हस्तांदोलनास नकार दिला म्हणून मुस्लीम दांपत्याला नागरिकत्व नाकारलं

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, SAUL LOEB/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

मुलाखतीदरम्यान विरुद्ध लिंगी व्यक्तीशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानं एका मुस्लीम जोडप्याला स्वित्झर्लंडचं नागरिकत्व नाकारण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

शुक्रवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.

"लैंगिक समानतेचा आदर करण्यात हे जोडपं अपयशी ठरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे," असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

महिन्याभरापूर्वी नागरिकत्वासाठी या जोडप्याची मुलाखत घेण्यात आली होती. विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीनं विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देणं या जोडप्याला कठीण गेलं होतं.

"स्वित्झर्लंडमध्ये येऊ पाहणाऱ्या व्यक्तींनी इथली संस्कृती जाणून घ्यायला हवी. तसंच स्वित्झर्लंडमधील संस्था आणि न्यायव्यवस्थेसंबंधी त्यांना आदर असायला हवा," असं स्विस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

अधिकाऱ्यांनी या जोडप्याची अधिक माहिती उघड केलेली नाही. स्थानिक माध्यमांनुसार हे जोडपं उत्तर आफ्रिकेतलं असावं.

मोझॅन शहरात राहण्यासाठी जेव्हा जोडप्यानं अर्ज केला तेव्हा ते नागरिकत्वाची नोंदणी करण्यासाठीचे निकष पूर्ण करू शकले नाही, असं या अधिकाऱ्यांना वाटल्याचं सांगण्यात येत आहे.

'लैंगिक समानतेचा आदर करण्यात अपयशी'

मोझॅनचे महापौर ग्रेग्वार जुनॉड यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "स्थानिक कायद्यांमध्ये धार्मिक स्वातंत्र्य नक्कीच आहे. पण धार्मिक परंपरा या कायद्याच्या कक्षेतच येतात."

हस्तांदोलन

फोटो स्रोत, Science Photo Library

या जोडप्याचा धर्म स्पष्टपणे कळत असला तरी त्यांना त्याबद्दल काही विचारण्यात आलं नव्हतं, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

लैंगिक समानतेविषयी जोडप्याकडून झालेला अनादर पाहून त्यांचं नागरिकत्व नाकारण्यात आलं आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

"राज्यघटना आणि स्त्री-पुरुष समानतेपुढे फाजील धर्माभिमानाला स्थान नाही," असं या जोडप्याची नागरिकत्वासाठी मुलाखत घेणाऱ्या पीअर अँन्टॉइन हिलब्रांड यांनी सांगितलं.

पहिली वेळ नाही

स्वित्झर्लंडमध्ये हस्तांदोलनामुळे वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

2016मध्ये स्विस स्कूलमधून दोन मुस्लीम मुलांना काढून टाकण्यात होतं. कारण त्यांनी महिला शिक्षिकेशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. यामुळे या मुलांच्या कुटुंबीयांची नागरिकत्व मिळण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली.

शेजारच्या फ्रान्समध्ये एका महिलेसोबत असाच प्रकार घडला होता. नागरिकत्व देण्याच्या समारंभात या अल्जेरियन महिलेनं अधिकाऱ्यांशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानं तिला आपल्या नागरिकत्वाला मुकावं लागलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)