इंडोनेशिया भूकंप : ढिगाऱ्यांखाली अनेक अडकले; मदत कार्य युद्धपातळीवर

इंडोनेशियामध्ये भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीमध्ये 832वर लोकांचा बळी गेला असून 500पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मृतांच्या दफनविधीसाठी सामूहिक कबरी बनवाव्या लागणार आहेत. भूकंपा आणि त्सुनामीमध्ये ढासळेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अनेक लोक अडकून पडलेले आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे.

राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो यांनी भूकंप झालेल्या भागांना भेट देऊन रात्रंदिवस मदत कार्य सुरू राहील, अशी हमी दिली आहे.

शुक्रवारी आलेला भूकंप आणि त्यानंतरच्या त्सुनामीत इंडोनेशियातील सुलावेसी बेटावरील जनजीवन कोलमडून गेले आहे. या भूकंपाची तीव्रता 7.5 रिश्टर स्केलच्या इतकी होती. या भूकंपात हॉस्पिटल्सची मोठं नुकसान झालं असून जखमींवर तंबूत उपचार सुरू आहेत. तर रस्त्यांवर मृतदेह पडून आहेत.

शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर या बेटाला लहानसहान भूंकपाचे धक्के बसत आहेत. जवळपास 16 लाख नागरिकांना या भूकंपाचा फटका बसला असल्याचं रेडक्रॉस या संस्थेनं म्हटलं आहे. डोगांला या गावाबद्दल विशेष काळजी व्यक्त केली जात आहे. या गावात नेमकं काय घडलं आहे, तिथं काय परिस्थिती आहे, याचा अंदाज आलेला नाही.

Indonesia's National Agency of Search and Rescueचे प्रमुख मोहंमद स्यौगी म्हणाले, "इथं अनेक मृतदेह दिसत आहेत. पण नेमकं किती लोकांचे बळी गेले हे सांगता येत नाही."

सुलावेसी बेटाच्या पालू किनाऱ्यावर साधारण 3 मीटर उंचीपर्यंतच्या लाटा उसळल्या. त्सुनामीचा इशारा मागे घेण्यात आल्यानंतर त्सुनामी आल्यानं लोकांची तारांबळ उडाली.

सोशल मीडियावरील फोटो आणि व्हीडिओत लोक घाबरलेले आणि आश्रय शोधताना दिसत आहेत. हे मृत्यू त्सुनामीमुळे झाले की भूकंपात हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

गेल्या महिन्यात इथल्या लँबॉक बेटावर भूकंपाचे सलग धक्के बसले होते. ज्यामध्ये शेकडो लोकांचे प्राण गेले. 5 ऑगस्टला आलेल्या सर्वांत मोठ्या भूकंपात 460 जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकन भूगर्भ विभागानं दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू सुलावेसी बेटापासून समुद्रात 10 किमी अंतरावर होता. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा भूकंप आला. त्यानंतर लगेचच त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. पण तासाभरात तो मागे घेण्यात आला.

पालूची लोकसंख्या 3 लाख आहे. इथं मदत कार्य सुरू करण्यात आलं असलं तरी दळणवळण व्यवस्था खंडित झाली आहे. भूकंपामुळे धावपट्टीला तडे गेल्याने विमान उतरवणं ही अशक्य झालं आहे.

यापूर्वी 2004ला आलेल्या त्सुनामीत इंडोनेशिया आणि सुमात्रामध्ये 2.26 लाख लोकांचा बळी गेला होता.

शुक्रवारच्या भूकंपात सार्वजनिक मालमत्ता आणि घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. पडलेल्या इमारतींखाली अनेक लोक गाडले गेले असण्याची भीती व्यक्त होत आहे. पालूला जकार्तातून मदत पोहोचवली जात आहे. त्यासाठी लष्करी विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करण्यात येत आहे. रस्ते आणि दळणवळण साधनांचं नुकसान, खंडित वीजपुरवठा यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

जेव्हा भूकंपाचा झटका बसला तेव्हा आम्ही घाबरलो आणि घरातून बाहेर आलो, अन्सर बाचमिड सांगतात. लोकांना अन्न, पाणी यांची नितांत गरज आहे. आम्ही रात्र उघड्यावरच काढली, असं ते सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)