'ट्रंप साहेब चित्र नाही देऊ शकत, सोन्याचं कमोड चालेल का?'

आपण शब्द टाकावा अन् इतरांनी तो अलगद झेलावा अशी बहुतेकांची इच्छा असते आणि त्यातही तुम्ही जर अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असाल तर तुमचा शब्द कोण टाळणार?

पण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शब्द एका संग्रहालयानं टाळला. प्रकरण तेवढ्यावरचं मिटलं असतं तर ठीक झालं असतं. पण ट्रंप यांच्या मागणीला त्या संग्रहालयानं जे प्रत्युत्तर दिलं आहे त्याची चर्चा जगभर होत आहे.

त्याचं झालं असं, राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी न्यूयॉर्कच्या गुगनहाइम संग्रहालयाला एक मागणी केली. प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉगचं चित्र काही काळासाठी व्हाईट हाऊसकडे देण्यात यावं असं ते म्हणाले.

संग्रहालयानं ट्रंप यांची विनंती नम्रपणे नाकारली. "आम्ही व्हॅन गॉगचं चित्र देऊ शकत नाही पण व्हाईट हाऊसला हवं असेल तर आम्ही 18 कॅरट सोन्याचा भरीव कमोड देऊ शकतो," असं संग्रहालयानं म्हटलं.

संग्रहालयाच्या या प्रस्तावावर व्हाईट हाऊसकडून अजून प्रतिक्रिया आली नाही.

वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबरमध्ये संग्रहालयाच्या संचालिका नॅंसी स्पेक्टर यांनी हा प्रस्ताव व्हाईट हाऊससमोर ठेवला होता.

व्हॅन गॉग यांनी 1888मध्ये काढलेलं लॅंडस्केप विथ स्नो हे चित्र सुप्रसिद्ध आहे. याच चित्राची मागणी करण्यात आली होती.

"हे चित्र हलवण्याची परवानगी आम्हाला देता येणार नाही. त्यामुळं हे चित्र आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही, पण त्याबदल्यात आम्ही तुम्हाला इटालियन कलाकार मॉरिझियो कॅटलन यांनी बनवलेलं कमोड देऊ शकतो," असं नॅंसी यांनी इमेलद्वारे म्हटलं होतं.

"अर्थात हे कमोडपण मौल्यवान आणि नाजूक आहे. पण आम्ही सर्व काळजी घेऊन ते व्हाइट हाउसमध्ये बसवू शकतो," असं त्या म्हणाल्या.

हे कमोड म्हणजे अमेरिकेच्या अतिश्रीमंतीवर केलेलं उपहासात्मक भाष्य आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

संग्रहालायाच्या या उत्तरामुळं ट्विटर युजर्सनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. "ट्रंप यांनी कलेच्या संवर्धनासाठी राखीव असलेल्या निधीमध्ये कपात केली होती. त्याचा हा परिणाम आहे," असं एका जणानं म्हटलं आहे.

सर्वच जण संग्रहालयाच्या वागणुकीशी सहमत नाहीत. "हा ट्रंप यांचा अपमान आहे. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. यावर्षी मी संग्रहालयाला दान करणार नाही," असं एका ट्विटर युजरनं म्हटलं आहे.

व्हाईट हाऊसची सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या संग्रहालयांकडे काही वस्तू उसण्या मागितल्या जातात. राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यावर त्या परत केल्या जातात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)