अमेरिकेच्या दिशेने येतंय ‘अतिशय धोकादायक’ चक्रीवादळ, दोन राज्यांत आणीबाणी लागू

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही दशकातलं कदाचित सगळ्यांत मोठं चक्रीवादळ फ्लोरेन्स अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला थडकणार आहे. या वादळाच्या भीतीनं पूर्व किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
साऊथ कॅरोलिना राज्याच्या गर्व्हनरनं राज्याच्या किनारपट्टीवर राहाणाऱ्या सगळ्यांच लोकांना आपआपल्या घरातून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले आहेत तर नॉर्थ कॅरोलिना आणि व्हर्जिनिया राज्यांनी आणीबाणी घोषित केली आहे.
अधिकाऱ्यांच्या मते फ्लोरेन्स वर्ग 4 (धोक्याची पातळी) प्रकारचं चक्रीवादळ असून त्याचे वारे ताशी 195 किलोमीटरच्या वेगानं वाहात आहेत. जसा जसा वेळ जातोय तसं तसं हे वादळ अधिक शक्तीशाली होत चाललं आहे.
दोन्ही कॅरोलिना राज्यांना गुरूवारपर्यंत हे वादळ थडकेल असा अंदाज आहे.
हे चक्रीवादळ वर्ग 2 प्रकाराचं वादळ म्हणून सुरू झालं होतं. सोमवारी सकाळी फ्लोरेन्स चक्रीवादळ नॉर्थ कॅरोलिनाच्या आग्नेय दिशेला 2000 किलोमीटर अंतरावर होतं.
अटलांटिक समुद्रातल्या उबदार प्रवाहांमुळे हे वादळ आणखी शक्तीशाली होऊन वर्ग 5 पातळीवर पोहचू शकेल असंही हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
1989 साली नॉर्थ कॅरोलिना राज्यात आलेल्या ह्युगो चक्रीवादळानं 50 हजार अब्जाहून अधिक रूपयांचं नुकसान केलं होतं. या वादळात 49 लोकांचा मृत्यूही झाला होता. त्यानंतर या किनारपट्टीला थडकणारं फ्लोरेन्स हे पहिलं वर्ग 4 पातळीचं चक्रीवादळ आहे.
The National Hurricane Center (NHC) नुसार फ्लोरेन्स 'अतिशय धोकादायक' बनू शकतं. यामुळे येणाऱ्या पावसाचे आणि पूराचे परिणाम विध्वंसक असू शकतात, असंही NHC ने स्पष्ट केलं.
अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेचे हवामान तज्ज्ञ डॅन मिलर यांनी वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की, "हे वादळ ज्याप्रकारे मार्गक्रमणा करत आहे, त्यानुसार याचा त्रास कोणाला ना कोणाला नक्की होणार."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या वादळाच्या पार्श्वभूमीवर मिसीसिपीमध्ये शुक्रवारी होणारी आपली सभा रद्द केली आहे.
आणीबाणी घोषित
नॉर्थ कॅरोलिनाच्या गर्व्हनरने मंगळवारी दुपारी लाखो लोकांना किनारपट्टीवरून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले.

फोटो स्रोत, Photo by NOAA via Getty Images
तिथल्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या किनारपट्टी लगत असणाऱ्या बेटांच्या रहिवाशांनाही आपली घरं सोडून जाण्यास सांगितलं. नॉर्थ कॅरोलिनाच्या गर्व्हनरच्या मते त्यांचं राज्य फ्लोरेन्स चक्रीवादळाच्या 'अगदी निशाण्यावर' आहे.
या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागातल्या दुकांनामध्ये आणि सुपरमार्केटसमध्ये लांबच लांब रांगा होत्या. लोकांनी प्यायचं पाणी, बॅटरीज आणि लाकडाचा साठा करण्यासाठी जवळच्या दुकानांमध्ये गर्दी केली होती.
"लोक अक्षरशः लहान मुलांच्या बाबागाड्यांमध्ये भरून प्यायच्या पाण्याच्या बाटल्या नेत आहेत," मार्टल बीच वरच्या वॉलमार्टमधले मॅनेजर रायन डीक यांनी द सन न्यूजला सांगितलं.
साऊन कॅरोलिनाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं म्हटलं की, "मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं ही शक्यता गृहित धरूनच तयारी करत आहेत."
"असं समजा की फ्लोरेन्स चक्रीवादळाचा तडाखा आपल्याला बसणारच आहे. इतकंच नाही तर त्याचा प्रभाव किनारपट्टीपासून आत असणाऱ्या भागालाही बसणार आहे. त्यानुसार तयारी करा," साऊथ कॅरोलिनाचे गर्व्हनर हेन्सी मॅकमास्टर यांनी सांगितलं.

नॉर्थ कॅरोलिनाचे गर्व्हनर रॉय कुपर यांनी शेतमालाची वाहतूक करण्यावरचे निर्बंध हटवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. "एकदा पिकं हातात आली की वेळ फार महत्त्वाचा असतो. आज जर योग्य ती हालचाल केली तर पुढे होणारं नुकसान टळू शकतं."
अटलांटिक महासागराच्या पोटात आणखी दोन चक्रीवादळं - आयझॅक आणि हेलन - तयार होतं आहेत. पण सध्यातरी त्यांच्यापासून अमेरिकेला धोका नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








