खादिम हुसैन रिझवी ठरत आहेत पाकिस्तान सरकारची नवी डोकेदुखी

    • Author, हारून रशीद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, इस्लामाबाद (पाकिस्तान)

आसिया बीबीला निर्दोष मुक्त करण्यात आल्यामुळे नाराज असलेल्या 'तहरीके लब्बैक या रसूल अल्लाह' या धार्मिक संघटनेनं शुक्रवारपासून रस्ता रोको आंदोलन तीव्र केलं आहे. ही संघटना आणि आयएसआय यांच्यातली चर्चा फिस्कटली आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतांत बऱ्यापैकी जम असलेल्या 'तहरीके लब्बैक या रसूल अल्लाह' या संघटनेनं कोर्टाच्या निकालाविरोधात आंदोलन पुकारलं आहे.

शुक्रवारी लाहोर आणि इस्लामाबाद शहरातल्या वाहतुकीचा आढावा घेतला असता या दोन्ही शहरांतले सर्व प्रमुख रस्ते बंद असल्याचं सांगण्यात आलं.

तहरीके लब्बैक या संघटनेचं म्हणणं आहे की जोवर पाकिस्तानचं सुप्रीम कोर्ट आसिया बीबी प्रकरणात निकाल बदलत नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहील.

आसिया बिबी नावाच्या ख्रिश्चन महिलेला पाकिस्तानी सुप्रीम कोर्टानं ईशनिंदा प्रकरणी निर्दोष मुक्त केलं आहे. शेजाऱ्यांशी भांडतांना प्रेषित मोहम्मदांचा अपमान केल्याचा त्यांचावर आरोप होता.

2010 साली त्यांना हायकोर्टानं दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांनी त्याविरोधात अपील केलं होतं. त्यांना आठ वर्षं तुरुंगात आणि एकांतवासात काढावी लागली. मी निर्दोष आहे, असं त्या सुरुवातीपासून म्हणत होत्या.

कोर्टाच्या या निकालाच्या विरोधात बंदचं आवाहन करताना तहरीके लब्बैक संघटनेचे खादिम हुसैन रिझवी यांनी म्हटलं की, "आसिया यांनी तिच्या गुन्ह्यांची जाहीर कबुली दिलेली आहे. पण नऊ वर्षांनी कोर्टानं तिला निर्दोष सोडलं. याचा अर्थ न्यायव्यवस्थेत काही तरी गडबड आहे. त्यामुळे या निकालावर प्रश्न तर उठणारच."

तेव्हापासून तहरीके लब्बैकनं पाकिस्तानच्या मोठ्या शहरात रस्तारोको आणि निदर्शनं सुरू केली. ते आंदोलन अजूनही सुरूच आहे.

कोण आहेत हे खादिम हुसैन रिझवी?

'तहरीके लब्बैक या रसूल अल्लाह' या संघटनेचे संस्थापक खादिम हुसैन रिझवी याच्याविषयी काही वर्षांपूर्वीपर्यंत कोणालाच काही माहिती नव्हतं.

खादिम हुसैन रिझवी यांना अर्थपुरवठा कसा होतो, यावरून पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं याच वर्षी मार्च महिन्यात आयएसआय या गुप्तचर संस्थेची कानउघडणी केली होती. "त्यांच्या व्यवसाय काय, त्यांना देणगी कोण देतं, या सगळ्याबद्दलची माहिती कोणाकडेच का नाही," असा सवाल कोर्टानं केला होता.

2017मध्ये लाहोरच्या पीर मक्की मशीदीतले धर्मोपदेशक असलेल्या 52 वर्षीय खादिम हुसैन रिझवी यांना ईशनिंदा कायद्यातल्या सुधारणेच्या विरोधात केलेल्या कायदेशीर लढाईमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

त्याआधी 4 जानेवारी 2011 रोजी हत्या करण्यात आलेले पंजाब प्रांताचे राज्यपाल सलमान तासीर यांचा मारेकरी मुमताज कादीरला फाशीची शिक्षा झाली. या सगळ्या प्रकरणात रिझवी सक्रिय होते.

सलमान तासीर यांची हत्या योग्यच असल्याचं रिझवी यांचं म्हणणं होतं. कारण सलमान यांनी ईशनिंदा कायदा हा काळा कायदा असल्याचं म्हटलं होतं.

रिझवीच्या या विधानानंतर पाकिस्तानच्या वक्फ बोर्डानं त्याला नोकरीतून काढून टाकलं.

या सगळ्या प्रकरणास त्याने धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. तरीही सर्वसाधारणपणे रिझवीची प्रतिमा एक सर्वसामान्य राजकीय नेता अशीच होती.

बरेवली राजकारणाचा नवा चेहरा

2012नंतर पाकिस्तानात मुसलमानांमधले वेगवेगळे पंथ, खासकरून देवबंदी आणि बरेलवी मुसलमान यांच्यातला संघर्ष वाढला आहे.

व्हीलचेअरवर असलेले खादिम रिझवी स्वत:ला बरेवली विचारवंत मानतात. पाकिस्तानात त्यांच्याकडे बरेवली राजकारणातला नवीन चेहरा म्हणून पाहिलं जातं.

लष्कराचा पाठिंबा?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांच्या कार्यकाळात फैजाबादमध्ये झालेल्या त्यांच्या आंदोलनास यश मिळालं होतं. त्यावेळी रिझवी यांच्या आंदोलनास पाकच्या लष्कराचं समर्थन होतं, असं मानलं जातं.

अर्थात, लष्करानं नेहमीच त्याचा इन्कार केला आहे.

लोकांना रस्त्यावर उतरण्याची ताकद

रिझवी स्वत:बद्दल सार्वजनिकरित्या बोलत नाहीत. त्यानं लाहोरच्या मदरशात शिक्षण घेतलं आणि त्यांच्यावर अनेक खटले सुरू आहेत.

त्यांच्या संघटनेचे प्रवक्ते ऐजाज अशरफी यांच्या मते," खादीम हुसैन रिझवी यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत याची काही माहिती नाही. पण त्यांनी संघटनेची स्थापना केल्यापासून त्यांना अटकही करण्यात आलेली नाही. त्याचं एक कारण ही रस्त्यावरची ताकद असल्याचं मानलं जातं."

जानेवारी 2017मध्ये लाहोरमधल्या एका आंदोलनानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

अर्थसहाय्य कोणाकडून?

खादिम हुसैन रिझवी यांना संघटना चालवण्यासाठी पाकिस्तानमधून आणि बाहेरूनही अर्थसहाय्य मिळतं, असं मानलं जातं.

इस्लामाबादमधल्या एका आंदोलनात तर त्यांनी घोषणाच केली की अनेक अज्ञात लोकांकडून संघटनेला लाखो रुपयांची देणगी मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिझवी सरकारविरोधी भाषणं करत आहेत. त्यानंतरही त्याच्यावर कारवाई झालेली नाही. तशी ती झाली नाही तर रिझवी आणखी निडर आणि अनियंत्रित होण्याची भीती आहे.

यातून पाकिस्तान सरकार कसा मार्ग काढणार, ही एक मोठी समस्या आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)