लैंगिक छळाच्या पीडितांकडून पुरावा मागितल्यावरून पोपचा माफीनामा

फोटो स्रोत, EPA
मागच्या आठवड्यात चिली दौऱ्यावर असताना पोप फ्रान्सिस यांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या एका बिशपची (धर्मोपदेशकाची) पाठराखण करणारी वक्तव्यं केल्याबद्दल माफी मागितली आहे.
चिलीचे बिशप जुअन बारोस यांच्यावर आरोप करणारे पीडित एक प्रकारचं पाप करत आहेत, असं वक्तव्य त्यांनी मागच्या आठवड्यात केलं होतं.
"माझ्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत याची मला जाणीव झाली आहे," असं ते म्हणाले. पण बिशप बारोस निर्दोष असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
रोमला परतताना विमानात ते पत्रकारांशी बोलत होते.
पीडितांची व्यथा
बोस्टनचे कार्डिनल सिअन ओमेली यांनी पोप यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, पोप यांच्या वक्तव्यामुळे पीडितांमध्ये दूर सारलं गेल्याची भावना आहे.
"नकळतपणे मी त्यांना दुखावलं असेल तर मी त्यांची माफी मागतो. पण पीडितांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. मला स्वत:ला फार दु:ख होत आहे," अशा शब्दांत त्यांनी माफी मागितल्याचं वृत्त 'रॉयटर्स'ने दिलं आहे.
बिशप बारोस यांच्यावर मुलांवर थेट अत्याचार करण्याचा कोणताही आरोप नाही. पण त्यांच्या उपस्थितीत दुसऱ्या एका धर्मगुरू फर्नांडो कार्डिमा यांनी लहान मुलांचा छळ केल्याचा आरोप आहे.
चिलीच्या पत्रकारांनी गुरुवारी प्रश्न विचारले असता पोप म्हणाले, "जेव्हा बारोस यांच्याविरुद्ध माझ्याकडे पुरावे येतील तेव्हा मी बोलेन. त्यांच्याविरुद्ध काहीही पुरावा नाही. सगळंकाही अधांतरी आहे."
यानंतर कार्डिमा यांच्याकडून छळ झालेल्या पीडितांनी एक पत्रकार परिषद घेतली. "आम्हांला सशक्त पुरावे द्यावं लागणं, हे अतिशय अपमानास्पद आणि अस्वीकारार्ह आहे," असं ते म्हणाले.
सोमवारी पोप म्हणाले की 'पुरावे' या शब्दामुळे त्यांना पश्चात्ताप होत आहे. "मी 'पुरावे' सारखा शब्द वापरणं कुणालाही थोबाडीत मारल्यासारखा लागेल, याची जाणीव मला आहे," असं त्यांनी सांगितलं. "असे अनेक लोक आहेत जे पुरावे देऊ शकत नाही. त्यांच्याकडे ते नाहीत किंवा असतील तरी त्यांनी स्वत:पुरते ठेवले आहेत. गपगुमानं ते सगळं सहन करत आहेत."
नेमका वाद काय आहे?
2010 साली फादर कार्डिमा यांच्यावर अनेक किशोरवयीन मुलांना राजधानीत, सँटिआगोमध्ये छळ करण्यात आल्याचा आरोप होता. या छळाची सुरुवात 1980च्या दशकात झाली होती.
व्हॅटिकनने त्यांना दोषी ठरवलं आणि आयुष्यभर 'आत्मक्लेष आणि प्रार्थना करण्यासारख्या कामात गुंतून राहण्याची' शिक्षा दिली. पण त्यांच्यावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई झाली नाही.

फोटो स्रोत, EPA
मात्र ज्या न्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी केली त्यांनी पीडित लोक विश्वसनीय आणि प्रामाणिक असल्याचं सांगितलं.
बिशप बारोस यांची 2015 साली दक्षिण मध्य चिलीमध्ये धर्मोपदेशक म्हणून निवड झाली. कॅथड्रेलमध्ये झालेल्या निदर्शनामुळे त्यांना दीक्षा समारोहसुद्धा आटोपता घ्यावा लागला होता.
पोपच्या या दौऱ्यावर काय परिणाम?
सँटिआगो येथे पोप यांचं स्वागत निदर्शनानं झालं. बारोस यांनी बिशपपदी राहू नये, अशी लोकांची मागणी होती.
पोप फ्रान्सिस यांनी देशातल्या पीडितांची भेटही घेतली. त्यांच्या दु:खात पोप सहभागी झाले आणि या प्रकरणामुळे निर्माण झालेला उद्वेग ते समजू शकतात, असं ते म्हणाले.
बीबीसी प्रतिनिधी जेन चेंबर्स सांगतात, "पोप यांच्या माफीने पीडित समाधानी नाहीत. पीडितांच्या आक्रोशानंतरही पोप बिशपवर जास्त विश्वास ठेवतात, हे योग्य नाही, असं पीडितांचं मत आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








