You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
50 हजार वर्षांपूर्वी दोन वंशांच्या मिलनातून हे मूल जन्माला आलं होतं
कुणे एके काळी रशियाच्या एका गुहेत दोन वेगवेगळ्या मानवी प्रजाती एकत्र आल्या. आणि या प्रजातींच्या मिलनातून एक मुलगी जन्माला आली होती, असं आज, जवळपास 50 हजार वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे.
गुहेत मिळालेल्या मानवी प्रजातींच्या हाडांची DNA टेस्ट करण्यात आली. यानुसार या दोन प्रजातींच्या मिलनातून एक मुलगी असावी, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
या मुलीची आई निएंडरथल तर वडील डेनिसोवन प्रजातीचे होते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. काळाच्या पडद्याआड गेलेल्या निएंडरथल प्रजातीला आधुनिक मानवाच्या सर्वांत जवळची प्रजाती मानली जाते.
सुरुवातीच्या काळात आधुनिक मानव आफ्रिकेतून युरोपला पोहोचला. त्यादरम्यान ही प्रजाती नष्ट झाली. 50 हजार वर्षांपूर्वी निएंडरथल जवळपास संपूर्ण युरोप आणि आशियात वास्तव्यास होते, असं समजलं जातं.
'नेचर' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार आदिमानवाचं आयुष्य कसं असेल, याचा अंदाज लावता येऊ शकतो. निएंडरथल आणि डेनिसोवन हे आपल्यासारखेच मनुष्य होते, पण त्यांच्या प्रजाती मात्र वेगळ्या होत्या.
"यापूर्वी केलेल्या अभ्यासातून आम्हाला असं वाटलं होतं की, निएंडरथल आणि डेनिसोवन कधीतरी भेटले असतील आणि दोघांनी एखाद्या अपत्याला जन्म दिला असेल. पण आमच्या नशिबात या गोष्टीचा पुरावाच सापडणं लिहिलं होतं, असा विचार मी कधी केला नव्हता," असं जर्मनीच्या 'मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्हॉल्यूशनरी अँथ्रोपोलॉजी'चे संशोधक विनियन स्लोन सांगतात.
आपण सर्व त्याच आईचे अपत्य?
सध्याच्या काळातील काही आफ्रिकेतर लोकांचा DNA निएंडरथल प्रजातीशी मिळताजुळता आहे. तसंच काही आफ्रिकेतर लोकांचा DNA आशियाई लोकांच्या डेनिसोवन प्रजातीशी मॅच होतो.
अनेक पिढ्यांमधील परस्पर संबंध आणि DNAमधील बदलांनुसार समोर येतं की, वेगवेगळ्या प्रजातींनी मिळून अपत्यांना जन्म दिला होता.
असं असलं तरी याचे पुरावे फक्त सायबेरियाच्या अलताई पर्वतांमध्येच मिळाले आहेत. 20पेक्षा कमी प्राचीन माणसांमध्ये ते वेगवेगळ्या प्रजातींपासून जन्मल्याचा पुरावा मिळतो.
"यांतल्या खूप कमी प्रकरणांमध्ये दोन्ही प्रजातींचा वाटा समान दिसून आला आहे. दुसऱ्या संशोधनांचा विचार केल्यास तुम्हाला दिसून येईल की, मानवी विकासाचा इतिहास वेगवेगळ्या प्रजातींच्या मिश्रणानं भरलेला आहे," डॉ. स्लोन सांगतात.
निएंडरथल आणि डेनिसोवन कुठं राहायचे?
40 हजार वर्षांपूर्वी या दोन्ही प्रजाती अस्तित्वात होत्या. निएंडरथल पश्चिमेकडे तर डेनिसोवन पूर्व भागात राहायचे. निएंडरथल जेव्हा पूर्वेकडे जायला लागले तेव्हा ते डेनिसोवनच्या संपर्कात आले असावेत.
निएंडरथल आणि डेनिसोवन यांना भेटण्यासाठी अनेक संधी मिळाल्या नसतील. पण भेटले असतील तर त्यांच्यात अनेकदा संबंध प्रस्थापित झाले असतील, पूर्वी आम्ही जेवढा विचार करायचो त्यापेक्षा खूप जास्त.
मुलीच्या कुटुंबाबद्दल काय माहिती?
रशियाच्या पुरातत्वज्ञांना काही वर्षांपूर्वी डेनिसोवाच्या पर्वतांमध्ये हाडाचा एक तुकडा सापडला होता. या तुकड्यातूनच दोन प्रजातींचं अपत्य असल्याची बाब समोर आली होती.
लिपझिग शहरात यावर अभ्यास करण्यात आला.
"हा तुकडा एका मोठ्या हाडाचा भाग होता आणि त्याचं वय 13 वर्षं असावं, असा आपण अंदाज लावू शकतो," टोरंटो युनिव्हर्सिटीचे बेंस विओला सांगतात.
या मुलीच्या आईची पश्चिम युरोपात राहणाऱ्या निएंडरथलशी जास्त जवळीक असावी, असा शोधकर्त्यांचा अंदाज आहे. निएंडरथल आपलं अस्तित्व नष्ट होण्यापूर्वी पश्चिमेकडून पूर्व युरोप आणि आशियाकडे गेले होते, यामुळे ही बाब स्पष्ट होते.
डेनिसोवा प्रजातीच्या कौटुंबिक शृंखलेत कमीतकमी एकात निएंडरथलचा अंश मिळाला आहे, असं आनुवांशिक शोधांमध्ये आढळलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)