काय सांगता! शेळ्यांनाही आवडतात हसरेच चेहरे

आपल्या चेहऱ्यावरून आपल्या मनात काय सुरू आहे हे चटकन ओळखता येतं. एवढंच नव्हे तर, प्राण्यांना विशेषत: शेळ्यांना माणसांचे आनंदी चेहरे आवडतात, असं आता एका संशोधनात समोर आलं आहे.

शेळ्या किंवा बोकडच नव्हे तर पूर्वी वाटत होतं त्याहीपेक्षा कितीतरी जास्त प्राणी माणसांचा मूड ओळखू शकतात, असा निष्कर्ष या संशोधनातून पुढे आला आहे.

हे संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी काही शेळ्यांना एकाच माणसाचे दोन फोटो दाखवले. एकात तो चिडलेला दिसत होता तर दुसऱ्यामध्ये आनंदी.

'त्यात शेळ्यांचा ओढा आनंदी चेहऱ्यांकडे होता,' असं या संशोधकांच्या टीमने रॉयल सोसायटी ओपन सायन्सच्या नियतकालिकातल्या लेखात म्हटलं आहे.

या अभ्यासात असंही दिसलं की, माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याची क्षमता माणसाचे सोबती मानले गेलेले कुत्रे आणि घोडे याच प्राण्यांपुरती मर्यादित नाही.

तर, दूध आणि मांसासाठी पाळल्या जाणाऱ्या शेळ्या मेंढ्यांसारख्या प्राण्यांनाही माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचता येतात.

हे संशोधन यूकेतली बटरकप या शेळ्यांच्या अभयारण्याच्या वतीने करण्यात आलं होतं.

या संशोधनाचे सह-लेखक डॉ. अॅलन मॅकॅलीगॉट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चिडका चेहरा आणि आनंदी चेहरा यांचे फोटो भिंतीवर एकमेकांपासून 1.3 मीटर अंतरावर लावून ठेवले होते.

आणि मग त्या दिशेने शेळी आणि बोकडांना सोडून दिलं.

हसरे चेहरे हवे

शेळ्यांनी हसऱ्या चेहऱ्यांच्या दिशेनं धाव घेतली, असं अभ्यासकांना दिसलं. सगळे प्राणी चिडक्या फोटोंकडे जाण्याआधी हसऱ्या चेहऱ्यांकडे जात होते. हसऱ्या चेहऱ्यांना हुंगत त्यांनी जास्त वेळ घालवला.

सगळ्यांत परिणामकारक निष्कर्ष तेव्हा लक्षात आला जेव्हा हसऱ्या चेहऱ्यांचे फोटो भिंतीच्या उजव्या बाजूला ठेवले होते. डाव्या बाजूला हे फोटो ठेवले तेव्हा शेळ्यांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही.

अभ्यासकांच्या मते, या शेळ्या फोटोंमध्ये दिसणारी माहिती मेंदूच्या एका बाजूनं प्रोसेस करत होत्या. इतर प्राणीही असं करतात हे अभ्यासकांनी पाहिलं होतं.

असं व्हायचं कारण म्हणजे एकतर शेळ्यांच्या मेंदूचा डावा भाग सकारात्मक भावनांना प्रोसेस करतो किंवा मेंदूचा उजवा भाग रागीट चेहरे टाळतो.

आता यूकेच्या रोहॅम्पटन विद्यापीठात काम करणारे डॉ. मॅकॅलीगॉट यांच्या मते, "आपण पाळीव जनावरांशी कसं वागावं यादृष्टीने हा अभ्यास महत्त्वाचा आहे. कारण माणसांच्या भावना वाचायची क्षमता अनेक प्राण्यांमध्ये आहे."

दुसऱ्या सहलेखक आणि ब्राझीलच्या साओ पाओलो विद्यापीठाच्या नतालिया अॅलब्यूक्वेरक्व म्हणाल्या, "कुत्रे आणि घोडे यांच्या मानवी भावभावनांच्या समजेबाबत अनेक अभ्यास झाले आहेत. त्यांच्यात माणसांच्या भावना समजण्याची शक्ती असते."

"पण शेळीसारख्या प्राण्यांनाही माणसांच्या चेहऱ्यावरच्या भावना वाचता येतात, याचा आजवर कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता. आता सगळ्यांच पाळीव प्राण्यांचं भावनिक जीवन आपल्याला समजून घेता येईल."

या अभ्यासामुळे प्राण्यांचं भावनिक जीवन समजेल आणि त्यामुळे त्यांची देखभाल चांगल्या प्रकारे करण्यात देखील मदत होईल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)