया यांना देश सोडून जायला मज्जाव केला, तसेच या प्रकरणात अपील दाखल करण्याची परवानगी कट्टरवाद्यांना दिली. त्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं.
"अशा स्वरूपाचा अलिखित करार चुकीचा आहे. हे म्हणजे न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्यासारखं आहे," अशा शब्दांत मसीह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
"सध्याचा काळ आमच्यासाठी अत्यंत धोकादायक असा आहे. आम्हाला कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही. आम्ही लपूनछपून राहत आहोत. माझी पत्नी आसियाने याआधीच दहा वर्ष तुरुंगात काढली आहेत. आईला बघण्यासाठी मुली आतूर झाल्या आहेत," असं मसीह म्हणतात.
आसिया यांना सुरक्षाव्यवस्था पुरवल्याचा सरकारचा दावा
दरम्यान आसिया बिबी यांना सुरक्षित जगता यावं यासाठी त्यांची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आल्याचं पाकिस्तानचे माहिती खात्याचे मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितलं.
"त्या पाकिस्तानात आहेत आणि सरकारी यंत्रणा त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. त्यांच्या जीवाला धोका नाही," असं चौधरी यांनी स्पष्ट केलं.
"आंदोलनकर्त्यांशी करार करण्याच्या भूमिकेचंही त्यांनी समर्थन केलं. करारामुळेच हिंसक वातावरण निवळलं. हिंसा होऊ न देता परिस्थिती सुधारण्याचं आव्हान आमच्यासमोर होतं. आमचं सरकार स्थापन होऊन जेमतेम दोन महिने झाले आहेत. आधीच्या सरकारांनी याप्रकरणी समाधानकारक तोडगा काढलेला नाही. आसिया बिबी यांच्या जीवाला तेव्हा धोका होता. मात्र त्याकडे लक्ष देण्यात आलं नाही. आमच्यासमोर हा एकच पर्याय उपलब्ध होता, तोच आम्ही स्वीकारला," असं ते म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
लाहोरजवळच्या शेखूरपुरामध्ये आसिया आणि इतर महिलांमध्ये एक बादली पाण्यावरून भांडण झालं. ही घटना 2009 सालची आहे.
आसियांनी त्या पाण्याला स्पर्श केल्यामुळे इतरांचा धर्म भ्रष्ट झाला असा आरोप या महिलांनी केला. आसिया ख्रिश्चन तर इतर महिला मुस्लीम आहेत.
या महिलांनी पुढे आग्रह धरला की आसियांनी इस्लाम धर्म स्वीकारावा. त्यानंतर आसियांनी प्रेषित मोहम्मदांबद्दल तीन अपमानास्पद शब्द काढले, असा महिलांचा आरोप आहे.
या महिलांनी आसियांना चोप दिल्यानंतर आसियांनी ईशनिंदेची कबुली दिली, असा महिलांचा दावा आहे. पोलीस तपासानंतर आसियांना अटक करण्यात आली.
मी रागावून शेजाऱ्यांशी बोलले, पण ईशनिंदा केली नाही आणि कबुलीही दिली नाही, असा आसियांचा दावा आहे.
या केसवर एवढ्या संमिश्र प्रतिक्रिया का?
इस्लाम हा पाकिस्तानचा राष्ट्रीय धर्म आहे आणि इस्लाम पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेचा गाभा आहे. त्यामुळे ईशनिंदेला कठोर शिक्षेची तरतूद आहे आणि या तरतुदीला लोकांचा पाठिंबा आहे.
मतं मिळवण्यासाठी कट्टरवादी नेते कठोर कारवाईचं नेहमी समर्थन करत आले आहेत. तर वैयक्तिक प्रकरणांत सूड घेण्यासाठी या कायद्याचा वापर होण्याची उदाहरणं आहेत, असं टीकाकारांचं मत आहे.
या कायद्यात सुरुवातीला मुस्लीम आणि अहमदिया पंथातील लोकांना शिक्षा झाली. पण 1990नंतर अनेक ख्रिश्चनधर्मीय लोकांना या कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या 1.6 टक्के आहे.
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानतल्या ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य केलं जात आहे.
1990पासून ईश्वरनिंदेच्या आरोपावरून जवळजवळ 65 लोकांची हत्या झाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)