मा. सत्यपाल सिंह यांना सप्रेम नमस्कार... एका विज्ञान शिक्षकाचं खुलं पत्र

फोटो स्रोत, Science Photo Library
- Author, विनय र. र.
- Role, उपाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद
मा. सत्यपाल सिंह, मनुष्यबळ विकास राज्य मंत्री, भारत सरकार यांस...
सप्रेम नमस्कार,
मी विनय र.र. एक निवृत्त विज्ञान शिक्षक आहे. मराठीतून विज्ञान प्रसार करण्याचं काम मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागात करतो. विज्ञान शिक्षणाबाबत प्रयोग आणि संशोधनही करतो.
पत्र लिहिण्यास कारण की, आपण १९ जानेवारीला औरंगाबाद येथील 'अखिल भारतीय वैदिक संमेलनात' केलेलं वक्तव्य वर्तमानपत्रात तसंच अन्य मार्गातून वाचनात आलं. त्या वृत्तांतानुसार आपण "डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे, त्यामुळे तो शाळेच्या पाठ्यपुस्तकातून काढून टाकला पाहिजे," असं म्हटल्याचं वाचनात आले.
संबंधित पत्रकारांनी आपल्या बोलण्याचा विपर्यास केला असेल असं क्षणभर वाटलं. (बऱ्याच वेळा मंत्री काही बोलतात, वनर्तमानपत्रात काही छापून येतं. मग मंत्री खुलासा करतात आणि 'आपण तसं बोललोच नाही, वार्ताहारांनी विपर्यास केला' असं सांगतात.)
दोन दिवस आपल्याकडून त्याबाबत खुलासा आला नाही. त्यामुळे उत्क्रांतीबद्दल आपलं विधान छापून आलं तसंच असावं असं मानावं लागतं. आपल्या विधानामुळे मी व्यथित झालो आहे. डार्विनच्या सिद्धांताबाबत अनेक लोकांनी, संशोधकांनी पुरावे गोळा करून त्यातली तथ्यं जगासमोर आणली. अशा वेळेला वैज्ञानिक दृष्टीकोन चुकीचा ठरवणं योग्य वाटत नाही.
डार्विनच्या मांडणीनुसार या पृथ्वीतलावरचे जीव उत्क्रांत होत गेले. एकपेशीय जीवापासून अनेकपेशीय जीव बनले. निसर्गाला अनुरूप असणारे जीव निसर्गात वाढले, टिकले आणि त्यांचा वंश पुढे चालू राहिला. इतरांशी होणाऱ्या स्पर्धेत काही जीव पार पडले, ते टिकले आणि प्रसवले.

फोटो स्रोत, TWITTER
एकपेशीय जीवापासून मानवासारखा प्रगत प्राणी घडण्यासाठी अब्जावधी वर्षांचा कालावधी लागला.
आपण म्हणता की 'कोणत्याही प्राचीन ग्रंथात माकडाचा माणूस होताना कोणाला दिसला नाही.' हे वाक्य बरोबर आहे कारण माकडाचा माणूस होण्याआधी कोणताच माणूस अस्तित्वात नव्हता, मग कोणता तरी माणूस 'माकडाचा माणूस होताना' बघूच कसा शकेल?
दुसरी बाब म्हणजे एखादी गोष्ट आपल्या पूर्वजांना दिसली नाही म्हणून ती नव्हतीच असे म्हणता येईल का? आज आपल्यालाही अनेक गोष्टी दिसत नाहीत, त्यांचा उल्लेख ग्रंथांमध्ये नाही, त्यांच्या अस्तित्वाचा शोध घेण्याची साधनं नाहीत. म्हणून आपल्या दृष्टीने त्या गोष्टी अस्तित्वात नाहीतच का?
एखादं रांगणारं मूल एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातं तेव्हा रडायला लागतं, कारण त्याला वाटतं पहिल्या खोलीतलं जग नष्ट झालं, हरवलं. ही बालबुद्धी हळूहळू अनुभवांतून सुधारत जाते, सुधारत जावी अशी अपेक्षा आहे. नाही सुधारली की आपण त्यांना मंदबुद्धी, आणि सध्याच्या प्रचलनानुसार दिव्यबुद्धी मानायला लागतो.

फोटो स्रोत, DAVID GIFFORD/SCIENCE PHOTO LIBRARY
आपण पुढे म्हणता की, शालेय पाठ्यपुस्तकातून डार्विनचा उत्क्रांतीवाद काढून टाकायला हवा. अमेरिकेतही काही राज्यांमधल्या काही शाळांमधून डार्विनच्या उत्क्रांतीवादाऐवजी निर्मितीवाद म्हणजे क्रिएशनिझम शिकवला जातो. त्यानुसार हे जग देवाने शून्यातून निर्माण केलं असं मांडलं जातं.
ख्रिस्ती, यहुदी या धर्माच्या अनुयायांमध्ये ही कल्पना आहे. जगात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या सभ्यता आणि धर्मपरंपरा आहेत. त्यांना अनुसरून विश्वनिर्मितीच्या कल्पना मांडल्या गेल्या आहेत. या कल्पना जिथे शाळांमध्ये शिकवल्या जातात त्या देशांमध्ये विद्यार्थ्यांची दृष्टी कशी कोती होईल याची कल्पना आपण करू शकता.
माणसाला कुतूहल आहे, नवं काही शोधण्याची उर्मी आहे, ती शिक्षणाने विकसित व्हावी असा शिक्षणाचा हेतू असतो. डार्विनचा सिद्धांत आपल्या मते चुकीचा असेल तर तो का चुकीचा आहे हे स्पष्ट करणं याला शिक्षण म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या भारत देशात आपण राहतो तिथे जगातल्या सर्व धर्मांची माणसं आपापल्या विश्वनिर्मिती कल्पना घेऊन त्याच खऱ्या असे मानायला लागलो तर किती गोंधळ होईल? या देशात प्रांतोप्रांती आणि विविध आदिवासी भागांमध्येही अशा विश्वकल्पना असणारच. प्रत्येकाने आपल्याच कल्पना खऱ्या म्हणून मांडल्या तर किती अव्यवस्था होईल? एक माजी पोलिस प्रशासक म्हणूनही याचा आपण विचार करू शकता.
आपल्या देशाचं ध्येयवाक्य 'सत्यमेव जयते' असं आहे. सत्याचा शोध घेणं, सत्य सामोरं आणणं असा त्याचा अर्थ. हे काम करायचं तर विवेकबुद्धी हवी, विज्ञानदृष्टी हवी. 'बाबा वाक्यं प्रमाणम्' अशी मानसिकता नको.
भारतात एक महात्मा सिद्धार्थ गौतम बुद्ध याने आपल्या अनुयायांना उपदेश केला होता. 'गुरू अमूक करतो म्हणून तुम्ही करू नका, किंवा गुरू तमूक टाकतो म्हणून टाकू नका. स्वतः विचार करा, आपला विवेक वापरा' हा तो उपदेश. असा उपदेश एखादा वैज्ञानिकच करू शकतो.

थोर प्रकाशशास्त्रज्ञ इब्न-अल-हयथम म्हणतो, 'तुम्हाला वैज्ञानिक व्हायचे असेल तर तुम्ही स्वतःच्याच सिद्धांतांवर तुटून पडा.' इतक्या उच्च कोटीचे वैज्ञानिक होण्यासाठी शंका घेणारे, कुतूहल जागे असणारे, पुरावे मिळवणारे आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सिद्धांत मांडणारे संशोधक तयार व्हायला हवेत. 'आमच्या पूर्वजांनी सर्व शोध आधीच लावून ठेवले होते' असे भास बाळगणारे पाईक आपण शिक्षणातून निर्माण करणार आहोत का?
'अनुकूलन करणारा जीव टिकेल' या डार्विनच्या सिद्धांताचा पुरावा आज तुम्ही हयात असताना बघू शकता. त्यासाठी असा जीव निवडावा लागेल की ज्याच्या शेकडो पिढ्या थोडक्या काळात जन्म घेतील. सूक्ष्मजीव असे आहेत.
प्रतिजैविकं म्हणजे अन्टीबायोटिक्स वापरून त्यांना प्रतिकूल परिस्थिती आपण निर्माण करतो. त्या परिस्थितीला तोंड देऊन जे जगतात. ते आपल्या पुढच्या पिढ्या अशा घडवतात की त्या प्रतिजैवकांना निष्प्रभ करत टिकून राहतील. यात तुम्हाला डार्विनचा सिद्धांत दिसू शकेल.

डार्विनची उत्क्रांती सिद्ध होण्यासाठी वर्षानुवर्षांपूर्वी गाडले गेलेले जीव, जीवाश्मांच्या रुपाने आपल्याला पुरावे देतात. जीवाश्मांच्या रचनेवरून, स्थानावरून त्यांचा काळ कसा असेल, त्यांची परिस्थिती कशी असेल याचा आडाखा बांधता येतो.
पृथ्वीवर इतरत्र सापडलेल्या जीवाश्मांच्या अभ्यासाने डार्विनचा सिद्धांत आवश्यक असेल तर दुरुस्तही करता येतो. विज्ञानाचं हेच वैशिष्ट्य आहे. पुरावे मिळाले की विज्ञान आपले सिद्धांत सुधारू शकतं. ही शक्यता कोणत्याही धर्माच्या अनुयायांमध्ये असेल तर तो धर्म सतत आधुनिक आणि नित्यनूतन होत राहील.
डार्विनच्याच काय, अनेक वैज्ञानिकांच्या सिद्धांतांना समकालीन संशोधकांनी आव्हान दिलं. त्यातून सिद्धांत सुधारत गेले. नवनवे सिद्धांतही पुढे आले. विज्ञानाची वाटचाल पुढे चालू राहिली. त्यामध्ये कोणी खोडसाळपणे "जुने सिद्धांत चुकीचे आहेत" असं म्हणू लागले किंवा राजकीय ताकदीच्या जोरावर, गैरसोयीचे सिद्धांत नाकारू लागले त्यांचा इतिहासात बदलौकिकच झाला. विज्ञानाची मात्र प्रगती झाली.

विज्ञानाला विरोध करणाऱ्यांचा कदाचित त्या-त्या काळात आपल्या ताकदीच्या जोरावर विजय झाला असं वाटलं असेल. पण भविष्यात त्यांचं हसंच झालं.
तसं आपल्या देशाचं हसं होऊ नये! आपल्या पूर्वजांनी अनेक उत्तम कामं केली, विज्ञानाची वाट चालू केली, आपण त्यांची वाट पुढे वाढवण्यासाठी, प्रगत करण्यासाठी त्यांची पुन्हा पुन्हा तपासणी करायला पाहिजे.
आपण आणि आपले अनेक राजकीय सहकारी 'तपासणी करणे' या कल्पनेच्याच विरोधात उभे राहिला आहात का, अशी शंका येते.
कृपया तसं करू नका. 'भा-रत' म्हणजे 'प्रकाशात रमणाऱ्या लोकांचा देश' ही आपली ओळख वाढवू या. जगालाच 'भा-रत' होण्याची संधी देऊ या, अशी विनंती आहे.
आपला,
विनय रमा रघुनाथ
(लेखक विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. सध्या ते महाराष्ट्र राज्य मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.)
हे जरूर वाचा
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








