कोस्टारिका आणि निकारगुवाला वादळाचा फटका

फोटो स्रोत, Reuters
उत्तर अमेरिकेकडे सरकत असलेल्या उष्णकटिबंधीय वादळानं वाटेत कोस्टा रिका आणि निकारगुवा या दोन देशांनाही तडाखा दिला आहे. त्यात आतापर्यंत 20 जण ठार झाले आहेत.
दोन्ही देशांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असून 20 पेक्षा अधिकजण बेपत्ता आहेत.
या वादळामुळे तुफान पाऊस सुरू झाला. त्यातच दरड कोसळल्याने तसंच पूर आल्याने रस्ते बंद आहेत. काही ठिकाणी पूल कोसळले आहेत, घरांचंही मोठं नुकसान झालं आहे.

फोटो स्रोत, Reuters
कोस्टा रिकामध्ये सुमारे चार लाख लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध नाही, तर हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण आयोगानं दिली.
वादळामुळे कोस्टा रिकामध्ये सहा जणांनी प्राण गमावले आहेत, तर उत्तरेला सरकलेल्या वादळानं निकारगुवामध्ये किमान 11 जण ठार झाले आहेत.

फोटो स्रोत, AFP
गुरूवारी कोस्टारिकात सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आणि किमान डझनभर विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली.
सुरक्षेचा उपाय म्हणून राष्ट्रीय उद्यानं पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.
रविवारपर्यंत नैट वादळाची तीव्रता वाढत जाऊन ते अमेरिकेच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकेल, असा इशारा हवामानखात्यानं दिला आहे.
मेक्सिकोच्या आखातात असलेल्या तेल कंपन्यांनी कर्मचारी हलवण्यास सुरुवात केली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








