'स्विस बँके'त भारतीयांचा काळा पैसा नेमका पोहोचतो कसा?

परदेशी चलन

फोटो स्रोत, Getty Images

स्विस बँकेतल्या भारतीयांच्या खात्यातल्या रकमेत 2017 या आर्थिक वर्षात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे, असं स्विस नॅशनल बँकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आलं आहे.

भारतात जेव्हा-केव्हा काळ्या पैशाची चर्चा होते, तेव्हा स्वित्झर्लंडमधल्या म्हणजेच स्विस बँकांचीही चर्चा सुरू होते. स्विस बँकांच्या गुप्त व्यवहाराची आणि प्रचंड पैशाची चर्चा सुरू होते, तेव्हा तर सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते.

भारतीयांचे स्विस बँकेत जमा असलेले पैसे खरंतर २०१७ पूर्वीच्या तीन वर्षांमध्ये कमी होत होते. पण, २०१७मध्ये संपूर्ण चित्रच पालटलं. दरवर्षीच्या आकड्यांची तुलना केली तर गेल्या वर्षी, २०१७मध्ये स्विस बँकेत भारतीयांचा पैसा ५० टक्क्यांनी वाढला. ही वाढ जवळपास १.०१ अब्ज स्विस फ्रँक (सात हजार कोटी रुपये) एवढी झाली.

हे आकडे स्विस नॅशनल बँकेनं प्रसिद्ध केल्यानं यावर आता कोणतीही शंका घेण्याचं काही कारण नाही. स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँकेनं (SNB) दिलेल्या आकड्यांनुसार, स्विस बँकेत परदेशी ग्राहकांच्या एकूण पैशात २०१७मध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ १.४६ लाख कोटी स्विस फ्रँक (१०० लाख कोटी) एवढी झाली.

या माहितीमुळे आता मोदी सरकारचं टेन्शन वाढू शकतं. कारण, सत्तेत आल्यापासूनच काळं धन परत आणण्याचं वचन मोदी सरकारनं दिलं होतं. तसंच, स्विस बँकेत पैसे ठेवणाऱ्यांबद्दल माहिती देणाऱ्यांचा लाभ करून देण्याचा विचारही या सरकारनं पूर्वी बोलून दाखवला होता.

ब्लूमबर्गनुसार, २०१६ हे वर्ष मोदी सरकारसाठी चांगलं वर्ष ठरलं. कारण, या वर्षात स्विस बँकेतले भारतीयांचे पैसे ४५ टक्क्यांनी कमी झाले होते. १९८७ सालापासून स्वित्झर्लंड या आकड्यांची माहिती देतं. या सगळ्या आकड्यांची तुलना केली असता २०१६मध्ये पैशांची कमी झालेली टक्केवारी सगळ्यांत मोठी होती. पण, सध्याचे आकडे हे सरकारला चिंतेत टाकणारे आहेत.

SNB नुसार, स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशांचं वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे. यात, वैयक्तिक धन वाढून ३२०० कोटी झालं आहे, दुसऱ्या बँकांमार्फत जमा झालेले पैसे १०५० कोटी आहेत आणि सिक्युरिटीजच्या स्वरुपात जमा झालेले पैसे २६४० कोटी रुपये आहेत.

काळा पैसा देशाबाहेर पाठवणाऱ्या देशांचं जगाच्या नकाशावरील स्थान

२००६च्या अखेरीस स्विस बँकेत भारतीयांचे पैसे २३ हजार कोटी रुपये होते. पण, गेल्या एक दशकात याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे.

या मोठमोठ्या आकड्यांमुळे दोन प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच उमटत असतील. काळा पैसा जमा करण्यासाठी लोक स्वित्झर्लंड आणि तिथल्या बँकांची निवड का करतात? आणि दुसरा म्हणजे, हे काळं धन स्विस बँकेत नेमकं पोहोचतं कसं?

लोक का जमा करतात स्विस बँकेत पैसे?

यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. स्वित्झर्लंडमधल्या बँका आपल्या ग्राहकांची आणि त्यांनी जमा केलेल्या पैशाची माहिती अत्यंत गोपनीय ठेवतात. ज्यामुळे लोक त्यांना पहिली पसंती देतात.

म्हणूनच जेम्स बाँड किंवा हॉलीवूडमधल्या चित्रपटांमध्ये स्विस बँक आणि त्यांचे कर्मचारी गुप्तपणे वावरताना दिसतात. ते काळा सूट आणि ब्रीफकेसमध्ये लपलेल्या काँप्युटर डीवाईसमार्फत सगळं काम करताना दाखवलं जातं.

स्विस बँका या इतर बँकांप्रमाणेच काम करतात. पण, त्यांच्याबरोबर जोडली गेलेली गोपनीयताच त्यांना खास बँक बनवते. या स्विस बँकांमधले गोपनीयतेचे नियम ही काही नवीन गोष्ट नाही.

भ्रष्टाचार, भारत
फोटो कॅप्शन, काळा पैसा

विशेष बाब म्हणजे गेल्या ३०० वर्षांपासून या बँका हे सिक्रेट राखून आहेत. १७१३मध्ये ग्रेट काऊन्सिल ऑफ जिनिव्हाने बनवलेल्या नियमांनुसार, या बँकांना आपल्या ग्राहकांची माहिती घेण्यास सांगितलं गेलं होतं. या नियमांनुसार, ग्राहकांची ही माहिती सिटी काउन्सिल व्यतिरिक्त इतर कोणासही देता येणार नाही.

स्विस बँक आणि सिक्रेट

स्वित्झर्लंडमधला एखादा बँकर आपल्या ग्राहकाशी निगडीत माहिती इतर कोणास देत असेल तर तो गुन्हा आहे. गोपनीयतेचे हे कडक नियम स्वित्झर्लंडला काळं धन सुरक्षित ठेवण्याचं ठिकाण बनवतात.

झुरीक शहर, स्वित्झर्लंड

फोटो स्रोत, Thinkstock

फोटो कॅप्शन, शंभराहून अधिक स्विस बँकांची कार्यालयं स्वित्झर्लंडमधल्या झुरीक शहरात आहेत.

ही फार जुनी गोष्ट नाही - पैसा, सोनं, ज्वेलरी, पेंटिंग किंवा दुसरी एखादी मौल्यवान वस्तू या बँकेत ठेवल्याबद्दल ही बँक कोणतीही विचारणा करत नसे. पण आता तशी परिस्थिती नाही.

दहशतवाद, भ्रष्टाचार आणि टॅक्स चोरीची वाढणारी प्रकरणं यामुळे स्वित्झर्लंड आता अशा खातेदारांना थारा देत नाही. कारण, असे खातेधारक बेकायदेशीर कृत्यांत सहभागी असल्याचा संशय असतो.

तसंच, सध्या भारत आणि इतर देशांनी खातेधारकांची माहिती देण्याबाबत केलेल्या मागणीबाबतही स्वित्झर्लंड विचार करत आहे. पण, या देशांनाही संबंधित खातेधारकांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचे पुरावे यासाठी उपलब्ध करून द्यावे लागतील.

कसे जमा होतात पैसे?

दुसरा प्रश्न, स्विस बँकेत काळं धन नेमकं पोहोचतं कसं? यासाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, स्विस बँकेत खातं कसं उघडलं जातं?

१८ वर्षांहून अधिक वय असलेली कोणतीही व्यक्ती स्विस बँकेत खातं उघडू शकते. पण, खातं उघडू पाहणारी व्यक्ती एका विशिष्ठ राजकीय हेतूनं किंवा बेकायदेशीररीत्या बँकेत पैसे जमा करू पाहत असेल, तर अशांचा अर्ज बँक रद्द करू शकते.

बिझनेस स्टँडर्डनुसार, स्वित्झर्लंडमध्ये जवळपास ४०० बँका आहेत. ज्यात यूबीएस आणि क्रेडीस सुइस हे बडे मासे आहेत. या दोघांकडे सगळ्या बँकांच्या बॅलन्स शीट्सच्या अर्ध्याहून अधिक हिस्सा आहे.

सगळ्यांत जास्त गोपनीयता मिळणाऱ्या खात्यांना तिथे 'नंबर्ड अकाउंट' म्हणतात. या खात्यांशी जोडलेली सगळी माहिती ही एका अकाउंट नंबरवर मिळते. यात कोणाचंच नाव लिहिलेलं नसतं.

परदेशी चलन

फोटो स्रोत, Getty Images

बँकेमध्ये असे काही ठरावीकच लोक असतात ज्यांना माहीत असतं की, हे खातं नेमकं कोणाचं आहे. पण, ही अकाउंट सहजासहजी मिळत नाहीत.

असं म्हटलं जातं की, ज्यांना पकडलं जायचं नाहीये असे लोक बँकेकडून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि चेकबुकची सुविधा घेत नाहीत.

तसंच, या बँकेतलं खातं जर आपल्याला बंद करायचं असेल तर ते केव्हाही करता येतं. यासाठी कोणतेही पैसे लागत नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)