मेक्सिको सरकारला हवी आहेत ती आठ भारतीय मुलं

    • Author, सोहेल हलीम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मेक्सिकोचं सरकार त्या आठ भारतीय मुलांचा शोध घेत आहे. तिथल्या अधिकाऱ्यांच्या मते या आठ मुलांपैकी तीन जण प्रत्यक्ष मेक्सिकोमध्ये येऊनही गेले असण्याची शक्यता आहे.

पण तरीही त्यांचा काही ठावठिकाणा नाही. सरकारला फक्त त्यांचं नाव आणि वय माहिती आहे. सरकारनं तपासाची कक्षा रुंदावली असली तरीही हा शोध घेणं सोपं नाही कारण खूप वर्षे लोटली आहेत. थोडीथोडकी नव्हे तर 50 वर्षं.

50 वर्षांपूर्वी...

दिल्लीतल्या मेक्सिकोच्या दूतावासनं दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षांपूर्वी 1968मध्ये जेव्हा मेक्सिकोत ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं तेव्हा सामन्यांबरोबरच झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात चित्रांचं एक प्रदर्शनही भरलं होतं.

या प्रदर्शनात जगभरातल्या 1800 मुलांनी सहभाग घेतला होता. त्यात भारतातली 8 मुलंही होती.

पहिल्यांदाच हिस्पॅनिक भाषा बोलणाऱ्या शहरात ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं.

सहभागी मुलांनी जी चित्रं काढली होती ती मेक्सिकोतल्या शहरांच्या सगळ्यांत प्रसिद्ध ठिकाणी प्रदर्शनासाठी मांडण्यात आली. त्या प्रदर्शनाचं नावं होतं, 'वर्ल्ड ऑफ फ्रेण्डशिप' म्हणजेच दोस्तीची दुनिया.

त्या चित्रांपैकी आता थोडीच चित्रं शिल्लक आहे आणि मेक्सिकोच्या सरकारला त्यांचं पुन्हा प्रदर्शन भरवायचं आहे. या योजनेला त्यांनी 'दोस्तीची दुनिया पन्नास वर्षांनंतर' असं नावं दिलं आहे. या चित्रांच्या चित्रकारांचा शोध घेण्याची जबाबदारी जगभरातल्या मेक्सिकन दूतावासांना दिली आहे.

मेक्सिकन दूतावासाच्या मते त्या भारतीय मुलांनी 'शंकर इंटरनॅशनल चिल्ड्रन आर्ट कॉम्पिटीशन' या बॅनरखाली प्रदर्शनात भाग घेतला होता. ही स्पर्धा केशव शंकर पिल्लई यांनी सुरू केली होती.

ते एक व्यंगचित्रकार होते आणि त्यांनीच दिल्लीचं प्रसिद्ध शंकर डॉल संग्रहालय सुरू केलं.

भारतीय संघाबरोबर कदाचित ही तीन मुलंही मेक्सिकोला गेली होती, असं दूतावासाचं म्हणणं आहे. या मुलांनी मेक्सिकोतल्या प्रसिद्ध रस्त्यांवर चित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं.

चित्रकारांचा शोध

या चित्रकारांपैकी एका मुलाचा शोध लावण्यात मेक्सिको सरकारला यश आलं आहे, पण ते आता हयात नाही असं त्यांच्या दूतावासाचं म्हणणं आहे.

जितेंद्र नवनीत लाल पारिख यांचं चित्र 'मार्केट' हेही या प्रदर्शनात झळकलं होतं. त्यावेळी त्यांचं वय 15 वर्षांचं होतं.

इतर मुलांची नावं सुजाता शर्मा (14 वर्षं), ईरा सचदेव ( 12 वर्षं), संत कुडो (13 वर्षं), विवेक कछभाटला (9 वर्षं), ईला एम्स ( 8 वर्षं) आणि लीला सुधाकरन अशी आहेत, अशी माहिती दूतावासानं दिली.

जर मेक्सिको सरकारला या मुलांचा शोध घेण्यात यश आलं तर सरकार त्यांना त्यांच्या चित्रांची एक फ्रेम केलेली प्रत आणि प्रशस्तीपत्रक देणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)