या शेतात खणल्यावर तण नाही हिरे सापडतील

    • Author, डी. एल. नरसिंहा
    • Role, बीबीसीसाठी आंध्र प्रदेशहून

मान्सून आला की, देशभरातल्या शेतकऱ्यांना वेध लागतात ते शेतीच्या कामांचे. पण आंध्र प्रदेशातल्या करनूल आणि अनंतपूर जिल्ह्यातल्या शेतांमध्ये लगबग असते ती हिरे शोधण्याची.

आंध्र प्रदेशच्या रायलसीमा भागाला 'हिऱ्यांची जमीन' असं म्हटलं जातं, कारण इथल्या जमिनीत मुबलक प्रमाणात हिरे असू शकतील अशी खनिजं सापडतात.

जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (GSI) अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, वजराकरूर, पाग दी राई, पेरावली, तुग्गाली सारख्या भागांना हिऱ्यांचा खजिना समजतात.

आसपासच्या राज्यांतूनही लोक इथे हिरे शोधायला येतात. कोणत्याही तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर न करता हे लोक हिरे शोधत राहतात.

अनंतपूर जिल्ह्यातल्या गावांमध्ये मोकळ्या मैदानांत आणि शेतांमध्ये हिरे शोधणाऱ्या लोकांशी बीबीसीने बातचीत केली.

रोजंदारीवर काम करणाऱ्या एक मजूर जेहराबी म्हणतात, "हिरे सापडतील या आशेने आम्ही आमची रोजंदारी सोडून आलेलो आहोत. अजूनपर्यंत तरी आम्हाला काही सापडलेलं नाही. उद्या दुपारपर्यंत काही सापडलं नाही तर आम्ही परत जाऊ."

गुंटूरहून हिऱ्याच्या शोधात आलेले बालू नाईक सांगतात की, मागच्या वर्षी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला हिरा सापडला होता. त्यामुळे यंदा ते आपलं नशीब आजमावयला आले आहेत.

कसे शोधतात हिरे ?

हिरे शोधायला इथे येणाऱ्या लोकांना ते कसे शोधायचे यांचं कोणतंही तंत्रशुद्ध ज्ञान नाही. ते फक्त नेहमीपेक्षा वेगळे वाटणारे दगड उचलून दलालांना विकण्यासाठी आपल्या पिशवीत ठेवून घेतात.

पण कोणत्या ठिकाणी हिरे शोधायचं हे कसं ठरतं? याविषयी वन्नुरुसा सांगतात की, "जमिनीवर पडणाऱ्या सूर्याच्या किंवा चंद्राच्या किरणांवरून कळतं की कुठे हिरे शोधायचे."

कार्बन डायऑक्साईड म्हटला जाणारा एक दगड दाखवत ते पुढे बोलू लागतात, "या प्रकारचे दगड जिथे दिसतात, तिथे हिरे सापडतात. म्हणूनच त्या भागाच्या आसपास हिरे शोधतो."

याच दगडाच्या आधारावर इंग्रजांनीही इथे या हिऱ्यांच्या शोधार्थ खाणी खोदल्या होत्या.

वन्नुरुसांना याआधीही इथे एक छोटा हिरा सापडला होता. पुढेही हिरे सापडतील या आशेने ते अजूनही इथे येतात.

या सापडलेल्या हिऱ्यांचं काय होतं?

हिरे शोधणाऱ्यांपैकी एकाने सांगितलं की, हिरा सापडला की आम्ही तो दलालाला विकतो. ते दलाल हिरे शोधणाऱ्यांना हिऱ्याच्या किमतीचा एक लहानसा हिस्सा मेहनताना म्हणून देतात.

अर्थात या हिऱ्यांविषयी तऱ्हेतऱ्हेच्या कहाण्या ऐकायला मिळतात.

असं म्हणतात की, राजा कृष्णदेवरायांच्या राज्यात व्यापारी हिरे आणि इतर मौल्यवान खड्यांची विक्री खुल्या बाजारात करायचे. म्हणजे या प्रदेशात हिरे आणि मौल्यवान खडे मुबलक सापडायचे.

लोक म्हणतात की, पुढे जाऊन राजवटींचा नाश, अस्मानी-सुलतानी संकट आणि सततच्या युद्धांनंतर ही संपत्ती हरवली. पण आजही पाऊस पडला की ते हिरे, मौल्यवान खडे जमिनीच्या पृष्ठभागावर दिसतात.

GSIचे उपसंचालक राजा बाबू म्हणतात की, "आंध्र प्रदेशचे करनूल आणि अनंतपूर जिल्हे तसंच तेलंगणाचं मेहबूबनगर जमिनीतल्या खनिजांसाठी ओळखले जातात. जेव्हा जमिनीच्या अंतर्भागात काही नैसर्गिक बदल होतात तेव्हा ते हिरे जमिनीच्या पृष्ठभागावर येतात."

जमिनीच्या आत किम्बरलाईट आणि लॅम्प्रोइट खनिजांमध्ये हिरे सापडतात. ही खनिजं करनूल आणि अनंतपूर जिल्ह्यांमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ आहेत. पाऊस-पाणी आणि पुरामुळे ही खनिजं वरच्या थरांत जातात. या कारणामुळेच लोक पावसाळ्यात हिऱ्यांचा शोध घ्यायला या भागात येतात.

किम्बरलाईट आणि लॅम्प्रोइट खनिजं कशी तयार होतात?

"या भागात गेल्या 5000 वर्षांत झालेली जमिनीची धूप हेही हिऱ्यांच्या जमिनीवर येण्याचं कारण आहे," राजाबाबू पुढे सांगतात.

हिरे कसे बनतात याची प्रक्रिया ते उलगडून सांगतात. "जमिनीखाली 140-190 फुटांवर कार्बनच्या अणूंना खूप जास्त तापमान आणि पृष्ठभागाच्या दबावाचा सामना करावा लागतो. या तापमानात आणि दबावात कार्बनचे अणू हिऱ्यामध्ये रुपांतरित होतात.

पृथ्वीच्या पोटात सतत स्फोट होत असतात. यातूनच लाव्हा तयार होतो. या लाव्ह्यातून किम्बरलाईट आणि लॅम्प्रोइट खनिजं तयार होतात. ही खनिजं हिऱ्यांची गोदामं म्हणून काम करतात. या खनिजांमध्ये हिरे सापडतात.

खाणकाम करणाऱ्या कंपन्या ही खनिज जमिनीत सापडली तरच तिथे खोदकाम करतात. 16 व्या आणि 17 व्या शतकातली पुस्तकं आणि नोंदीवरून लक्षात येतं की कृष्ण देवराय आणि इंग्रजांच्या काळातही या भागात खोदकाम होत असे."

जोन्नागिरी नावाच्या गावात जॉन टेलर शाफ्ट या नावाने एक 120 वर्ष जुनी विहीर आहे. त्या विहीरवरून लक्षात येतं की इंग्रजांच्या काळात या ठिकाणी खोदकाम होत असे.

या भागात किम्बरलाईट खनिजं दिसतात. केंद्र सरकारने याच विहिरीजवळ हिऱ्यांना पैलू पाडण्याचं केंद्र सुरू केलं होतं. त्यानंतर त्याच ठिकाणी किम्बरलाईट पार्क आणि म्युझियम उभारण्यात आलं.

लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथा-कहाण्यांविषयी GSI चे अतिरिक्त महासंचालक श्रीधर सांगतात की, जोन्नागिरीजवळ सम्राट अशोकांच्या काळातला शिलालेख सापडला आहे. हा शिलालेख या भागात खनिजसंपदा असल्याचा पुरावा आहे.

पण आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) ने अजूनपर्यंत याला दुजोरा दिलेला नाही.

फक्त आंध्र प्रदेशच नाही, तर शेजारच्या कर्नाटक राज्यातले बेल्लारीमधूनही इथे लोक हिरे शोधायला येतात. या गावांमध्ये ही लोक तात्पुरती पालं ठोकून राहातात आणि स्वतःच नशीब आजमावून पाहतात.

हेही वाचलंत का?