विजय माल्या यांचा नवा दावा, 'भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री जेटलींना भेटलो'

मद्य व्यावसायिक आणि भारतीय बँकाचे जवळपास 9 हजार कोटींच देणं असलेले विजय माल्या यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की 2016मध्ये भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती. याच अर्थमंत्री जेटली यांनी इन्कार केला आहे तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

माल्या यांच्या प्रत्यार्पणासंदर्भात लंडनमधील एका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. भारतीय तपास संस्थांनी माल्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.

वेस्टमिंस्टर कोर्ट परिसरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "मी भारतातून जिनिव्हाला एका पूर्वी नियोजित भेटीसाठी गेलो होतो. जाण्यापूर्वी मी अर्थमंत्र्यांची भेट घेतली होती."

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माल्या यांचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी फॅकच्युअल सिच्युएशन नावाची एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, "माल्या यांनी केलेल्या दाव्यात काहीही तथ्य नाही."

माल्या म्हणाले, "ही पूर्वनियोजित बैठक होती. मी भारतातील बँकांना कर्जांच्या सेटलमेंटची ऑफर दिली आहे. हेच काय ते सत्य आहे."

भारताच्या अर्थमंत्र्यांना तुम्ही कुठं भेटला असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर ते म्हणाले, "मी तुम्हाला हे का सांगावं. हा प्रश्न विचारून तुम्ही मला त्रास देऊ नका."

जेटली म्हणतात, "माल्या यांचं वक्तव्य म्हणजे वस्तुस्थिती नाही. 2014नंतर मी त्यांना भेटण्यासाठी कधीही वेळ दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी मला भेटण्याचा विषयच नाही. ते राज्यसभेचे सदस्य असल्याने काही वेळा सदनात येतं होते. या संधीचा गैरफायदा घेत मी माझ्या कार्यालयात जात असताना त्यांनी मला भेटण्याचा प्रयत्न केला होता. मी कर्जाच्या रकमेच्या सेटलमेंटसाठी तयारी केली आहे, असं ते पुटपुटले. पण मी त्यांना सांगितलं की माझ्याशी बोलून काहीही उपयोग नाही. तुम्हाला बँकांशी बोलावं लागेल. मी त्यांच्या हातातील कागद घेण्यास स्पष्ट नकार दिला."

यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, असं ही ते म्हणाले आहेत.

प्रत्यार्पणाचा निर्णय 10 डिसेंबरला

वेस्टमिनिस्टर्स मजिस्ट्रेट कोर्टात माल्या यांच्या प्रत्यार्पणाबद्दल सुरू असलेली सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर 10 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

मल्या यांच्या या दाव्यावर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अरुण जेटली यांनी आतापर्यंत ही माहिती का लपवली असा सवाल, केजरीवाल यांनी केला आहे.

तर सुरजेवाल यांनी पळूण जाणाऱ्यांना साथ, पळून जाणाऱ्यांचा विकास हे भाजपचं लक्ष्य आहे, अशी टीका केली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)