You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रंप यांनी दिला WTOमधून बाहेर पडण्याचा इशारा
जर जागतिक व्यापार परिषदेनं (WTO) आम्हाला नीट वागवलं नाही तर आम्ही WTOमधून बाहेर पडू असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.
"जर WTOनं त्यांच्या वागणुकीत सुधारणा केली नाही तर आम्ही WTOमधून बाहेर पडू," असं डोनाल्ड ट्रंप यांनी ब्लूमबर्ग न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
अमेरिकेच्या हक्कांचं संरक्षण होईल अशी धोरणं ट्रंप यांना हवी आहेत. पण अमेरिका WTOला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप ट्रंप यांनी केला आहे.
WTOचं धोरण खुल्या व्यापारास प्रोत्साहन देण्याचं आहे. पण ट्रंप यांचं धोरण 'अमेरिका फर्स्ट' (अमेरिकेला प्राधान्य) असं आहे. त्यामुळे व्हाइटहाउस आणि WTOमध्ये संघर्ष होत आहे.
अमेरिकेत WTO संदर्भातल्या न्यायालयीन प्रकरणांवर सुनावणी घेण्यासाठी न्यायाधीशांची नियुक्ती होणं आवश्यक आहे. पण अमेरिकेतलं सरकार त्यांच्या नियुक्तीच्या मार्गात अडथळे आणत आहे, असं म्हटलं जातं. त्यामुळे WTO संदर्भातली प्रकरणं निकाली लागायला उशीर होत आहे.
WTO अमेरिकेच्या धोरण प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत आहे, असा आरोप अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटहायजर यांनी केला आहे.
ट्रंप आणि WTO मध्ये का जुंपली आहे?
"WTOच्या धोरणामुळं सर्वांचा फायदा होतो आहे केवळ आमचं नुकसान होत आहे. तुम्हीच बघा ना, आम्ही WTOमध्ये एकही केस जिंकलेलो नाही. प्रत्येक केसमध्ये आमची हार झाली आहे." असं ट्रंप म्हणतात.
अमेरिकेनं 'जशास तसं' उत्तर देण्याचं धोरण अवलंबल्याचं अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे.
यापैकी सर्वांत महत्त्वाची लढाई चीनविरोधात सुरू आहे. जगातल्या दोन आर्थिक महासत्तांमध्ये वर्चस्वासाठी ही लढाई लढली जात आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर ट्रंप यांनी कर लादला.
चीनमधून येणाऱ्या 200 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवर कर लादण्याचा अमेरिकेचा निर्णय विचाराधीन असल्याची बातमी 'ब्लूमबर्ग'नं दिली होती. त्याबद्दल ट्रंप यांना विचारले असता ते म्हणाले, ही बातमी पूर्णतः चुकीची आहे असं मी म्हणणार नाही.
चीननं देखील त्यास प्रत्युत्तर दिलं आहे. तितक्याच मूल्यांच्या अमेरिकन वस्तूंवर कर लादण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच चीननं अमेरिकेविरोधात WTOमध्ये खटला दाखल केला आहे.
"अमेरिका नियमांचं उल्लंघन करत असल्याची शंका आहे," असं वक्तव्य चीनच्या वाणिज्य मंत्र्यांनी केलं आहे.
अमेरिकेनं पहिल्या टप्प्यात चीनवर कर लादल्यानंतर चीननं WTOमध्ये धाव घेतली होती.
जागतिक व्यापाराचे नियम कसे असावेत हे ठरवण्यासाठी 1994मध्ये WTOची स्थापना करण्यात आली होती.
जर कोणी व्यापारी नियमांचं उल्लंघन केलं तर त्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी आणि उदारीकरणानंतर वाटाघाटी करण्यासाठी WTOची स्थापना करण्यात आली होती.
हेही करार चर्चेत
अमेरिका आणि मेक्सिकोनं नव्यानं व्यापारी करार करण्यासाठी पावलं उचलली आहेत. उत्तर अमेरिका मुक्त व्यापारी करारावर (NAFTA) पुनर्विचार करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.
नव्या करारामध्ये जर कॅनडा सहभागी झाला नाही तर वाहन क्षेत्रावर कर लादण्यात येतील, असं ट्रंप यांनी कॅनडाला धमकावलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)