You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बांगलादेश : सुरक्षित रस्त्यांसाठीच्या विद्यार्थी आंदोलनाला हिंसेचं गालबोट
रस्ते वाहतूक सुरक्षित करा, अशी मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन गेल्या 7 दिवसांपासून बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये सुरू आहे. पण शनिवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, ज्यात जवळपास 25 विद्यार्थी जखमी झाल्याचं वृत्त आहे.
आंदोलनाने पेट कसा घेतला, हा हल्ला कुणी केला आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण हा हल्ला सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका विद्यार्थी गटानं केला आहे, असा आरोप स्थानिक मीडियानं केला आहे.
निदर्शनादरम्यान लोकांनी रस्ते वाहतूक ठप्प केली होती.
गेल्या रविवारी भरधाव वेगानं येणाऱ्या एका बसने एक मुलगा आणि एका मुलीला टक्कर दिली होती. या अपघातात त्या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ढाकामध्ये ही निदर्शनं सुरू झाली आहेत.
सरकार काय म्हणतं?
निदर्शनांमुळे बांगलादेश सरकारनं देशातली इंटरनेट सेवा 24 तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना परत वर्गांमध्ये जाण्याचं आवाहन केलं आहे.
यापूर्वी एका मंत्र्यानं विद्यार्थी हा फक्त दिखाऊपणा करत आहेत, अशी टीका केली होती. यानंतर खूप गोंधळ उडाला होता. यानंतर त्या मंत्र्यांनी माफी मागितली होती.
अनेक जण जखमी
विद्यार्थ्यांचा जमाव आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि रबराच्या गोळ्यांचा वापर केला, असं काही माध्यमांनी म्हटलं आहे. पोलिसांनी मात्र ही बाब नाकारली आहे.
निदर्शनादरम्यान जखमी झालेल्या लोकांची संख्या जवळपास 100 इतकी आहे, असं प्रत्यक्षदर्क्षी डॉक्टर अब्दुस शब्बीर यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं.
"जखमींपैकी काही लोकांची स्थिती खूपच वाईट होती आणि काहींना रबराच्या गोळ्याही लागल्या होत्या," असं शब्बीर यांनी सांगितलं आहे.
कोण होते हल्लेखोर?
निदर्शकांवर हल्ला करणारे बांगलादेश छात्र लीग या संघटनेचे सदस्य होते, असं एका स्थानिक पत्रकारानं बीबीसीला सांगितलं. बांगलादेश छात्र लीग ही एक विद्यार्थी संघटना आहे आणि सत्ताधारी पक्षाशी निगडित आहे. या संघटनेचे लोक निदर्शनाला विरोध करत आहेत.
रस्त्यांवर लैंगिक शोषणासारख्या घटना घडत आहे, असं काही बातम्यांमध्ये म्हटलं आहे. एका महिला पत्रकारानं सोशल मीडियावर पोस्ट केलं, "जेव्हा मी निदर्शनं कव्हर करायला गेले, तेव्हा माझी छेड काढण्यात आली."
'आम्हाला न्याय हवाय,' अशा घोषणांसह विद्यार्थी गेल्या 7 दिवसांपासून निदर्शन करत आहेत.
रस्ते वाहतुकीचे नियम अधिक कडक करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.
"जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाहीत तोवर आम्ही इथून हटणार नाही. आम्हाला सुरक्षित रस्ते आणि सुरक्षित चालक हवेत," असं एका निदर्शकानं म्हटलं आहे.
निदर्शकांमध्ये 13 वर्षीय किशोरवयीन मुलंसुद्धा सहभागी आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)